सोलापुरात ऊसदराची बैठक पुन्हा फिसकटली

सोलापुरात ऊसदराची बैठक पुन्हा फिसकटली
सोलापुरात ऊसदराची बैठक पुन्हा फिसकटली

सोलापूर : ऊसदर ठरविण्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी बोलावलेली कारखानदार, शेतकरी संघटना यांची बैठक कोणत्याही निर्णयाविना पुन्हा फिसकटली. बैठकीतूनच कारखानदार निघून गेले, त्यातच कारखानदारांनी थेट कारखाने बंद ठेवण्याचा इशारा दिल्याने आता शेतकरी संघटनाही चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.  शनिवारी (ता. १८) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडण आंदोलन करून सहकारमंत्री आणि कारखानदारांचा निषेध केला. दुसरीकडे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या बीबीदारफळ येथील लोकमंगल कारखान्यासमोर जनहित शेतकरी संघटना, भंडारकवठ्याच्या कारखान्यासमोर बळिराजा शेतकरी संघटनेने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.  शुक्रवारी (ता.१७) सायंकाळी पुन्हा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, साखर सहसंचालकांनी जिल्ह्यातील कारखानदार-शेतकरी संघटनांची बैठक बोलावली होती. पण या बैठकीत शेतकरी संघटना विनाकपात २७०० रुपयांवर पहिल्यापासूनच ठाम राहिल्या, २७०० रुपये दर दिल्यास त्यातून ६०० रुपयांचा वाहतूक खर्च कपात केल्यास शेतकऱ्यांच्या हाती २१०० रुपयेच पडतात, या हिशेबाने शेतकऱ्याच्या हातात काहीच पडत नाही, त्यामुळे विनाकपात २७०० रुपये द्यावेत, यावरच सगळी चर्चा फिरली. पण एफआरपीप्रमाणे पहिला हप्ता आणि अधिकचे १०० रुपये यावर कारखानदार तयार झाले. सोलापूरच्या कारखान्यांच्या उताऱ्याचे गणित घातल्यास हा दर पुन्हा २१०० रुपयांपर्यंतच येऊ लागल्याने दोन्ही बाजूंनी चर्चा पुढे सरकू शकली नाही, कारखानदार मध्येच उठून गेले. तसेच येत्या दोन दिवसात कारखाना बंद ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बैठकीत चांगलेच आक्रमक झाले. शेवटी ही बैठकही निष्फळ ठरली. 

निषेधार्थ मुंडण  महाराष्ट्र नवनिर्माण सेना व रयत क्रांती संघटनेने शनिवारी (ता. १८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकारमंत्री सुभाष देशमुख व जिल्ह्यातील कारखानदारांनी ऊसदरावर तोडगा न काढल्याने या दोघांच्या निषेधार्थ मुंडण आंदोलन केले. जिल्ह्यातील साखर कारखानदार अाडमुठी भूमिका घेत असल्याचा आरोप यावेळी जिल्हा संघटक दिलीप धोत्रे यांनी केला. यावेळी मनसे पंढरपूर तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, मनसे विभाग प्रमुख नागराज स्वामी,शाखा अध्यक्ष अशोक साळुंखे, दीपक गायकवाड, प्रशांत पाटील यांनी मुंडण केले. यावेळी मनसे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे, रयत क्रांती संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष दीपक भोसले, मनसेचे जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर सहभागी झाले होते. 

उपोषण, ठिय्या सुरूच ऊसदराच्या या प्रश्‍नावर आक्रमक झालेल्या जनहित शेतकरी संघटनेचे बेमुदत उपोषण बीबीदारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथील लोकमंगल काररखान्यावर सुरू आहे. तर बळिराजा शेतकरी संघटनेचे बेमुदत ठिय्या भंडारकवठ्यातील (ता. दक्षिण सोलापूर) लोकमंगल कारखान्यासमोर सुरू आहे. हे दोन्ही कारखाने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे आहेत. 

शेतकरी आक्रमक बार्शी-कुर्डुवाडी रस्त्यावर रिधोरे पुलावर शनिवारी मध्यरात्री ऐन पुलावरच काही कार्यकर्त्यांनी टायर पेटविल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक सुमारे दोन तास थांबली. पंढरपुरात सहकारशिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या बसवरही काहींनी दगडफेक करण्यात आली. बार्शीत इंद्रेश्‍वर साखर कारखान्यासमोर शेतकरी संघटनेने धरणे आंदोलन केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com