...अन्यथा १ मार्चपासून असहकार आंदोलन : सुकाणू समिती

...अन्यथा १ मार्चपासून असहकार आंदोलन : सुकाणू समिती
...अन्यथा १ मार्चपासून असहकार आंदोलन : सुकाणू समिती

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत जानेवारीमध्ये पुन्हा एकदा शासन व प्रशासन स्तरावर जाब विचारला जाईल. त्यानंतरही शासनाने ठोस पावले न उचलल्यास २० जानेवारीपासून राज्यभर जागर व त्यानंतर १ मार्चपासून शेतकऱ्यांचे पुन्हा असहकार आंदोलन राज्यभर छेडण्याचा निर्णय शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या बैठकीत शुक्रवारी (ता. २२) घेण्यात आला. नाशिकमध्ये गठीत झालेल्या सुकाणू समितीचे सदस्य व शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी औरंगबादेतील सुभेदारी विश्रामगृहात झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांना याविषयी माहिती दिली. सरसकट कर्जमुक्‍ती व पुन्हा शेतकरी कर्जाच्या खाईत ढकलला जाऊ नये, यासाठी उत्पादन खर्च अधिक ५० टक्‍के नफा मिळवून देणारे शेतमालाचे दर असावे, या प्रश्नावर सुकाणू समितीशी जोडलेल्या संघटनांच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा व प्रतिनिधींचा या बैठकीत समावेश होता. यामध्ये नामदेव गावडे, किशोर ढमाले, प्रतिभा शिंदे, कालिदास आपेट, सचिन धोंडे, बाळासाहेब पठारे, गणेश जगताप, करण जायकर, शिवाजीराव नांदखिले, एच. एम. देसरडा, संजय पाटील घाटणीकर, ॲड. बन्सी सातपुते, बाबा अरगडे, विलास कदम, जगन्नाथ कोरडे, नारायण टेकाळे, राजेंद्र टेकाळे, ॲड. भगवान भोजने, दत्ता कदम, अनंत शिंदे, बाळासाहेब वाळके, अनंत शिंदे, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष नीलेश बारगळ, संजय सावंत आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.  या बैठकीत सुकाणू समितीच्या विस्ताराच्या अनुषंगाने मंथन झाले. सरसकट कर्जमुक्‍ती, वीजबिल, शेतमालाचा हमीभाव, दूध तसेच ऊसदराबाबत विचारविनिमय होऊन त्यासाठीच्या लढ्याची रणनिती ठरविण्यात आली. बैठकीत झालेल्या चिंतनाअंती रघुनाथदादा पाटील म्हणाले, शासन आदेश काढते, मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. मुंबई विद्यापीठाचे निकाल ऑनलाइन जाहीर करू न शकलेल्या शासनाने शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरायला लावलेच, सोबतच बोंड अळीने नुकसान झाले तरी ऑनलाइन अर्ज भरा, मूग, उडीद, सोयाबीन विकायचं तरी ऑनलाइन अर्ज भरण्यास सांगते आहे. ऑनलाइन अर्जातही अटी शर्ती टाकून शेतकऱ्यांना आधार मिळूच नाही अशी भूमिका शासनाने घेतल्याचा आरोप श्री. पाटील यांनी केला. तसेच दीड लाखाच्या कर्जमाफीवर सुकाणू समिती समाधानी नाही, यावर आमचे एकमत झाले आहे. शेतकऱ्यांच्या सरसकट सर्व कर्जमुक्‍तीची सुकाणू समितीची भूमिका असल्याचे ते म्हणाले. या बैठकीत मराठवाड्यातून आलेल्या विविध भागातील प्रतिनिधींनी आपली भूमिका मांडली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com