मराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकर

मराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकर
मराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकर

औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गाव-वाड्यांमध्ये गत आठवड्याच्या तुलनेत २६ गाव-वाड्यांची भर पडली आहे. ५६९ गाव-वाड्यांमधील १० लाख ६ हजारांवर लोकांची तहान आता टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. दिवसागणिक टॅंकरची संख्या वाढत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ४३८ टॅंकर पाणीटंचाई निवारण्यासाठी सुरू करण्यात आले आहेत. बीड, जालना, नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्यातही पाणीटंचाईने हळूहळू हातपाय पसरविणे सुरू केले आहे.

अल्प प्रमाणात झालेल्या पावसामुळे यंदा मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची अवस्था दयनीय आहे. भूगर्भातील पाणीपातळीही घटली आहे. त्याचा थेट परिणाम डिसेंबरच्या दुसऱ्याच आठवड्यात ५६९ गाव-वाड्यांना पिण्याचे पाणी टॅंकरने पुरविण्याची वेळ येण्यावर झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ३४५ गाव व २२ वाड्यांमधील तब्बल ७ लाख १६ हजार ५१५ लोकांना तूर्त टॅंकरने पाणी पुरवावे लागत आहे. बीड जिल्ह्यातील १०८ गावे व ४० वाड्यांमधील २ लाख १४ हजार ४१८ लोकांची तहान भागविण्यासाठी ११३ टॅंकर सुरू आहेत.

जालना जिल्ह्यातील ४६ गावे व २ वाड्यांमधील १ लाख ३८ हजार ८२७ लोक  टॅंकरवर अवलंबून आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४ गावांमधील लोकांची तहान भागविण्यासाठी टॅंकर सुरू आहेत. नांदेड जिल्ह्यातील एका गावातील १२ हजार ६०० लोकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने २ टॅंकरची व्यवस्था केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील आठ, जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफ्राबाद, परतूर, अंबड, भोकरदन शहर, घनसावंगी, नांदेड जिल्ह्यातील मुखेड, बीड जिल्ह्यातील गेवराई, शिरूर, पाटोदा, आष्टी, केज, परळी वैजनाथ, धारूर, माजलगाव, पाटोदा शहर, उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, कळंब, भूम, वाशी, परंडा आदी तालुक्‍यांना पाणीटंचाईचे मोठ्या प्रमाणात चटके बसत आहेत. 

५६५ विहिरींचे अधिग्रहण मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व नांदेड या पाच जिल्ह्यांत पाणीपुरवठ्यासाठी वापरले जाणारे टॅंकर व त्याव्यतिरिक्त जवळपास ५६५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील २५१, जालना ८७, नांदेड २, बीड १२९, तर उस्मानाबाद जिल्ह्यांतील ९६ अधिग्रहित विहिरींचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com