रिसोड बाजार समितीच्या सभापतिपदी सुमन भुतेकर

रिसोड बाजार समितीच्या सभापतिपदी सुमन भुतेकर
रिसोड बाजार समितीच्या सभापतिपदी सुमन भुतेकर

वाशीम : जिल्ह्यातील रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिक्त झालेल्या सभापतिपदाची निवडणूक दोन दिवसांपूर्वी झाली. सभापतिपदी सुमन भुतेकर यांची निवड झाली. मात्र तूर्त ही घोषणा अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली नाही. विठ्ठल आरू, प्रभाकर साबळे यांनी अर्ज मागे घेतल्याने भुतेकर यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

रिसोड बाजार समितीचे सभापती भगवानराव बोरकर यांनी ११ मार्च २०१९ रोजी सभापतिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे सभापती पदाची निवडणूक घेण्याबाबत जिल्हा उपनिबंधकांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांच्याकडे मार्गदर्शन मागविले होते. दरम्यान, सभापतिपदाची निवडणूक घेण्यासाठी रिसोड सहायक निबंधकांची अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या दुसरा टप्पा आटोपल्यानंतर १८ एप्रिलला सभापतिपदाची निवड करण्याबाबत जिल्हा उपनिबंधकांनी रिसोडच्या सहायक निबंधकांना सूचना केल्या. 

दरम्यान, आचासंहितेमुळे ही निवडणूक घेता येत नाही, असा युक्तिवाद माजी संचालक डाॅ. रामेश्वर नरवाडे यांनी २० एप्रिलला केला. यावर जिल्हा उपनिबंधकांनी ३१ मेपर्यंत पुढे ढकलण्यात येत असल्याचा आदेश दिला. त्याला माजी सभापती गजानन पाचरणे यांनी अमरावती विभागीय सहनिबंधाकडे २२ एप्रिलला आव्हान दिले होते. रिसोड तालुक्याचा समावेश असलेली लोकसभा निवडणूक १८ एप्रिल रोजी झाली.

सभापतिपदाची निवडणूक लोकहिताच्या विरुद्ध नसल्याने जिल्हा उपनिबंधकाचा आदेश याप्रकरणी लागू होत नाही. त्यामुळे जिल्हा उपनिबंधकांचा आदेश रद्द करावा. निवडणूक ठरल्याप्रमाणे २३ एप्रिल रोजी घेण्याचे निर्देश द्यावे, असा युक्तिवाद पाचरणे यांनी केला. त्यानंतर जिल्हा उपनिबंधकांचे २० एप्रिल रोजीचे आदेश रद्द करण्याचा निर्णय विभागीय सहनिबंधकांनी दिला. त्यानुसार समिती सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (ता. २३) घेण्यात आली. मात्र हा निकाल जाहीर करण्यात आला नाही. राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे मार्गदर्शन मागवून त्यानंतर, अथवा ३१ मे यापैकी जे अगोदर होईल, त्यानुसार निकाल जाहीर करावा, असे विभागीय सहनिबंधकांनी आदेशात म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com