देशी गायी, म्हशींच्या वंशावळ सुधारणेला शासनाकडून गती : जानकर

देशी गायी, म्हशींच्या वंशावळ सुधारणेला शासनाकडून गती : जानकर
देशी गायी, म्हशींच्या वंशावळ सुधारणेला शासनाकडून गती : जानकर

पुणे : देशी गायी, म्हशींच्या वंशावळ सुधारण्याच्या कामाला राज्य शासनाने गती दिली आहे. आगामी काळात पशुपालकांना उच्च दर्जाच्या आणि दर्जेदार तसेच अधिक दूध उत्पादन क्षमतेच्या गायी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी येथे केले.

‘राष्ट्रीय गोकूळ मिशन’अंतर्गत मंजूर निधीतून ताथवडे (ता. मुळशी, जि. पुणे) येथील पशू प्रक्षेत्रावर (कॅटल फार्म) उभारण्यात येणाऱ्या पशूंच्या गोठ्याचे भूमिपूजन श्री. जानकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. माजी आमदार शरद ढमाले, पशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमाप, अतिरिक्त आयुक्त डी. एम. चव्हाण, ताथवडे फार्मचे व्यवस्थापक श्री. विधाते आदी या वेळी उपस्थित होते.

राष्ट्रीय गोकूळ मिशनअंतर्गत ताथवडे येथील ‘कॅटल फार्म’मध्ये ६०० पशूंची जोपासना करता येईल, असे गोठे बांधण्यात येणार आहेत. यासाठी २ कोटी ४६ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या ठिकाणी सध्या ९५ म्हशी संगोपनासाठी घेण्यात आल्या आहेत. पशूंच्या प्रजनन कालावधीनंतर अधिक पशू घेण्यात येणार आहेत. लष्कराच्या गायीदेखील या गोठ्यासाठी हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. हा गोठा अत्यंत आधुनिक पद्धतीने बांधण्यात येणार असून, संपूर्णत: तांत्रिक पद्धतीने जोपासना केली जाणार आहे.

गोठ्याच्या उभारणीसाठी पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून (सीईओपी) तांत्रिक सल्ला, आराखडा तयार करून घेण्यात आला आहे. पशुंना जागेवर जाऊन पशुखाद्य देण्यासाठी ट्रॅक्टरला जोडण्यात येणारे आधुनिक यंत्र वापरले जाणार असून, हिरवा चारा, वाळला चारा तसेच पशुखाद्य (खुराक) योग्य प्रमाणात मिसळून देण्याची या यंत्रामध्ये व्यवस्था असणार आहे. जनावरांची विष्ठा (शेण) ट्रॅक्टरचलित यंत्राच्या साह्याने उचलण्यात येणार आहे. तसेच दूध काढण्यासाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था करण्यात येणार असून, यंत्रांच्या साह्याने दूध काढण्यात येणार आहे.

गीर, साहिवाल या अधिक दूध देणाऱ्या गायींसोबतच खिलार, डांगी, देवणी या देशी गायी वंशावळ सुधारणेसाठी विकत घेण्यात येणार आहेत. या गायींच्या गर्भधारणेसाठी उत्कृष्ट वळूच्या रेतनाचा उपयोग करण्यात येणार आहे. याशिवाय मानवामध्ये अवलंब करण्यात येणाऱ्या आयव्हीएफ तंत्रज्ञानाचाही अवलंब करून वंशावळ सुधारणेचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती फार्मचे व्यवस्थापक श्री. विधाते यांनी दिली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com