अपरिक्व नवीन आडसाली उसाला तुरा

अपरिक्व नवीन आडसाली उसाला तुरा
अपरिक्व नवीन आडसाली उसाला तुरा

कोल्हापूर : यंदा नुकत्याच लागवड केलेल्या आडसाली ऊस लावणीच्या उसालाही तुुरा येत असल्याने आडसाली ऊस लागवडच अडचणीत आली आहे. केवळ पाच ते सहा महिन्यांचा अपरिक्व आडसाली ऊसही तुऱ्याच्या फेऱ्यात अडकला आहे. हा ऊस कापून काढल्याशिवाय कोणताच पर्याय नाही. परिणामी ऊस उत्पादक हबकले आहेत. या अनाहूत संकटाने उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याचा धोका आताच आ वासून उभा राहिला आहे. 

यंदाच्या हंगामात उसाला तुरा येण्याचा प्रश्‍न गंभीर स्वरूप धारण करीत आहे. शिवारातील बहुतांशी उसाला तुरे फुटल्याने ऊस मळे हिरव्या पानाऐवजी तुऱ्याने झाकून गेले आहेत. उसाच्या शेंड्यापासून एक दोन फूट इतका तुरा उसाला दिसत आहे. यंदा सप्टेंबर, ऑक्‍टोबरमध्ये मोठ्या प्रमाणात ढगाळ हवामान व पावसाचे प्रमाण राहिले. सप्टेंबरपर्यंत पाऊस नसल्याने उसाची वाढ चांगली झाली नव्हती. पण आक्‍टोंबरच्या दमदार पावसाने उसाची वाढ एकदम झाली.

अपरिपक्व ऊसही लपेटला जोरदार पाऊस व हवामानातील बदलामुळे तोडणीस आलेल्या उसालाही नोव्हेंबरपासूनच तुरे येण्यास सुरवात झाली. बघता बघता डिसेंबरमध्ये तर शिवारातील नव्वद टक्के ऊस तुऱ्याने झोकाळून गेला. एखाद्या महिन्यात उसाची तोड अपेक्षित असल्याने शेतकऱ्यांना याचा विशेष तोटा झाला नाही. पण पक्व उसाबरोबरच नुकत्याच लागवडी झालेल्या आडसाली उसावरही तुरा येत असल्याने नवीन लागवडी केलेले शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. तुरा आल्यास कोणताच उपाय चालत नसल्याने हतबल अवस्था झाली आहे.

उत्तर कर्नाटकातही समस्या आडसाली उसासाठी दक्षिण महाराष्टातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांबरोबर उत्तर कर्नाटकातील बेळगाव जिल्हाही प्रसिद्ध आहे. या भागातील कारखान्यांच्या ऊस गाळपात आडसाली ऊस हा आधार ठरतो. या भागात हंगामावार उसाचे प्रमाण पाहिले तर जवळ जवळ तीस ते चाळीस टक्के प्रमाण हे आडसालीचे आहे. जून, जुलैमध्ये याची लागवड केली जाते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा या दोन्ही महिन्यांत उष्णतेचे प्रमाण अधिक होते. यामुळे आडसालीची वाढ हव्या त्या प्रमाणात झाली नाही. यातच ऊसवाढीच्या अवस्थेत असतानाच ऑक्‍टोबरमध्ये जोरदार पाऊस झाला. यामुळे उसाची वाढ झाली खरी, पण ती अपरिक्व अवस्थेतच होती. नव्या कोंबाचे रुपांतर पानात होण्याऐवजी ते थेट फुलात झाल्याने अवेळी हे तुरे आले आहेत.

ऊसतोड कामगार व उत्पादकांत संघर्ष सध्या ऊसतोडणी सुरू आहे. पण तुरा असणाऱ्या उसाला वाड्याची प्रत चांगली नसल्याने ऊसतोडणी कामगार तुरा असलेला ऊस दिसला की तोडणीसाठी नाराजी व्यक्त करीत आहेत. बहुतांशी कामगार उसाचे वाडे विकून रोजचा चरितार्थ चालवित असतात. तुऱ्याच्या उसाचे वाडे जनावरे खात नसल्याने त्याला मागणी नसते. यामुळे याचा फटका कामगाराला बसतो. "तुमच्या उसाला तुरा आहे. आम्हाला परवडत नाही, आम्हाला त्याचे पैसे द्या," अशी मागणी तोडणी कामगारांकडून होत असल्याने तोडणीस आलेल्या उसाच्या वेळी उत्पादकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. 

प्रतिक्रिया दोन महिन्यांपूर्वी जी भीती होती ती आता खरी ठरत आहे. उसाला तुरे आल्यानंतर त्याची तोड वेळेतच व्हायला हवी, पण ती होत नसल्याने शेतकऱ्यांपुढच्या अडचणी वाढल्या आहेत. यातच अपरिक्व उसालाही तुरे फुटल्याने या उसाची वाढ भविष्यात होणे कठीण आहे.  -डॉ. अशोक पिसाळ,  प्रभारी अधिष्ठाता, ऊस व गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com