दुधासाठी प्लॅस्टिक कॅनच्या वापरावर बंदी आहे : शिवाजी देसाई

दुधासाठी प्लॅस्टिक कॅनच्या वापरावर बंदी आहे : शिवाजी देसाई
दुधासाठी प्लॅस्टिक कॅनच्या वापरावर बंदी आहे : शिवाजी देसाई

पुणे : गावागावांमध्ये असलेल्या दूध संकलनात अद्याप प्लॅस्टिकचे कॅन वापर केला जात असल्याचे दिसून आले आहे. अन्न सुरक्षा व मानदे कायद्याने दुधासाठी प्लॅस्टिक कॅनच्या वापरावर बंदी आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पुणे विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी दिली.     राज्यात दुधाची गुणवत्ता तपासण्यासाठी १६ ते २२ जानेवारीदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली. याअंतर्गत पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील दूध डेअऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्याबाबत श्री. देसाई बोलत होते. दुधाची गुणवत्ता तपासण्याची गरज का निर्माण झाली याविषयी बोलताना श्री. देसाई म्हणाले, की आपल्या आहारात दुधाचे पोषणमूल्य खूप आहे. अशा उच्च पोषणमूल्य असलेल्या आहाराबाबत सर्वसामान्यांच्या मनात कायमच साशंकता राहिली आहे. त्यात भेसळ असल्याचा संशय वेळोवेळी व्यक्त करण्यात आला असून, तशा तक्रारीही काही नागरिकांनी केल्या आहेत. दुधात होत असलेला भेसळीचा प्रकार रोखण्याच्या दृष्टीने ‘एफडीए’चे आयुक्त पल्लवी दराडे यांनी संपूर्ण राज्यात दूध तपासणीची विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पुणे विभागातही किरकोळ विक्रेते, प्रक्रिया केंद्रे, शीतकरण केंद्रे, खासगी दूध संकलन केंद्र या सर्व स्तरातून दुधाचे नमुने घेण्यात आले. सातारा, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, नगर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून पुणे शहराला दुधाचा पुरवठा होतो. त्यामुळे तेथून होणाऱ्या दुधाची गुणवत्ता तपासण्यासाठी शहराला जोडणाऱ्या महामार्गांवरही तपासणी मोहीम राबविण्यात आली. दूध आस्थापनांच्या शंभर टक्के तपासण्या केल्या आहेत. दूध तपासणी मोहिमेची कार्यवाही विषयी बोलताना श्री. देसाई म्हणाले, "भेसळ आणि डेअरीतील अस्वच्छतेमुळे कोल्हापूर येथे ६१५ लिटर दूध जागेवर नष्ट करण्यात आले असून, पुणे विभागातील वेगवेगळ्या केंद्रांवरून दुधाचे २६७ नमुने विश्‍लेषणासाठी घेण्यात आले. त्याअंतर्गत ७६ दूध उत्पादन संस्थांमधून (डेअरी) ९२ नमुने घेण्यात आले आहेत. दूध वितरकांकडून २५, किरकोळ विक्रेत्यांकडून ५६ आणि महामार्गांवरील नाक्‍यांवरून १८ नमुने घेतले आहेत. या मोहिमेमध्ये १३८ खासगी संस्थांमधून २२३ नमुने, २१ सहकारी संस्थांतून ४३ नमुने आणि शासकीय संस्थेतून १ नमुना तपासण्यासाठी घेण्यात आला आहे." श्री. देसाई म्हणाले, की गावागावांमध्ये असलेल्या दूध संकलन केंद्रांपैकी काही ठिकाणी दुधाची प्राथमिक तपासणी होते, तर काही ठिकाणी ती होत नाही. तपासणी होत नसलेल्या ठिकाणांहून हे दूध थेट डेअऱ्यांमध्ये पोचते. गावांमध्ये अद्याप प्लॅस्टिकचे कॅन वापरताना दिसून आले आहे. अन्न सुरक्षा व मानदे कायद्याने दुधासाठी प्लॅस्टिक कॅनच्या वापरावर बंदी आहे. स्टील किंवा ॲल्युमिनियमच्याच कॅनचा वापर करणे आवश्‍यक आहे. दूध केंद्र तपासणीत दुधात भेसळीचे साठे फारसे आढळले नाहीत. मोहिमेतून पुढे काय याबाबत बाेलताना श्री. देसाई म्हणाले की, या मोहिमेतून वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेले नमुने तपासण्यासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेला पाठविण्यात आले आहेत. तेथे त्याची गुणवत्ता तपासली जाईल. त्या आधारावर योग्य गुणवत्ता नसलेल्या संस्थांवर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल. दुधाची गुणवत्ता अप्रमाणित असल्यास त्या संस्थेला त्या प्रमाणात दंड ठोठावला जातो. तर ते दूध असुरक्षित असल्यास संबंधित संस्थेविरुद्ध खटला दाखल करण्याची तरतूद आहे. पुणे विभागात दोन वर्षांमध्ये ९९ खटले निकाली लागले असून, त्यातून १७ लाख ८ हजार ८६६ रुपयांचा दंड वसूल केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com