ऑक्टोबरमध्ये ४ लाख टन साखर उत्पादनाची शक्यता

नव्या हंगामात कारखान्यांसाठी ९ लाख हेक्टरपेक्षा जादा ऊस उपलब्ध राहू शकतो, असा सहकार विभागाचादेखील अंदाज आहे. यंदा किमान १२४ साखर कारखाने पहिल्याच टप्प्यात सुरू होऊ शकतात.
साखर हंगाम २०१७-१८
साखर हंगाम २०१७-१८

पुणे : राज्याचा ऊस गाळप हंगाम सुरू करण्यासाठी यंदा सरकारने वेळेत परवानगी दिल्यास ऑक्टोबरमध्ये कारखान्यांकडून किमान चार लाख टन साखर तयार केली जाऊ शकते, अशी माहिती कारखानदार सूत्रांनी दिली. राज्यात २०१५-१६ मधील हंगामात शेतकऱ्यांनी ९ लाख ८७ हजार हेक्टरवर ऊस केला होता. मात्र, दुष्काळामुळे २०१६-१७ मध्ये अवघ्या ६ लाख ३३ हजार हेक्टरवर ऊस पिकवला गेला. कमी उसामुळे गेल्या हंगामात २७ कारखाने बंद ठेवावे लागेल. गेल्या हंगामात दीडशे साखर कारखान्यांनी ३७२.४५ लाख टन उसाचे गाळप केले. त्यापासून ४१.८६ लाख टन साखर तयार केली होती. यंदा वेळेत गाळप सुरू झाल्यास किमान चार लाख टन साखर हंगामाच्या पहिल्याच महिन्यात तयार होऊ शकते. पावसामुळे पिकाची स्थितीदेखील सुधारली आहे.  नव्या हंगामात कारखान्यांसाठी ९ लाख हेक्टरपेक्षा जादा ऊस उपलब्ध राहू शकतो, असा सहकार विभागाचादेखील अंदाज आहे. यंदा किमान १२४ साखर कारखाने पहिल्याच टप्प्यात सुरू होऊ शकतात. देशाचा विचार करता ऑक्टोबरमध्ये २६० साखर कारखाने सुरू होतील. त्यात उत्तर प्रदेशातील ९२ कारखान्यांचा समावेश राहील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.  महाराष्ट्राच्या तुलनेत उत्तर प्रदेशात एक महिना उशिरा म्हणजेच नोव्हेंबरपासून गाळप सुरू होते. मात्र, यंदा तेथे भरपूर उसामुळे साखर कारखाने लवकर सुरू होत आहेत. उत्तर प्रदेशातील कारखान्यांकडून ऑक्टोबरमध्ये किमान पावणेतीन लाख टनाच्या आसपास साखर तयार करण्याइतपत गाळप होण्याची चिन्हे आहेत. राज्याच्या शेजारील कर्नाटक व गुजरातमधील गाळपदेखील ऑक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, तेथील साखर उत्पादन पहिल्या महिन्यामध्ये एक लाख टनाच्या पुढे जाण्याची शक्यता कमी असल्याचे कारखानदारांना वाटते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com