कृषिप्रधान तेलंगणासाठी राज्य सरकार सरसावले

कृषिप्रधान तेलंगणासाठी राज्य सरकार सरसावले
कृषिप्रधान तेलंगणासाठी राज्य सरकार सरसावले

हैदराबाद, तेलंगणा : तेलंगणातील शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी राज्य सरकारने बहुचर्चित ‘रयतू बंधू’ या विशेष योजनेस गुरुवार(ता. १०)पासून दिमाखदार प्रारंभ केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी या शेतकरी केंद्रित योजनेची घोषणा येथे केली.  करीमनगर जिल्ह्यातील हुजूराबाद मंडल येथील इंदिरानगर येथे एका रंगारंग कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. राव यांनी योजनेचे अनावरण केले. जिल्ह्यातील धर्मराजपल्ली गावात मुख्यमंत्र्यांनी अनुदानाच्या धनादेशांचे लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना वितरण करून योजनेस प्रारंभ केला. 

पत्तादार पासबुक रयतू बंधू योजनेसह ‘पत्तादार पासबुक’ हे अत्याधुनिक ओळखपत्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांकरिता सादर करण्यात आले आहे. गुरुवार(ता. १०)पासून राज्यातील ५८ लाख शेतकऱ्यांना १७ सुरक्षा वैशिष्ट्यांसह पत्तादार पासबुक अर्थात टायटल डीड मिळणार असून याअतर्गंत अनुदानांचे धनादेश वितरणासह प्रारंभ करण्यात आला. या पासबुकवर सरकारचे बोधचिन्ह, सामायिक क्यूआर कोड, सामायिक ट्रॅन्झॅक्शन आयडीसह बारकोड यांचा समावेश अाहे. 

९३ टक्के जमीन दावामुक्त एकूण जमिनीच्या ९३ टक्के जमीन (१.४३ कोटी एकर) योग्य व दावामुक्त करण्यात आली आहे. तेलंगणा सरकारने हर्क्युलीन प्रोग्रामद्वारे जमिनीच्या नोंदी व प्रत्यक्षातील स्थिती यामधील तफावत टाळून केवळ शंभर दिवसात (१५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०१७) महसुली नोंदींमध्ये योग्यता आणली. या कार्यक्रमांतर्गत तेलंगणा (हैदराबाद वगळता) मधील ३० जिल्ह्यांतील ५६८ विभागांतील १० हजार ८२३ गावांमध्ये १५२३ गटांद्वारे एकूण २ कोटी ३८ लाख १८ हजार ५५१ एकर एवढ्या जमिनीची मोजणी करण्यात अाली. यासंदर्भातील सुधारणाही करण्यात आल्या असून महसुली नोंदींमध्ये दुरुस्त्या करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली.  

जमीन नोंदीतील प्रमुख मुद्दे : वारसाहक्क, बदल, वाटणी, नाव, विस्तार व सर्व्हे क्रमांक दुरुस्त्या, जमिनींचे हस्तांतरण, जमीन धारणेतील एकत्रीकरण, खात्यांचे अद्ययावतीकरण, डुप्लिकेट खाते रद्द करणे, वारसा हक्काची जमीन, भेट जमीन, अकृषिक जमीन, शासकीय जमीन, समाजाची जमीन, वनजमीन, संपादित जमीन, वक्फ/एन्डॉुमेंट/भूदान जमीन. 

तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलेले योगदान

  • १६ हजार १२४ कोटींचे पीककर्ज माफ, ३५.२९ लाख शेतकऱ्यांना फायदा
  • शेतकऱ्यांना नवीन कर्जाचे २५ पैसे व्याज दराने वितरण
  • गोदावरी आणि कृष्णा नदीवर सिंचनाच्या मोठ्या प्रकल्पांचे बांधकाम
  • १.२३ कोटी एकर शेतजमिनीला अखंडित पाणी पुरवठा करणे
  • जलसाठावाढीसाठी राज्यातील ४६ हजार तलावांची नव्याने कामे
  • खत, बियाण्यांचा वेळेवर पुरवठा
  • असंघटित शेतकऱ्यांच्या विकासासाठी ‘रयतू समन्वय समिती’
  • प्रशिक्षण, संवादासाठी प्रति ५००० एकर क्षेत्रासाठी शेतकरी व्यासपीठ
  • सूक्ष्म सिंचनासाठी शेतकऱ्यांना किमान ८० ते १०० टक्के अनुदान 
  • पॉलिहाऊस शेतीसाठी शेतकऱ्यांना ७५ टक्के प्रोत्साहन अनुदान
  • शेतमाल साठवणुकीसाठी गोदामांच्या साखळीची निर्मिती
  • बाजार हस्तक्षेप निधीची निर्मिती; ५०० कोटींची तरतूद
  • २३ लाख शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा आणि देखभाल
  • अपघातग्रस्त मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे विमा सहाय्य
  • शेतकऱ्यांना ५० ते ९५ टक्के अनुदानावर ट्रॅक्टर, १३९३४ ट्रॅक्टरचे वितरण
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com