`कार्यक्षम पाणी वापरात शेतकऱ्यांचे सहकार्य महत्त्वाचे`

राष्ट्रीय सुक्ष्म सिंचन परिषदेतील चर्चासत्रात प्रश्न मांडताना शेतकरी.
राष्ट्रीय सुक्ष्म सिंचन परिषदेतील चर्चासत्रात प्रश्न मांडताना शेतकरी.

औरंगाबाद  : नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सूक्ष्म सिंचनाच्या साहाय्याने शेती करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. ही बाब सुखद असली तरी पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी सूक्ष्म सिंचनाचे महत्त्व समजून घेऊन शेतकऱ्यांनी यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना प्रतिसाद देणेही आवश्‍यक आहे, असा सूर जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) येथे आयोजित राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन कार्यशाळेच्या तांत्रिक सत्रात व्यक्त झाला.

औरंगाबाद येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेच्या निमित्ताने विविध राज्यांतील शेतकऱ्यांच्या सहभागातून मंगळवारी (ता. १५) राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या तांत्रिक सत्राच्या अध्यक्षस्थानी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एस. मगर, सहअध्यक्षस्थानी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सहयोगी डीन डॉ. डी. डी. पवार होते. एमडब्ल्यूआरआरएचे सचिव डॉ. एस. ए. कुलकर्णी, डॉ. सुनील गोरंटीवार उपस्थित होते. 

या वेळी डॉ. कुलकर्णी म्हणाले, की पाणी देण्याच्या पारंपरिक पद्धतीत कालव्याद्वारे स्रोतापासून शेतापर्यंत पाणीपुरवठा करताना केवळ ३० ते ४० टक्‍केच पाणी शेताला मिळते. पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. त्याला कालव्याची लांबी व दुरवस्था कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याला पर्याय म्हणून कालव्याऐवजी पाइपद्वारे पाणीपुरवठा करण्याचा पर्याय समोर आला आहे. सूक्ष्म सिंचनासोबतच देशविदेशात लेझर लॅंड लेव्हलिंगमुळे पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यास मदत होते आहे.

देशभरात जवळपास ६५ तर महाराष्ट्रात जवळपास ४५ प्रकारची पिके सूक्ष्म सिंचनाच्या साहाय्याने घेतली जातात. उसाचे क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दहा लाख हेक्‍टरपैकी जवळपास २ लाख ७५ हजार हेक्‍टरच्या आसपास ऊस क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले आहे. उसाच्या पिकात सबसरफेस ड्रीपचा परिणामकारक वापर दिसून आला आहे. इस्त्राईलचा विचार करता भारतातही सूक्ष्म सिंचनाचे परिणामकारक वापराचे प्रयोग जास्त पहायला मिळतात. इतर देशांप्रमाणे पाण्याचा हिशेब ठेवून तिला आधुनिकतेची जोड देण्याची गरज आहे, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. 

डॉ. गोरंटीवार म्हणाले की, शेती व्यवसाय अनेक पिढ्यांचा असला तरी सूक्ष्म सिंचनाचा वापर करणारी विद्यमान शेतकऱ्यांची दुसरीच पिढी आहे. त्यामुळे सूक्ष्म सिंचन प्रणालीचा वापर, गरजेनुसारच पाणी देण्याचं तंत्र अवगत करण्याची गरज आहे. जमिनीचा मगदूर लक्षात घेऊन एक तासात दोन लिटर किंवा त्यापेक्षा कमी पाणी देणाऱ्या ड्रिपरचा वापर करण्याची आवश्‍यकता आहे. कारण पिकाची पाण्याची गरज अत्यल्प आहे.   या वेळी प्रकाश पाटील, अकोल्याचे मनोज पाटील, हरियानाचे करणजित सिंग, बीडचे पंजाब काकडे यांनी पाण्याची गरज, सूक्ष्म सिंचनाचा वापर व त्यामधील अडचणी याविषयी प्रश्न विचारले. या प्रश्नांचे निरसन करण्याचा प्रयत्न तज्ज्ञांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com