आधी धान्य घ्या, पैसे ऊस बिलातून घेतो...

तातडीने पैसे देणे शक्‍य नसल्याने अनेकदा ज्वारी खरेदी लांबणीवर टाकावी लागते. पण संस्थेच्या अशा उपक्रमामुळे उसाची बिले तटली तरी चांगल्या शाळूची उपलब्धता सहज होते. - शिवाजी माणगावे, सभासद, महावीर सोसायटी, रुई, ता. हातकणंगले
आधी धान्य घ्या, पैसे ऊस बिलातून घेतो...
आधी धान्य घ्या, पैसे ऊस बिलातून घेतो...

कोल्हापूर : केवळ उसाचे उत्पादन घेतल्याने आलेल्या पैशातून धान्याची खरेदी करायला शेतकऱ्याला बाजारपेठा गाठाव्या लागतात. ही अडचण ओळखून हातकणंगले तालुक्‍यातील सुमारे वीस हून अधिक सेवासंस्थांनी उसाचे पैसे जमा होईपर्यंत त्यांना उधार स्वरूपात धान्य देण्याचा उपक्रम गेल्या काही वर्षापासून सुरू केला आहे.  बार्शीची दर्जेदार ज्वारी व काही प्रमाणात गव्हाचा पुरवठा शेतकरी सभासदांना केला जातो. ज्या वेळी उसाचे बिल येइल त्या वेळी धान्याची रक्कम बिलातून वजा केली जाते. हातात पैसे नसले तरी गावात मिळणाऱ्या या सोयीमुळे तालुक्‍यातील हजारो शेतकऱ्यांना याचा लाभ होत आहे.  तालुक्‍यातील अनेक सेवासंस्थांची स्वस्त धान्य दुकाने आहेत. या धान्य दुकानांमार्फत शासकीय धान्य विक्री केली जाते. ही विक्री रोख स्वरूपातच केली जाते. हे करत असताना काही संस्थांनी सभासदांकरिता अशी काही योजना राबविता येते का असा विचार करून सभासदांना चांगल्या प्रतीची ज्वारी व गहू उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.  दर्जेदार ज्वारीची बार्शीतून खरेदी राज्यात दर्जेदार ज्वारीसाठीची (शाळू) बार्शी ही प्रमुख बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत फेब्रुवारीच्या शेवटच्या सप्ताहापासून ते मार्चच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत ज्वारीचा चांगला बाजार भरतो. येथे चांगल्या प्रतीची ज्वारी विक्रीस येते. संस्थेचे प्रतिनिधी या बाजारात जाऊन चांगल्यातील चांगली ज्वारी खरेदी करतात. संस्थेच्या स्वभांडवलातून ही खरेदी होते. ही ज्वारी संस्थांच्या गोडाऊनमध्ये आणून ठेवली जाते. प्रत्येक संस्था सभासदांच्या संख्येनुसार पंधरा ते वीस टन ज्वारीची खरेदी या बाजारपेठाच्या माध्यमातून करतात. सभासदांना जितकी गरज आहे तितकी ज्वारी सभासदांना संस्थेत उपलब्ध करून दिली जाते. ना नफा ना तोटा या उक्तीप्रमाणे हा व्यवहार चालतो. वाहतूक खर्च वजा करून सभासदांना ज्वारी उपलब्ध करून दिली जाते. यामुळे रोख रककम नसली तरी शेतकऱ्याला ज्वारी मिळते. तसेच अलीकडे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार गव्हाचाही पुरवठा केला जात आहे. प्रतिक्रिया ज्या शेतकऱ्यांची बाहेर जाऊन शाळूची खरेदी करण्याची मानसिकता नसते, अशा शेतकऱ्यांना आमचा उपक्रम उपयुक्त ठरत आहे. केवळ सेवा म्हणून आमच्यासह तालुक्‍यातील अन्य संस्था हा उपक्रम राबवत आहेत.  - राजू मडके , सचिव, महावीर सोसायटी, रुई, ता. हातकणंगले

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com