कीडनाशक वापराची जबाबदारी शेतकऱ्याच्याच माथी नको

द्राक्ष हे निर्यातक्षम पीक असल्याने आम्हाला कीडनाशकांचा वापर जागरूक व सुरक्षितपणेच करावा लागतो. मात्र पीक कोणतेही असो त्यातील लेबल क्लेम शेतकऱ्याला माहीतच असतील असे नाही. मात्र, त्याविषयी तसेच कीडनाशकाचा डोस, वापर याविषयी विक्रेत्यानेच शेतकऱ्याला पूर्ण मार्गदर्शन केले पाहिजे. शेतकऱ्यावर त्याच्या वापराची जबाबदारी ढकलून उपयोगाचे नाही. - सुभाष आर्वे, अध्यक्ष, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ
फवारणी
फवारणी

पुणे ः कीडनाशक खरेदी करतेवेळीस त्याच्या वापरासंबंधीची संपूर्ण जबाबदारी केवळ शेतकऱ्याच्याच माथी मारण्याचा प्रकार पूर्णपणे अयोग्य असल्याची एकमुखी प्रतिक्रिया कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे. उलटपक्षी लेबल क्लेम असलेल्याच कीडनाशकांची विक्री करण्याबरोबर त्याचा वापरही सुरक्षित होत असल्याबाबतचे मार्गदर्शन व त्याची जबाबदारी पीक संरक्षण उद्योगाशी संबंधित प्रत्येक घटकाची अाहे. त्यापासून स्वतःचा बचाव करण्याची भूमिका कोणालाच टाळता येणार नसल्याचे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. यवतमाळ जिल्ह्यात कीडनाशकांच्या विषबाधेमुळे किमान बावीस शेतकऱ्यांना जीव गमवावे लागल्यानंतर संबंधित कृषी रसायन कंपन्या व कृषी निविष्ठा विक्रेते यांची धरपकड करीत त्यांच्यावर कारवाईचा बडगा शासनाने उगारला. त्यामुळे या विक्रेत्यांनी आता सावध पवित्रा घेऊन कीडनाशकांची विक्री करताना त्याच्या वापराविषयीची जबाबदारी सर्वस्वी शेतकऱ्यांवर टाकण्यास सुरवात केली आहे. पुसद तालुक्यात या व्यावसायिकांनी तसे मजकूर असलेले स्टॅंप तयार करून त्यावर स्वाक्षरी घेण्यास सुरवात केली आहे. पीक संरक्षण विषयातील राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ डॉ. सी. डी. मायी म्हणाले, की कायद्यानुसार निविष्ठांची जी काही विक्री केली जाते त्याची जबाबदारी संबंधित कंपनी, कृषी गुणवत्ता नियंत्रण व विक्रेते अशा सर्वांची आहे. ती कोणालाच टाळता येणार नाही. कोणत्या कीडनाशकांना कोणत्या पिकांसाठी लेबल क्लेम आहे, त्यानुसार विक्री होते आहे का, तसेच बनावट कीडनाशके बाजारात उपलब्ध होत आहेत का, अशा सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्याचे काम शासनाचे आहे. यवतमाळ जिल्ह्यात विषबाधा प्रकरण झाल्यानंतर विक्रेत्यांनाही जबाबदार धरण्यात येत असल्याने त्यांनी हा पवित्रा घेतला आहे.

शिफारसीनुसार विक्री हेच महत्त्वाचे  पीक संरक्षण उद्योगातील तज्ज्ञ संदीपा कानिटकर म्हणाल्या, की प्रत्येकाने आपली जबाबदारी अोळखून ती पाळणेही गरजेचे आहे. लेबल क्लेम असेल तरच एखाद्या पिकासाठी कीडनाशकाची विक्री करणे ही विक्रेत्याची जबाबदारी आहे. युरोपीय देशांमध्ये कीडनाशक शिफारस करणारे शासनमान्य तज्ज्ञ असतात. त्यांनी केलेल्या शिफारसीनुसार केवळ निविष्ठांची विक्री करणे केवळ विक्रेत्यांचे काम असते. भारतात अशा प्रकारची कोणतीही व्यवस्था नसल्याने विक्रेत्यांवर मोठी जबाबदारी येते. परभणी येथील डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. बी. बी. भोसले यांनीही कीडनाशकाचा वापर ही केवळ शेतकऱ्याची जबाबदारी नसून, ती सामूहिक जबाबदारीच असल्याचे मत मांडले. तज्ज्ञांनी मांडलेल्या ठळक बाबी 

  • कीटकनाशक कायद्यांतर्गत संबंधित कंपन्या, विक्रेते, शासन अशा प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या केल्या आहेत निश्चित. 
  • शेतकऱ्यांवर काही जबाबदाऱ्या सोपवण्यापेक्षा कीडनाशकांचा सुरक्षित वापर, लेबल क्लेम याविषयी परिसंवाद, कार्यशाळा यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन होण्यासाठी विक्रेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज   
  • संबंधित पिकात लेबल क्लेम असल्याची खात्री केल्यानंतरच विक्री करावी
  • बदलते हवामान, नवे पीक वाण, लागवड तंत्रज्ञान आदी बाबीं बदलत असताना प्राप्त परिस्थितीत फवारणी करण्याविषयी वस्तुस्थितिदर्शक हवे मार्गदर्शन  
  • प्रतिक्रिया शेतकरी मजकुरावर स्वाक्षरी देत नाहीत, केवळ याच कारणासाठी एखादा विक्रेता माल देण्यासाठी तयार नसेल, तर त्याची तक्रार शेतकरी गुणवत्ता नियंत्रण विभागाकडे करू शकतात. कायद्यांतर्गत कीडनाशकाच्या खरेदीवेळी जे पक्के बिल दिले जाते, त्यावर कायद्यात नमूद केलेल्या बाबींव्यतिरिक्त माहिती देण्यास मनाई अाहे.  - सुभाष काटकर, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, कृषी विभाग

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com