...अखेर सुवर्णाची मृत्यूशी चाललेली झुंज थांबली

...अखेर सुवर्णाची मृत्यूशी  चाललेली झुंज थांबली
...अखेर सुवर्णाची मृत्यूशी चाललेली झुंज थांबली

पुणे : चिनी नायलॉन मांजा गळ्याभोवती अडकून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ‘सकाळ’च्या कर्मचारी सुवर्णा मनोहर मुजुमदार (वय ४५, रा. प्रज्ञा अपार्टमेंट, कांडगे पार्क, सिंहगड रस्ता) यांचा चार दिवसांपासून सुरू असलेला जगण्यासाठीचा संघर्ष अखेर रविवारी थांबला. डॉक्‍टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांना सुवर्णाचे प्राण वाचविण्यात अपयश आले.  दरम्यान, सुवर्णा यांच्या मृत्यूप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये रविवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सुवर्णा मुजुमदार या मागील बुधवारी ‘सकाळ’च्या बुधवार पेठ येथील कार्यालयातून शिवाजीनगर कार्यालयाकडे जात असताना शिवाजी पुलावर त्यांच्या गळ्याभोवती चिनी मांजा अडकून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या गळ्यावर शस्त्रक्रियाही झाली. त्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. अखेर रविवारी (ता. ११) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुजुमदार यांच्या पश्‍चात वडील मनोहर मुजुमदार व दोन बहिणी असा परिवार आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सुवर्णा यांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्या कुटुंबीयांसह आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी व सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला. सर्वांनीच तत्काळ रुग्णालयात आणि त्यानंतर घरी धाव घेतली. त्यांच्या कुटुंबीयांचे दुःख पाहून उपस्थितांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली. तर वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी आणल्यानंतर सहकारीही दुःखात बुडाले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी ‘सकाळ’च्या संपादकीय, जाहिरात, वितरण आदी विभागांचे प्रमुख, वरिष्ठांसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  सुवर्णा यांनी अहिल्यादेवी प्रशालेतून प्राथमिक, तर नूमविमध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेतले. पुढे एमईएस गरवारे महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले. प्रारंभी गावकरी, त्यानंतर मोना ॲडव्हर्टाझिंगच्या जाहिरात विभागामध्ये कार्यरत होत्या. तर ‘सकाळ’मधील जाहिरात विभागात त्या दहा वर्षांपासून कार्यरत होत्या. सरकारने याप्रकरणी गंभीर भूमिका घेऊन मांजा विक्री थांबविण्यासाठी उच्च पातळीवरून प्रयत्न करावेत. आमच्या बहिणीचा गेलेला जीव परत येणार नाही, परंतु तिच्यासारखी वेळ इतरांवर येऊ नये, यासाठी मांजा हद्दपार करावा.'  - दर्शना परदेशी व अपर्णा बापट (सुवर्णा मुजुमदार यांच्या भगिनी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com