ऊस उत्पादनवाढीसाठी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवणे गरजेचे ः डॉ. हापसे

ऊस उत्पादनवाढीसाठी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवणे गरजेचे ः डॉ. हापसे
ऊस उत्पादनवाढीसाठी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवणे गरजेचे ः डॉ. हापसे

पुणे ः सहकारी साखर कारखाने शक्तिस्थळे असून, कारखान्याचे संचालक, ऊस विकास अधिकाऱ्यांसह सहकारी व ऊस उत्पादक सभासदांनी एकत्रित काम केल्यास ऊस शेतीमध्ये अमूलाग्र बदल घडवणे शक्य होईल. त्यासाठी परिपूर्ण तंत्रज्ञान, शेतावरील प्रात्यक्षिके, ऊस उत्पादन वाढविणारे सोपे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ ऊसतज्ज्ञ डॉ. ज्ञानदेव हापसे यांनी केले. मशागत खर्चात एकरी दहा ते पंधरा हजार रुपये बचत, साखरेच्या उताऱ्यात एक टक्का वाढ व एकरी शंभर टनांचे उद्दिष्ट ठेवल्यास साखर उद्योगाला वैभव प्राप्त होईल, असेही डॉ. हापसे यांनी नमूद केले.  गेल्या वर्षी (२०१८) ऊस हंगाम उत्तम राहिला. राज्यात एकूण ऊस उत्पादन १०७ लाख टन झाले आहे. मात्र, उत्पादकतेचा विचार करता निराशाजनक चित्र आहे. त्यामागील कारणमीमांसा करून शाश्‍वत उत्पादकता वाढीसाठी पुणे येथील डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी सभागृहामध्ये नुकतेच चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या चर्चासत्रात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, माजी कुलगुरू डॉ. अशोकराव ढगे, माजी संशोधन संचालक डॉ. सुभाष शिंदे, मृदशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. पोपट शिंदे, कृषी विद्यावेता डॉ. बी. डी. जडे, व्हीएसआयचे डॉ. अरुण देशमुख, कापरे, बोखारे, जयदेव बर्वे, श्रीचंद सनतानी सहभागी झाले होते. ऊस पिकामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी आली आहे. बागायती क्षेत्रामध्ये अन्य पिकांच्या तुलनेमध्ये या पिकाला शेतकऱ्यांचे प्राधान्य असते. भविष्याचा विचार करता २०२० या वर्षापर्यंत भारताला ३९ दशलक्ष टन साखरेची गरज लागणार आहे. ही गरज भागविण्यासाठी उसाखालील क्षेत्रात वाढ करणे योग्य ठरणार नाही. त्यासाठी प्रतिहेक्‍टरी उत्पादन वाढविणे आवश्‍यक आहे. त्यासाठी जमिनीचे आरोग्य व उत्पादन क्षमता; पाण्याचा काटकसरीने वापर; विविध निविष्ठांच्या खर्चात कपात, आंतरपिकांचा समावेश, यांत्रिकीकरणाचा वापर, जुन्या मशागत तंत्रज्ञानात बदल, वेळेवर कीड व रोगांचा बंदोबस्त या महत्त्वाच्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागेल, असे या वेळी तज्ज्ञांनी सांगितले. चर्चासत्रात जमिनीच्या आरोग्यासंदर्भात  डॉ. शरद गडाख, माजी कुलगुरू डॉ. अशोकराव ढगे, डॉ. सुभाष शिंदे, डॉ. पोपट शिंदे यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.  महत्त्वाचे निष्कर्ष  ः  

  • जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी होत आहे.  पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीत तळी (कठीण थर) तयार झाली आहे.  दरवर्षी मोठी खोल नांगरट करणे चूक आहे. 
  •  जमिनीत भुसभुशीतपणा राहण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे काळाची गरज झाली आहे.  सेंद्रिय पदार्थ जमिनीचा आत्मा आहे.  क्षाराचे प्रमाण वाढले असून, त्यामध्ये सुधारणेच्या दृष्टीने शास्त्रीय प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. 
  • जनावरांची संख्या कमी होत असल्याने शेणखताची उपलब्धता कमी होत आहे. शेणखत उपलब्ध असले तरी त्यातील तणांच्या बियांचे अधिक प्रमाण, ते पूर्णपणे कुजलेले नसणे अशा समस्या आहेत. यावर जयदेव बर्वे, प्लॅस्टिक कल्चरबाबत श्रीचंद सनतानी यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला. समारोप करताना शेणखताला पर्याय म्हणून सेंद्रिय खते बाजारात येत असली तरी संशोधनात्मक प्रात्यक्षिके होण्याची गरज आहे. अशी प्रात्यक्षिके घेऊन कृषी विद्यापीठाने शिफारसी कराव्यात, असा निष्कर्ष काढण्यात आला. 
  •  डॉ. हापसे यांचे निष्कर्ष ः  कोणत्याही पिकाप्रमाणे ऊस पिकाच्या वाढीसाठी पाण्याची आवश्यकता असते. मात्र, उसाला अधिक पाणी लागते हा गैरसमज आहे. इतर वनस्पतीपेक्षा एक ग्रॅम शुष्क पदार्थ तयार करण्यासाठी उसाला कमी पाणी लागते. ऊस ही सी-४ वनस्पती असून, त्याची कार्यक्षमता अधिक आहे.  ऊस पिकासाठी ठिबक सिंचन अपरिहार्य आहे.  पाण्याची बचत करण्यासाठी क्रॉप कव्हर करून आर्द्रता टिकवून ठेवणे गरजेचे आहे.  पिकाच्या वाढीच्या योग्य टप्प्यामध्ये पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी शेततळे उपयुक्त ठरेल.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com