कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फुटली

कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांची एफआरपी २४०० ते २८०० रुपये इतकी होते. यात २०० रुपयांची वाढ झाल्यास कारखान्यांच्या रिकव्हरीनुसार ऊस उत्पादकाला २६०० ते ३००० रुपये इतका पहिला हप्ता मिळणार आहे. यामुळे ३००० रुपयांच्या वर पहिला हप्ता देणारे कारखाने अपवादात्मकच असतील, असे जिल्ह्यातील चित्र आहे.
ऊसदराची कोंडी फुटली
ऊसदराची कोंडी फुटली

कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात जिल्ह्यातील कारखानदारांनी एफआरपी पेक्षा २०० रुपये जादा दर देण्याची तयारी येथे झालेल्या बैठकीत दाखविली. त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह रयत क्रांती संघटनेने मान्यता देत आंदोलन मागे घेतले. यामुळे तोडी सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रविवारी (ता. ५) महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत हा तोडगा काढण्यात आला. पहिल्या हप्त्याबरोबर एफआरपी अधिक १०० रुपये देण्यात येणार आहेत. यानंतर दोन महिन्यांनी उर्वरित १०० रुपये देण्यात येणार आहेत. यंदा शेतकरी संघटनांनी उसास प्रतिटन ३४०० रुपये इतक्‍या दराची मागणी केली होती. परंतु त्यांनतर कारखानदारांनी दर जाहीर न करता गळीत हंगाम सुरू केल्याने ऊसतोडणी शेतकरी संघटनांनी बंद पाडली होती. यापार्श्‍वभूमीवर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन कारखानदार व शेतकरी संघटनांची बैठक येथील शासकीय विश्रामगृहात बोलविली. या वेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतही उपस्थित होते. श्री. पाटील यांनी कारखानदारांकडून दराचा अंदाज घेतला. गेल्या वर्षी एफआरपी अधिक १७५ रुपये असा फॉर्म्युला ठरला होता. यात वाढ करावी व नंतर ७०:३०च्या फॉर्म्युल्यानुसार जादाचा दर कारखानदारांनी शेतकऱ्यांना द्यावा असे बैठकीत ठरविण्यात आले. याला कारखानदारांनी मान्यता दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी निर्णयास सहमती दाखवत आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले. तथापि रघुनाथदादा पाटील यांनी आपल्या संघटनेला हा निर्णय मान्य नसल्याने आपण आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. या वेळी हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके, गणपतराव पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर, चंद्रदीप नरके, के. पी. पाटील, माधवराव घाटगे आदींसह कारखानदार उपस्थित होते. प्रतिक्रिया... ऊस हंगाम बंद पडू नये, हंगाम सुरळीत चालावा. ऊस उत्पादकांचे नुकसान होऊ नये यासाठी सरकारच्या वतीने पुढाकार घेऊन आम्ही तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला. गेल्या वर्षीपेक्षा अधिक काही तरी रक्कम द्यावी असा तोडगा निघाला, तो सर्वमान्य झाल्याने हा प्रश्‍न आता मिटला. ७०:३० फॉर्म्युल्याप्रमाणे पुन्हा उत्पादकांना दर मिळणारच आहे. - चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री

आम्ही एफआरपी अधिक ३०० रुपये मागितले होते. बैठकीत २०० रुपये मान्य झाले. यामुळे आम्ही याला सहमती दाखवत आहोत.  - सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांची एफआरपी चांगली असल्याने या निर्णयाचा उत्पादकांना फायदा होणार आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा एफआरपीत वाढ झाली आहे. यात २०० रुपये जादा देण्याची तयारी कारखानदरांनी दाखविली. गेल्या वर्षीपेक्षा उचलीतही वाढ असल्याने आम्ही याला मान्यता देत आंदोलन मागे घेत आहोत. - राजू शेट्टी, खासदार

शासन, कारखानदार व संघटनांनी चर्चेचे नाटक केले आहे. यामुळे बैठकीतील निर्णय आम्हाला मान्य नाही. आम्ही आंदोलन सुरूच ठेवू. - रघुनाथदादा पाटील,  अध्यक्ष शेतकरी संघटना सांगलीतही कोल्हापूर पॅटर्न? कोल्हापूरचा फॉर्म्युला ठरल्यानंतर रविवारी सायंकाळी सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी शीघ्र गतीने हालचाली करीत कोल्हापूरचाच पॅटर्न कायम ठेवण्याबाबत चर्चा सुरू केली. सायंकाळी उशिरा राजू शेट्टी सांगलीकडे रवाना झाले. सांगली जिल्हा बँकेत बैठक होऊन हाच फॉर्म्युला कायम ठेवण्याबाबत एकमत झाल्याचे एका कारखानादाराने सांगितले. सायंकाळी उशिरा श्री. शेट्टी यांच्याबरोबर बैठक होऊन हंगाम सुरळीत सुरू करण्याबाबतच्या हालचाली सुरू होत्या

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com