विठ्ठला या सरकारला सुबुध्दी दे ! स्वाभिमानीच्या दूध बंद आंदोलनास प्रारंभ

विठ्ठला या सरकारला सुबुध्दी दे ! स्वाभिमानीच्या दूध बंद आंदोलनास प्रारंभ
विठ्ठला या सरकारला सुबुध्दी दे ! स्वाभिमानीच्या दूध बंद आंदोलनास प्रारंभ

पंढरपूर, जि. सोलापूर : कर्नाटक व केरळच्या धर्तीवर राज्यातही दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज (सोमवार) पासून पुकारलेल्या बेमुदत दूध बंद आंदोलनास खासदार राजू शेट्टी यांनी विठूराया दुग्धाभिषेक करुन प्रारंभ केला. 'विठ्ठला या सरकारला सुबुध्दी दे', अशी विनवणी आपण विठूरायाला केल्याचे खा. शेट्टी यांनी सांगितले.

यावेळी बोलताना खा. शेट्टी म्हणाले की, विठ्ठल मंदिरात नामदेव पायरीशी दर्शन घेऊन दुग्धाभिषेक घातला. दूधाचा उत्पादन खर्च 35 रुपये आणि दर मिळतोय 17 रुपये, पांडुरंगा महाराष्ट्रातील तमाम दूध उत्पादक निम्म्या दराने दूध विकतोय, अशी कैफियत, व्यथा मी मांडली आणि तूच आता यात लक्ष घाल असं साकडं श्री विठ्ठलाला घातलं. सरकारने निर्णय घ्यावा नाही तर येत्या आषाढी वारीला मुख्यमंत्री पंढरपुरात येतात, त्यावेळी काय करायचं ते पाहू. आंदोलन बेमुदत असेल, मुंबईला थेंबभरही दुध जाणार नाही. फुकट घ्या, पण विकत मिळणार नाही. आम्ही आधी जाहिर केल्याप्रमाणे आज मध्यरात्री आंदोलन होणार होते. पण आमच्या कार्यकर्तांना नोटीसा पाठव, अटक कर, धमकी दे, या प्रकारे पोलिसांनी माकड चाळे केल्याने आधीच आंदोलन सुरु झाले. महादेव जानकर म्हणतात, आमच्या आंदोलनाला तोंड देण्यासाठी माझे कार्यकर्ते मैदानात उतरवतो....मी म्हणतो आणाच तुमचे कार्यकर्ते मैदानात..मोजायचेत आम्हाला.., असे खा. शेट्टी म्हणाले.

दरम्यान, राज्यातील दूध संघांनी तीन रुपयांनी खरेदी दरात वाढ करण्याची तयारी दर्शविली असली, तरी खा. शेट्टी हे प्रति लिटर पाच रुपये वाढीवर ठाम आहेत

आंदोलन रविवारी मध्यरात्री सुरु होणार होते, मात्र अनेक ठिकाणी स्वाभिमानीच्या आंदोलकांनी दूधाचे टॅंकर अडवले, दुग्धाभिषेक करुन आंदोलनास त्या-त्या भागात प्रारंभ केला. राज्यातील विविध भागात पोलिसांनी स्वाभिमानीसह किसान सभा आदी संघटनांच्या कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या. यात काहींना ताब्यात घेण्यात आले.

या आंदोलनात सहभागी शेतकरी दूध घालणार नाहीत. मुंबई, पुण्याकडे जाणारे टँकर पुढे जाऊ दिले जाणार नाहीत. पुरुष कार्यकर्त्यांसोबत महिलांची आघाडीसुद्धा आंदोलनात सहभागी होत आहे. आंदोलन दडपण्याची शक्यता लक्षात घेऊन स्वाभिमानीने ए, बी, सी, डी अशा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आंदोलकांची फौज तयार करून गनिमी काव्याने लढण्याची तयारी केली.    दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस खासदार राजू शेट्टी व स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी विशेष करून दूध उत्पादन अधिक असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये जागोजागी सभा घेतल्या. प्रत्येक ठिकाणच्या सभांना दूध उत्पादकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने हे आंदोलन राज्यात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात अधिक तीव्रतेने होण्याची शक्यता अाहे. 

खा. शेट्टींनी कोल्हापूर, इस्लामपूर, शिराळा, सांगली, पुणे, सोलापूर, सातारा, नगर जिल्‍ह्यात ठिकठिकाणी सभा घेऊन वातावरण तापवले. तर रविकांत तुपकरांनी औरंगाबाद, बीड, भूम, उस्मानाबाद, परंडा, बार्शी, सोलापूर, जामखेड, नगर, मंगळवेढा, सांगोला या भागांचा दौरा पूर्ण केला असून त्यांनीही दूध पट्टा पिंजून काढला. या दोघांनी त्या-त्या भागात जाऊन आंदोलनाची रणनिती तयार केली अाहे. राज्यात उत्पादित होणारे दूध मुंबई व मोठ्या शहरात जाऊ दिले जाणार नाही.

तसेच, परराज्यातून दररोज येणारे साधारणतः दीड लाख लिटर दुधाचाही पुरवठा होणार नाही. यासाठी गुजरातमधून हार्दीक पटेलने या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे स्वाभिमानीचे नेते सांगत अाहेत. अशीच रणनीती कर्नाटक, मध्य प्रदेशातूनही अाखण्यात अाली अाहे. अांदोलनाची सुरवात पश्चिम महाराष्ट्रातून होत असली तरी याच्या सोबतीला विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातही दुधाचे हे आंदोलन पेटविण्याची रणनीती तयार करण्यात अाली अाहे. 

अांदोलनाच्या अनुषंगाने झालेल्या सभांमधून खा. शेट्टी यांनी अर्थशास्त्रीय मांडणीतून दुधाची आकडेवारी शेतकऱ्यांना समजावून सांगितली. तर तुपकरांनी नेहमीच्या अाक्रमक शैलीने शेतकऱ्यांना पेटवण्याचे काम चालविले आहे. सरकारने दूध पावडर निर्यातीवर ५० रुपये प्रतिकिलो तर दूध निर्यातीवर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले. मात्र, सरकारची ही घोषणा कशी फसवी आहे. याचा फायदा काही दूध संघानाच होणार असे स्वाभिमानीचे नेते शेतकऱ्यांना पटवून सांगत अाहेत. स्वाभिमानीने पुकारलेले हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी सरकारच्या पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहे. मंत्री महादेव जानकर हे राजू शेट्टींचे मित्र असल्याने सरकार त्यांच्याच माध्यमातून मध्यस्थीसाठी प्रयत्न करीत अाहे. परंतु, अद्याप याला कुठलेही यश अालेले नाही.   

आंदोलनातील घडामोडी...

  • शिर्डी, जि. नगर : साईबाबा मंदिरासमोर दुग्धाभिषेक करण्याचा प्रयत्न. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि मोरेंसह काही कार्यकर्ते ताब्यात. पाथर्डी तालुकाध्यक्ष शरद मरकड यांनाही केली अटक.
  • नगर : अकोल्यात दुध संघाचा आंदोलनाला पाठींबा. डॉअजित नवले यांची माहिती
  • नगर : अकोले तालुक्यातील इंदुरी गावात दूधाचे गावकऱ्यांनी मोफत वाटप केले. नगर जिल्ह्यात आंदोलनास प्रारंभ
  • नांदेड : स्वाभिमानीचे दूध आंदोलन नांदेड जिल्ह्यात सुरू. पार्डी व मालेगाव जवळ (ता.अर्धापुर) शिवामृत दूध व मदर डेअरी वाहतूक करणा-या वाहनाच्या ड्रायव्हर आणि क्लिनर यांनाच आंदोलनात सहभागी करून घेतले
  • कोल्हापूर : जयसिंगपुरात टँकरवर दगडफेकीनंतर पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड. पोलीस कारवाईच्या शक्यतेने अनेक प्रमुख कार्यकर्त्यांचे मोबाईल स्विचऑफ
  • सोलापूर : रिधोरे (ता माढा) येथे नेचर दुधच्या व्हॅन मधील दूधाच्या पिशव्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री रोडवर फेकुन दिल्या. 
  • ​कोल्हापूर : कुरुंदवाड स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कुरुंदवाड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिषेक घालून आंदोलनास रात्री १२ वा. प्रारंभ
  • नवलेंना नोटीस.. नगर : दूध उत्पादकांच्या आंदोलनांमध्ये सहभागी होऊ नये यासाठी राज्यभर किसान सभेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्यामार्फत नोटिसा. डॉ.अजित नवले यांनाही नोटीस बजावली. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर अशाप्रकारे नोटिसा बजावून दडपशाही करण्याचा प्रयत्न होत आहे. किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती पोलिसांच्या या कारवाईचा निषेध करत आहे : डॉ.अजित नवले 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com