शक्तिप्रदर्शनाने गाजल्या फडणवीस, ठाकरेंच्या सभा

शक्तिप्रदर्शनाने गाजल्या फडणवीस, ठाकरेंच्या सभा
शक्तिप्रदर्शनाने गाजल्या फडणवीस, ठाकरेंच्या सभा

कोल्हापूर : हजारोंच्या गर्दीचे शक्तिप्रदर्शन, विरोधकांवर प्रचंड टीका आणि शेवटी जाता जाता होणारा २०१९ च्या निवडणुकीचा विषय आणि आत्ता आमच्याशिवाय पर्याय नाही, असा साद घालत केलेला निवडणूकपूर्व प्रचार अशाच वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभा गाजल्या. सत्तेतील दोघे प्रमुख नेते या सप्ताहाच्या अखेरीस दक्षिण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. या वेळी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत अग्रेसर असणाऱ्या साखर कारखानदारांनी पोती पूजन, इथेनॉल प्रकल्प उद्‍घाटन बॅंक नामकरण आदी कार्यक्रम नेत्यांच्या हस्ते करीत मोठी गर्दी जमवून राजकीय वजन दाखविण्याचा प्रयत्न केला.

खरे तर एखाद्या कारखान्याचा पोती पूजन किंवा बॅंकेचे नामकरण हे कार्यक्रम मर्यादित स्वरूपात असतात. पण विविध कारखान्यांच्या कार्यस्थळावर येणारे हजारोंचे लोंढे शक्तिप्रदर्शनाची साक्ष देत होते. 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अपेक्षेप्रमाणे आपल्या सरकारच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतलेल्या कर्जमाफीसह अनेक निर्णयांच्या फलनिष्पत्तीचा उल्लेख करून समोर बसलेल्या गर्दीवर सरकारची कामे बिंबवण्याचा प्रयत्न केला. तर याउलट सरकारमध्येच असलेल्या उद्धव ठाकरे यांनी सरकारच्याच अपयशाचा पाढा वाचत सरकारला टीकेचे बोल सुनावले.

विरोधी पक्षांपेक्षा सरकारवरील सहयोगी पक्षावर होणारी बोचरी टीका चर्चेची ठरली. आता दुसरे कोणी नको शिवसेनेची एकहाती सत्ता हवी, असे सांगत श्री. ठाकरे यांनी भावनिक आवाहन केले. 

जरी दोन्ही पक्षांचे प्रमुख दोन्ही जिल्ह्यांत असले, तरी स्थानिक राजकारणावरही भाष्य झाले. संयोजक कारखान्यांच्या विरोधात असणाऱ्या पक्ष व व्यक्तीच्या विरोधात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दोन्ही स्वरूपात टीका करून समोरच्या गर्दीला खूश करण्याचा प्रयत्न केला.

पण एकूणच सगळ्या सभा व नेत्यांची भाषणे पाहता गर्दी जमवणे व शक्तिप्रदर्शन करणे हाच एकमेव हेतू सभांच्या संयोजकांचा राहिला. यातून नकळतपणे निवडणुकीसाठी ताकद दाखविण्याचाही प्रयत्न झाला. यामुळे नेत्यांनीही त्या दृष्टीनेच आपल्या भाषणाचे मुद्दे लोकांसमोर ठेवले.

कारखानदारांना संधीची अपेक्षा दोन्ही नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावरूनच एकमेकाला धारेवर धरले. सरकारच्या शेतकरी हिताच्या निर्णयाबाबत उलट सुलट चर्चा होत असतानाच, शेतकरी प्रश्‍नावरून दोन्ही नेत्यांत एकमेकांवर टीका करण्याची अहमिका लागल्याचे दृश्य सभांमध्ये होते.

इच्छुक कारखानदारांनी मात्र नेत्यांना गर्दीचा उच्चांक दाखवित अापला प्रभाव टाकला. कारखान्यांच्या प्रगतीचा आढावा घेताना कारखानदारांनी आता राजकारणातही संधी मिळावी, अशी अपेक्षा काहींनी आपल्या भाषणात मांडली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com