जित्राबांच्या चाऱ्यासाठी कर्ज घितुया, पण इकनार नाय

जित्राबांच्या चाऱ्यासाठी कर्ज घितुया, पण इकनार नाय
जित्राबांच्या चाऱ्यासाठी कर्ज घितुया, पण इकनार नाय

सांगली ः चार जित्रांब दावणीला हायती. ती जगवली पाहिज्याती. त्यासनी जगवायला बॅंकेतून कर्ज, सावकराकडून व्याजानं पैक घेऊन चारा इकत घितुया. कड्याबाचा दर बी वाढलाया. भागात कुठंबी चारा न्हाय. पंढरपूर, सांगोल्यातून ३ हजार ६०० रुपयांला शेकडा ज्वारीचा कडबा आणतुया. शासनानं चारा छावण्या सुरू केल्या न्हायती. पैका कितीबी जाऊ दे पण जनावरं इकनार नाय, जित्राबं इकली की पुन्हा घेता येत नायती, अशी व्यथा पशुपालक मांडत होते.

जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ आणि जत या पाच तालुक्यांतील लहान आणि मोठी जनावरे मिळून १ लाख ४६ हजार २१९ इतकी आहे. या पाच दुष्काळी तालुक्यांत चालू वर्षी पाऊस न पडल्याने कडब्याचे दर गगनाला भिडले आहेत. तर पशुखाद्याचे दरही भरमसाट वाढल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतात काहीच पीक नसल्याने जित्राबांना चारा मिळत नाही. त्यामुळे पशुपालक चारा शोधण्यासाठी कर्नाटक आणि सोलापूरसह अनेक भागांत जाऊ लागले आहेत. पण त्याठिकाणी देखील पुरेसा चारा उपलब्ध होत नसल्याने पशूपालक चिंतातूर झाले आहे. 

वास्तविक पाहता गेल्या दोन महिन्यांत कडब्याचा २९०० ते ३२०० रुपये शेकडा असा दर होता. परंतु, चारा मिळत नसल्याने पशूपालक चढ्या दराने चारा खरेदी करू करून जित्राबं जगवत आहेत. पण दुधापासून मिळणाऱ्या पैशातून चारा विकत घेऊ लागले आहेत. पण तो चार केवळ पंधरा दिवसांत संपतो आहे. कडब्याला ३६०० रुपये देऊनसुद्धा वैरण मिळत नाही. दुधाचे दर कमी तर कडबा व पशुखाद्याचे दर वाढल्याने आपली जनावरे काडीमोल किमतीने पशुपालक विकतानाचे चित्र दिसत आहे.

तालुकानिहाय पशुधन संख्या
तालुका मोठी जनावरे (गाई व म्हैशी) लहान जनावरे (गाई व म्हैशी)
खानापूर ४७८७० १४७६०
तासगाव ७७४९३ २००९२
जत ११५५४८ ३१७१०
कवठे-महांकाळ ६०५४६ १६१०८
आटपाडी ४९०८५ १३००७
एकूण ३,५०,५४२ ९५६७७

दुधापासून दोन पैसे मिळत आहेत. त्यामुळे जनावरे जगवलीच पाहिजेत. चारा विकत घेण्यासाठी दुधाचे पैसेदेखील कमी पडत आहेत. चाऱ्यासाठी व्याजाने पैसे घेतोय. पण जनावरे विकणार नाही. - संजय पाटील, पशूपालक,  विभूतवाडी, ता. आटपाडी

गोठ्यात ३५ गाई आहेत. त्यांना वैरण कुठून उपलब्ध करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. चारा मिळविण्यासाठी शेजारील राज्यात जातोय पण चारा मिळत नाही. - प्रकाश सावंत, माडग्याळ, ता. जत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com