ऊसदराचा चेंडू अाता कारखानदारांच्या कोर्टात

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ३४०० रुपये दराची मागणी करून निर्णयाचा चेंडू आता कारखानदारांच्या कोर्टात टाकला आहे. ही मागणी जाहीर करताना ‘स्वाभिमानी’चे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी लवचिक भूमिकेचेही संकेत दिले आहेत. यामुळे स्वाभिमानी कोणत्या रकमेवर तडजोड करते याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे. 
 
दक्षिण महाराष्ट्रात १२ ते १३ साखर उतारा असणाऱ्या कारखान्यांचा तोडणी खर्च वजा जाता एफआरपी २९०० रुपयापर्यंत जाते. संघटनेच्या रेट्याने यात थोडी वाढ झाल्यास चांगले कारखानदार ३००० रुपयांपर्यंत पहिला हप्ता देऊ शकतील, असा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांचा आहे. मात्र मोठे कारखाने वगळता इतर कारखान्यांची मात्र दराच्या स्पर्धेत फरफटच होण्याची शक्‍यता आहे.
 
कोंडी फोडण्यासाठी बैठक झाल्यास बैठकीला बसल्यानंतर संघटना काय भूमिका घेते यावरच किमान पश्‍चिम महाराष्ट्रातील कारखान्यांचे तरी भवितव्य अवलंबून असणार आहे. इतर शेतकरी संघटनांनी ३५०० रुपयांची मागणी करून ‘स्वाभिमानी’पुढे दर मागणीचे आव्हान उभे केले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने इतर संघटनांच्या दरापेक्षा शंभर रुपयांनी कमी दराची मागणी केली. यावर इतर शेतकरी संघटनांनी टीका केली असली तरी आम्ही व्यवहार्यच मागणी करीत असल्याचे स्वाभिमानीचे म्हणणे आहे. 
 
खासदार राजू शेट्टी यांनी सुमारे एक तासाच्या भाषणात साखर उद्योगाबरोबरच शेतीशी निगडित इतर बाबींचाही उल्लेख केला. यंदा पहिल्यांदाच केवळ साखर उद्योगावर न बोलता त्यांनी देशपातळीवर काम करणाऱ्या संघटनांचा अहवाला देत शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या टीकेचा रोख हा प्रामुख्याने वैयक्तिक न राहता केंद्राच्या भूमिकेवर राहिला.
 
प्रत्येक वर्षीच्या ऊस परिषदेत प्रामुख्याने श्री. शेट्टी साखर उद्योगातील निर्णयाचा सविस्तर आकडेवारीसह हिशेब मांडून या पद्धतीने किती दर मिळावायला हवा याची माहिती देतात. यंदा मात्र त्यांनी तपशीलवार आकडेवारी अपवाद वगळता फारशी दिसली नाही. पण साखरेचे दर चांगले असल्याने यंदा दर निश्‍चित चांगले मिळतील, यामुळे तुम्ही मागे हटू नका, असा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला.
 
याबरोबरच जर मी लवचिक भूमिका घेऊन तोडगा काढला तर तुम्ही मला पाटीत खंजीर खुपसला म्हणायचे नाही, अथवा अन्य आरोप करायचे नाहीत, असे असेल तर आत्ताच सांगा, असे म्हणत त्यांनी व्यासपीठावर शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न लक्षवेधी ठरणारा होता. 
 
दरापेक्षा खोत यांच्यावरील टीकेची चर्चा
गर्दीच्या दृष्टीने परिषद पाहायला गेली तर यंदा शेतकऱ्यांची चांगली उपस्थिती मिळविण्यात संघटना यशस्वी ठरली. जेवढी दरावर चर्चा झाली तेवढीच चर्चा सदाभाऊ खोत यांच्यावरील टीकेची झाली. गेल्या अनेक वर्षापासून जयसिंगपूरची उस परिषद ही श्री. खोत यांच्या भाषणाने गाजायची. पण यंदा त्यांच्यावरच शेलक्‍या शब्दांत टीका झाली.
 
सदाभाऊंची गेल्या काही माहिन्यांत स्वाभिमानीच्या विरोधातील भूमिका पाहता हे अपेक्षितही होते. शक्तिप्रदर्शनात संघटना यशस्वी झाली असली तरी दराबाबत योग्य भूमिका घेऊन हंगाम सुरळीत करण्यात कितपत यशस्वी होते हे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.
 
कारखाना पातळीवर शांतताच
 स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ३४०० रुपयांच्या पहिल्या हप्त्याच्या मागणीनंतर कारखाना पातळीवर अद्याप शांतताच आहे. संघटनेने ३४०० रुपये पहिला हप्ता जाहीर केल्यानंतर हंगाम सुरू करू देऊ, अशी भूमिका घेतली आहे. यामुळे आता ही कोंडी फोडण्यासाठी पुढाकार घेणार कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
 
शासनाच्या निर्णयानुसार अधिकृत हंगाम सुरू होण्यास दोन दिवसांचाच कालावधी राहिला आहे. पावसाने विश्रांती दिल्याने बहुतांशी कारखान्यांनी तोडणी हंगामाचे नियोजन करून ठेवले आहे. परंतु हंगाम सुरू न करण्याचा पवित्रा स्वभिमानीने घेतल्याने आता कोंडी फुटेपर्यंत कारखाने सुरू होतील की नाही याबाबत अनिश्‍चितता आहे. 
 
एक, दोन दिवसांच्या कालावधीत कारखानदारांची पुन्हा बैठक होऊन ठराविक रकमेबाबत चर्चा होण्याची अंदाज व्यक्त होतोय. मात्र याबैठकीत सर्वमान्य दर किती ठरवणार, यावरच यंदाच्या पहिल्या हप्त्याचे गणित ठरण्याची शक्‍यता आहे. इतर संघटनांनी ३५०० रुपये दर मागितला होता. यावर कडी करीत स्वाभिमानी जास्त रक्कम मागेल अशी अटकळ होती. 
 
परंतु स्वाभिमानीने त्यापेक्षा दर कमी मागितल्याने आता निदान कारखानदारांत तरी कोणत्या रक्कमेबाबत एकमत होते. आता कोणता कारखाना हंगामाच्या सुरवातीला पहिल्यांदा दर जाहीर करतो याकडे लक्ष लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com