निर्यातक्षम मोसंबीसाठी एकच बहर घ्यावा : डाॅ. एम.बी. पाटील

 मोसंबी बहर व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करताना फळ संशोधन केंद्रांचे प्रमुख डॉ. एम.बी. पाटील.
मोसंबी बहर व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करताना फळ संशोधन केंद्रांचे प्रमुख डॉ. एम.बी. पाटील.

जालना :  निर्यातक्षम मोसंबी उत्पादनासाठी एकाच बहराचे उत्पादन घेणे आवश्यक आहे. आंबे बहरापासूनच निर्यातक्षम मोसंबी उत्पादन मिळते. निर्यातीसाठी मोसंबी उत्पादक संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन औरंगाबाद येथील फळ संशोधन केंद्रांचे प्रमुख डाॅ. एम. बी. पाटील यांनी केले.

सकाळ अॅग्रोवन आणि कृषी विभाग, आत्मा, चितळे जिनस एबीस इंडिया यांच्या वतीने येथील आझाद मैदानावर आयोजित कृषी प्रदर्शनामध्ये शुक्रवारी (ता. १९) मोसंबी बहर व्यवस्थापन या विषयावरील चर्चासत्रामध्ये डाॅ. पाटील बोलत होते.

डाॅ. पाटील पुढे म्हणाले, मोसंबीची लागवड करत असताना डोळा जमिनीपासून नऊ इंच अंतरावर तसेच तो पश्चिम दिशेकडे राहील याची काळजी घ्यावी. मोसंबीमध्ये खरिपात सोयाबीन, मूग, उडीद ही, तर रब्बीत हरभरा पीक घ्यावे. परंतु कापूस, मका, गहू, ज्वारी ही पिके घेऊ नयेत. झाडापासून दोन फूट अंतर ठेवून आंतरपिके घ्यावीत. मोसंबी हे पीक पाण्याला अतिसंवेदनशील आहे.

मोसंबीसह पेरू, डाळिंब, द्राक्षे आदी पिकांचे उत्पादन घेतले जात असल्यामुळे आता जालना जिल्ह्याची ओळख फ्रूट बास्केट म्हणून झाली आहे. परंतु मोसंबीची हेक्टरी उत्पादकता कमी आहे. कमी उत्पादकतेची कारणे शोधली पाहिजेत. जिल्ह्यातील मोसंबीची निर्यात झाली पाहिजे. निर्यातक्षम मोसंबी उत्पादनाचे तंत्र अवगत करून घेतले पाहिजे. पाणी कमी असेल तर मृग बहराचे उत्पादन घ्यावे, असा सल्ला डॉ. पाटील यांनी दिला.

पाण्याची उपलब्धता जास्त असल्यास आंबे बहरापासून उत्पादन घ्यावे. नोव्हेंबर महिन्यात पाण्याचा ताण देऊन बागेस विश्रांती द्यावी. ३ आठवडे तापमान १४ अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्यास चांगला बहर येतो. झाडे ताणावर आली की नाही हे १० डिसेंबरनंतर समजते. ठिबक सिंचन पद्धतीने मोसंबीचे चांगले उत्पादन मिळते. पुरेसे पाणी उपलब्ध असल्यास हमखास आंबे बहराचे उत्पादन घ्यावे. आंबे बहराच्या फळांना चांगला बाजारभावदेखील मिळतो. ३० ते ४० लिटर पाणी देत असताना एका झाडास १६०० ग्रॅम युरिया, २ किलो सुपर फास्फेट, ८०० ग्रॅम पोटॅशची मात्रा द्यावी. युरियाची मात्रा दोन वेळा विभागून द्यावी.

प्रत्येक झाडास २५० सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते. ५० किलो शेणखत, २० किलो गांडूळखत तसेच निंबोळी खताची गरज असते. ठिबकसिंचन पद्धतीने १९ः १९ः १९ या विद्राव्य खताची शिफारशीनुसार मात्रा देत असताना १० मिनिटे रिकामे ठिबक चालवून त्यानंतर व्हेंच्युरी जोडावी.

मोसंबीच्या झाडास १ ते दीड लाख फुले लागतात. त्यापैकी १ टक्का फुलांची फळधारणा होते. शिफारशीनुसार खतांच्या मात्रा पूर्ण केल्यास फळगळ कमी होते. आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस पडल्यास फळसड होते. फळसड थांबविण्यासाठी गंधकाची फवारणी करावी. सप्टेंबर आणि आॅक्टोबरमध्ये कोळीचा प्राद्रुर्भाव वाढतो. त्यामुळे फळांवर काळे डाग पडतात. फळांचे नुकसान होत नसले तरी बाजार कमी मिळतात. बोर्डोपेस्ट हे चांगले बुरशीनाशक आहे. डासांमुळेदेखील मोसंबी फळांचे नुकसान होते. परंतु सायंकाळी ६ ते ८ या वेळेत धूर केल्यास डासांचे नियंत्रण शक्य आहे. परंतु त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे डॉ. पाटील यांनी नमूद केले.

निर्यातक्षम मोसंबी उत्पादनांसाठी एकाच बहरावर म्हणजेच आंबे बहरावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. मोसंबी उत्पादक संघाच्या माध्यामातून एकत्र येणे आवश्यक आहे. मोसंबी फळातील सी व्हिटॅमिन आजारावर उपयुक्त आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूची साथ आली की मोसंबीचे दर वाढतात; परंतु आजारी पडल्यानंतर मोसंबी खाण्यापेक्षा जारी पडू नये म्हणून मोसंबी खायला शिका, असेही डाॅ. पाटील यांनी नमूद केले.

मोसंबी रोपे स्वतः तयार करावीत मोसंबीची न्युसेलर ही जात सर्वांत चांगली आहे. या वाणाच्या फळास चांगला बाजारभावदेखील मिळतो. रंगपूर लाईमच्या खुंटावर मोसंबीची वाढ एकसमान होते. चांगल्या रोपांवरच फळबागेचे यश अवलंबून असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः मोसंबीची रोपे तयार करावीत, असा सल्ला डॉ. एम. बी. पाटील यांनी दिला. तसेच मोसंबीतील लिमोलिन घटकामुळे प्रक्रिया पदार्थाची निर्मिती करता येत नाही. लागवडीपासून पाणी, खताचे नियोजन आणि फळगळ रोखण्याचे उपाय वेळीच केल्यास मोसंबीचे हेक्टरी १५ टनांपर्यंत उत्पादन घेता येणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com