सोलापुरातील ऊसदराचे आंदोलन चिघळले

सोलापूर ः पंढरपुर तालुक्‍यात अनेक गावात रविवारी (ता.१९) टायर्स पेटवून सरकारचा निषेध करण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले.
सोलापूर ः पंढरपुर तालुक्‍यात अनेक गावात रविवारी (ता.१९) टायर्स पेटवून सरकारचा निषेध करण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले.

सोलापूर ः कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील ऊसदराचा प्रश्‍न सुटला; पण सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा मात्र सुटता सुटत नसल्याने शेतकरी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून आंदोलनाची ही धग वरचेवर वाढतच आहे. रविवारी (ता. १९) पंढरपूर तालुक्‍यातील अनेक शेतकरी रस्त्यावर उतरले.

काही भागात रास्ता रोको, जाळपोळ यामुळे वातावरण चांगलेच तणावपूर्ण झाले. दरम्यान, स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर हे स्वतः गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात आंदोलनासाठी ठाण मांडून आहेत. पोलिसांनी त्यांना कायदा व सुव्यवस्था राखावी, यासाठी नोटीस बजावली आहे. त्यामुळे आंदोलन आणखीनच चिघळले आहे.

रविवारी सकाळी पंढरपुरात बहुतांश भागात ऊसदराचे आंदोलन भडकले. पोलिसांची मात्र या सगळ्यात धावपळ उडाली आहे. पोलिस पुढे गेले, की मागे टायर पेटवून वाहतूक बंद पाडण्याचे प्रकार झाले. सोनके, वाखरी, भोसे, करोळे, सिद्धेवाडी या गावातील अनेक शेतकरी रस्त्यावर उतरून या आंदोलनात सहभागी झाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी अकराच्या सुमारास पंढरपूर-टेंभुर्णी मार्गावर भोसेपाटी येथे रास्ता रोको आंदोलन केले. मोठ्या संख्येने या वेळी शेतकरी सहभागी झाले. या वेळी तुपकर यांनी सरकर आणि कारखानदाराच्या दडपशाहीविरुद्ध जोरदार प्रहार केला.

एकीकडे आंदोलनाची ही परिस्थिती असताना गेल्या आठ दिवसांपासून पंढरपुरातील वाखरीत उपोषणाला बसलेल्या स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, चंद्रकांत बागल, नवनाथ कांबळे या कार्यकर्त्यांची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणखीनच चिडले आहेत. माढा, मंगळवेढा, बार्शी या भागातही शेतकरी सक्रिय होत असल्याचे चित्र आहे. कोणत्याही क्षणी कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो, ऊस दराचे हे आंदोलन आता वेगळ्या वळणावर आले आहे. रविकांत तुपकरांना नोटीस पंढरपूरसह परिसरात ऊसदरावरून सुरू असलेल्या या आंदोलनावरून पोलिस प्रशासनही सतर्क झाले आहे. स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर हे पंढरपूर तालुक्‍यात फिरून शेतकऱ्यांच्या सभा घेऊन, रास्ता रोको करून आंदोलन सुरू ठेवत असल्याने पंढरपूरचे पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी रविवारी त्यांना कायदा व सुव्यवस्था राखावी, अशी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १४९ ची नोटीस बजावली आहे. सहकारमंत्र्यांच्या कारखान्याचे गाळप बंद पाडले बळिराजा शेतकरी संघटनेने सहकारमंत्र्यांच्या भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर) येथील लोकमंगल कारखान्यासमोर गेल्या दोन दिवसांपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

शनिवारपासून या कारखान्याकडे येणाऱ्या सगळ्या ट्रॅक्‍टर, गाड्या बाहेरच रोखल्या जात असल्याने कारखान्याचे गाळप बंद पडले आहे. दुसरीकडे जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनीही मंत्र्यांच्या बीबीदारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथील साखर कारखान्यावर आंदोलन सुरू केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com