पुणे विभागातील दोन लाख हेक्टरवरील ऊस पीक अडचणीत

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पुणे विभागातील गावांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. यामुळे रब्बी हंगामासह फळबाग, ऊसशेती धोक्यात आली आहे. पाणीटंचाईमुळे विभागातील एक लाख ९५ हजार ३९० हेक्टर ऊस क्षेत्र अडचणीत आले आहे. त्यामुळे पुढील वर्षी साखर कारखान्यांना गाळपासाठी उसाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावणार असून, गळीत हंगाम अडचणीत येण्याची शक्यता आहे.   

पुणे विभागातील नगर, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांत खासगी आणि सहकारी मिळून सुमारे ८० साखर कारखाने आहेत. त्यापैकी काही साखर कारखाने हे दोन ते तीन वर्षांपासून बंद आहेत. दरवर्षी गळीत हंगामात या ८० साखर कारखान्यांपैकी सुमारे ६० ते ६५ साखर कारखाने सुरू होतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात उसाची गरज असते. अनेक शेतकरीदेखील शाश्वत उत्पन्नासाठी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करतात. साधारणपणे लागवडीनंतर दहा महिन्यांनी ऊसतोडणीस येतो. त्यामुळे अनेक शेतकरी जुलै ते आॅगस्ट महिन्यात आडसाली उसाची लागवड करतात. काही शेतकरी सुरू, पूर्वहंगामी उसाचीही लागवड करतात.   

यंदा कमी झालेला पाऊस, आॅक्टोबरपासून सुरू झालेली पाणीटंचाई याचा फटका ऊस लागवडीला बसला आहे. पुणे विभागातील अनेक ठिकाणी ऊस लागवड खोळंबल्याची स्थिती आहे. मात्र पाण्याची सुविधा असलेल्या काही शेतकऱ्यांनी लागवडी केल्या आहेत. विभागात आडसाली, सुरू, पूर्वहंगामी, खोडवा उसाचे सरासरी क्षेत्र चार लाख १३ हजार ५८० हेक्टर आहे. यंदा खोडवा वगळता उसाची नव्याने एक लाख ४८ हजार ९२० हेक्टरवर लागवड झाली आहे. शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी लागवड केलेल्या व यंदा गाळप झालेला सुमारे ४६ हजार ४८० हेक्टरवरील ऊस खोडवा म्हणून ठेवला आहे. सरासरीच्या तुलनेत विचार केल्यास विभागात ऊस लागवडीच्या क्षेत्रात दोन लाख १८ हजार १९० हेक्टरने घट झाली आहे. त्यातच गेल्या चार ते पाच महिन्यांपासून सुरू झालेली पाणीटंचाई  येत्या दीड ते दोन महिन्यांत आणखी तीव्र होईल.

सध्या विभागात अनेक ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. शेतीच्या पाण्याची स्थितीही भीषण झाली आहे. अनेक ठिकाणी विहिरीही कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे ऊस शेतीसह, इतर पिकेही धोक्यात आली आहेत. 

पुणे जिल्ह्यात जुन्नर, आंबेगाव, बारामती, दौड, इंदापूर, शिरूर, तर नगर जिल्ह्यातील राहुरी, राहाता, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, सोलापूर जिल्हातील पंढरपूर, करमाळा, मोहोळ, माढा, दक्षिण सोलापूर ही तालुके उसाचे आगार म्हणून ओळखली जातात. या तालुक्यांत दरवर्षी शेतकरी आडसाली, पूर्वहंगामी, सुरू उसाची लागवड करून उत्पादन घेतात. तर काही शेतकरी खोडव्याचेही उत्पादन घेतात. यंदा कमी पावसाचा आडसाली, पूर्वहंगामी व सुरू उसाच्या लागवडीवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे दोन लाख हेक्टरच्या पुढे उसाच्या लागवडी गेल्या नाहीत.

जिल्हानिहाय उसाचे क्षेत्र (हेक्टर)
जिल्हा सरासरी क्षेत्र  ऊस लागवड क्षेत्र 
नगर  १,२१,१८० ६७,६२० 
पुणे १,३०,६३० ६९,७१० 
सोलापूर  १,६१,७७० ५८,०६० 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com