पुरस्कारप्राप्त गावांनी विकासकामांत सातत्य ठेवावे : हरिभाऊ बागडे

स्वच्छ ग्राम पुरस्कार वितरण
स्वच्छ ग्राम पुरस्कार वितरण

औरंगाबाद  : गावांमधील घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रयत्न व्हायला हवेत. पाणीपुरवठा योजनांचे मोजमाप करताना योजना किती पूर्ण झाल्या, असे न बघता किती योजना बारमाही किंवा आठमाही पाणीपुरवठा करू शकतात हे पहायला हवे. यंत्रणांनी त्याचा आढावा घ्यावा. स्वच्छ ग्राम पुरस्कारप्राप्त गावांनी विकास कामांत सातत्य ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.  

येथील जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज नाट्यगृहात शनिवार (ता. ८) राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या वेळी राज्य शासनातर्फे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत दिला जाणारा २०१६-१७ चा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार नगर जिल्ह्यातील हिवरेबाजार ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात आला. २५ लाख रुपये, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. राज्यस्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांना दिला जाणारा प्रथम पुरस्कार नाशिक जिल्हा परिषदेला प्रदान करण्यात आला.

राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी व नांदेड जिल्ह्यातील शेळगाव गौरी या ग्रामपंचायतींना तर तृतीय पुरस्कार रायगड जिल्ह्यातील धाटाव व राजगड या ग्रामपंचायतींना विभागून देण्यात आला. तसेच नाशिक जिल्ह्यातील अवनखेड, अमरावती जिल्ह्यातील अचलपूर व बुलडाणा जिल्ह्यातील पांगारखेडा या तीन ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कार देण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षणात विभागीय स्तरावर उत्कृष्ट कार्य केलेल्या जिल्हा परिषदांना पुरस्काराने गौरवण्यात आले, त्यात पुणे विभागातून कोल्हापूर, कोकण विभागातून रायगड, नाशिक विभागात नगर, नागपूर विभागातून चंद्रपूर, अमरावती विभागातून बुलडाणा तर औरंगाबाद विभागातून उस्मानाबाद जिल्हा परिषदेला पुरस्कार प्रदान करण्यात आले.

विभागस्तरावर महसुली विभागातून प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पुरस्कार प्रदान करून सरपंच व ग्रामसेवकांचा गौरव करण्यात आला. यामध्ये अमरावती विभागातून बुलडाणा जिल्ह्यातील पांगारखेड (प्रथम), अमरावती जिल्ह्यातील अचलपूर (द्वितीय), नागपूर विभागातून भंडारा जिल्ह्यातील शिवनी (प्रथम), चंद्रपूर जिल्ह्यातील राजगड (द्वितीय), औरंगाबाद विभागातून लातूर जिल्ह्यातील धामनगाव (प्रथम), नांदेड जिल्ह्यातील शेळगाव गौरी (द्वितीय), नाशिक विभागातून नगर जिल्ह्यातील हिवरेबाजार ( प्रथम ), नाशिक जिल्ह्यातील अवनखेड (द्वितीय), पुणे विभागातून सातारा जिल्ह्यातील मान्याची वाडी (प्रथम), पुणे जिल्ह्यातील कान्हेवाडी ( द्वितीय) आणि कोकण विभागातून रायगड जिल्ह्यातील धाटाव (प्रथम) व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंदुर्ले ग्रामपंचायत (द्वितीय) पारितोषिक प्रदान करून गौरवण्यात आले.

या वेळी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, आमदार अतुल सावे, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, पाणीपुरवठा विभागाचे अपर सचिव श्‍यामलाल गोयल, उपसचिव अभय महाजन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर व आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार उपस्थित होते.

या वेळी श्री. लोणीकर म्हणाले, की तीन वर्षांत १८ लाख कुटुंबाच्या गाठीभेटी घेतल्या गेल्या. मोठ्या जागृतीमुळे ६० लाख शौचालये राज्यात निर्माण केली गेली. ४४७२ कोटी रुपयांचा निधी शौचालये बांधणीसाठी दिला. १३५२ कोटींचा हप्ता नुकताच केंद्राकडून प्राप्त झाला असून तो जिल्हा परिषदांकडे पाठविला जात आहे. ७ हजार कोटींच्या पाणीपुरवठा योजनांच्या आराखड्यांना मंजुरी मिळाली आहे. तीन वर्षांत केंद्र व राज्य सरकारने आमच्या विभागासाठी २० हजार ४३२ कोटी रुपये दिले आहे. वॉटर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील शेती, उद्योग, पिण्याचे पाणीप्रश्‍न निकाली काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चार महिन्यांपासून इस्त्राईलचे पथक पाहणी करीत आहे. त्याचा पहिला अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

पोपटराव पवार म्हणाले, की संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व संत तुकाराम वन ग्राम पुरस्कारासाठी लोकसंख्येच्या निकषात बदल करायला हवा. पाच हजार लोकसंख्येपर्यंतचा एक गट व त्यापुढील लोकसंख्येच्या गावांचा एक गट अशी विभागणी करावी. ज्यामुळे मोठ्या लोकसंख्येची गावेही पुरस्कारापर्यंत पोचू शकतील. या वेळी प्रास्ताविक अभय महाजन यांनी केले.  सूत्रसंचालन निता पानसरे यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com