सिंधुदुर्ग जिल्ह्यात विस्तारतेय ऊसशेती

​आमचा कारखाना कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर आहे. आम्हाला सिंधुदुर्ग जिल्हाही जवळ असल्याने या जिल्ह्यातूनही ऊसपुरवठा होत आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी अनेक ऊस योजना राबविल्या आहेत. याचा फायदा सिंधुदुर्गमधील शेतकरीही घेत आहेत. - सुनील पाटील, ऊस विकास अधिकारी, डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना, गगनबावडा
ऊस लागवड
ऊस लागवड

सिंधुदुर्ग : आंबा, काजू व अन्य मसाला पीक उत्पादनात पुढारलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता ऊसशेती कात टाकू लागली आहे. कोल्हापुरातील कारखान्यांच्या तांत्रिक सहकार्याच्या जोरावर डोंगराळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातही उसाचे मळे फुलत आहेत. गेल्या काही वर्षांत उसाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. जिल्ह्यात यंदा सुमारे पाच हजार एकरवर उसाचे क्षेत्र आहे.  कोकणाला लागून असलेला कोल्हापूर जिल्हा हा उसाच्या दृष्टीने पुढारलेला जिल्हा; पण या जिल्ह्याच्या शेजारी असूनही भौतिक परिस्थिती नसल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढले नाही. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून अगदी कमी प्रमाणात ऊसशेती होती. कोकणात अनेक ठिकाणी पावसाळ्याचे काही दिवस वगळता उन्हाळ्यात पाण्याची मोठी टंचाई भासते. उसाला बारमाही पाण्याची गरज असल्याने उसाचे पीक घेणे कोकणवासीयांना विशेष करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात शक्‍य नव्हते; परंतु गेल्या चार पाच वर्षांत कोल्हापुरातील काही कारखान्यांनी ऊस उपलब्धतेसाठी मेहनत घेण्यास सुरवात केली. आपले प्रतिनिधी नेमून ऊसवाढीसाठी प्रयत्न केले.   राधानगरी, गगनबावडा तालुक्‍यातील ऊस कारखान्यांनी आपले क्षेत्र विस्तारत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऊसशेतीला वाव दिला. सुरवातीला कोल्हापुरातून सिंधुदुर्गमध्ये स्थायिक झालेल्या, या जिल्ह्यात जमिनी घेतलेल्या शेतकऱ्यांनी ऊसशेतीस प्रारंभ केला. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांच्या तांत्रिक सहकार्याने ऊसशेतीचे प्रयोग सुरू झाले. डोंगराळ व कमी क्षेत्रातील जमिनीत हेक्‍टरी उत्पादन कमी असले तरी वर्षाला हमखास येणारी रक्कम पाहून ज्यांच्याकडे बारमाही पाण्याची सोय आहे, त्या शेतकऱ्यांनीही ऊसशेतीसाठी पसंती दाखविली. बियाणे, खते, याबरोबर तांत्रिक मार्गदर्शनही या कारखान्यांच्या तज्ज्ञांकडून होत असल्याने शेतकऱ्यांना ऊसशेती करणे सहज शक्‍य झाले आहे. जिल्ह्यातील कणकवली, वैभववाडी, फोंडा, आंबोली, दोडामार्ग तालुक्‍यातही ऊस क्षेत्रात हळूहळू वाढ होत आहे. या तालुक्‍यातील ऊस राधानगरी, गगनबावडा तालुक्‍यातील कारखान्यांना जात आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेनेही ऊसशेतीसाठी कर्ज उपलब्ध करून दिल्याने ऊसशेती करणाऱ्यांसाठी सहज अर्थपुरवठा उपलब्ध होऊ लागला. कारखाने जिल्हा बॅंक यांचा एकत्रित परिणाम यामुळेच डोंगराळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ऊसशेती फुलू लागली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com