खानदेशात उन्हाळ कांदा काढणी वेगात

कांदा उत्पादक अडचणीत आले असून, मागील १० ते १२ दिवसांमध्ये दर कमी झाले आहेत. निर्यात शुल्क दूर करूनही दर वाढले नाहीत. आयातीवरही निर्बंध लागू करावेत. - आत्माराम पाटील, शेतकरी, कापडणे, जि. धुळे.
कांदा काढणी
कांदा काढणी

धुळे : जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची काढणी (खांडणी) वेगात सुरू आहे. परंतु सध्या समाधानकारक दर नसल्याने कांदा उत्पादकांना त्याचा फटका बसत आहे. धुळे व शिरपूर बाजार समितीमध्ये कांदा आवक वाढली असून, प्रतिदिन सुमारे एक हजार क्विंटलवर आवक या दोन्ही बाजार समित्यांमध्ये होत आहे. 

धुळे बाजार समितीमध्ये कांद्याला सध्या किमान ३०० व कमाल १००० रुपये क्विंटल आणि शिरपुरातही कमाल दर १००० रुपये क्विंटलपयर्यंत आहे. मागील १० ते १२ दिवसांत दर क्विंटलमागे १०० रुपयांनी कमी झाले आहेत.

धुळे जिल्ह्यातील जैताणे, लामकानी, गोताणे, कापडणे, न्याहळोद, इंधवे, बलसाणे, कढरे या गावांमध्ये लागवड चांगली झाली होती. शिरपुरातील अर्थे, कुवे, भाटपुरा, तरडी, तऱहाडी आदी भागांमध्ये कांद्याची चांगली लागवड झाली होती. ही लागवड यंदा वाढली. कारण कापसाचे पीक शेतकऱ्यांनी काढून पर्यायी पीक म्हणून कांद्याला पसंती दिली. परंतु कांद्याचे दर वाढलेच नाहीत. साक्री तालुक्‍यातील पिंपळनेर व परिसरातही कांद्याची चांगली लागवड झाली होती. पिंपळनेर बाजारात रोजची किमान १००० क्विंटल आवक होत आहे. 

जळगाव जिल्ह्यातील बाजारांमध्येही दर टिकून नाहीत. जिल्ह्यातील यावल तालुक्‍यातील डांभुर्णी, किनगाव, साकळी, चोपडा तालुक्‍यातील अडावद, धानोरा, लोणी, खर्डी, आडगाव, लासूर, घोडगाव भागांत कांद्याची बऱ्यापैकी लागवड झाली होती. सध्या या भागातही खांडणी वेगात सुरू आहे. आगाप लागवडीच्या कांद्याची खांडणी मार्चमध्येच सुरू झाली. 

चोपडा तालुक्‍यातील कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अडावद येथील उपबाजारामध्ये आवक चांगली असून, प्रतिदिन सुमारे ८०० क्विंटल आवक सुरू आहे. आवक चांगली असल्याने लिलाव सकाळीच सुरू होतात. व्यापारी शेतकऱ्यांना लिलावानंतर लागलीच रोकड देण्याची असमर्थता दाखवित आहेत. सेम डे चेक काही व्यापारी देतात. परंतु काही व्यापारी आठवडाभराचे (पोस्ट डेटेड) धनादेश देत आहेत. त्यात चुकारे किंवा पैसे मिळण्यासंबंधी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे, यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com