युतीबाबत फेरविचार करावा; सेनेतील एका गटाची भूमिका

युतीबाबत फेरविचार करावा; सेनेतील एका गटाची भूमिका
युतीबाबत फेरविचार करावा; सेनेतील एका गटाची भूमिका

मुंबई : भारतीय जनता पक्षाची साथ सोडल्यास जेमतेम ९ लोकसभा मतदारसंघांत जिंकता येईल, अशी स्थिती असल्याने युतीबाबत फेरविचार करावा, अशी भूमिका शिवसेनेतील एका गटाने घेतली असल्याचे विश्‍वसनीयरीत्या समजते. सेनेशिवाय निवडणुकीला सामोरे जावे लागले तर ते कठीण असेल, असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने कबूल केले.  नरेंद्र मोदी यांच्या ध्येयधोरणांविरोधात तयार होत असलेल्या संयुक्त आघाडीत शिवसेनेला जागा मिळणे शक्‍य नसल्याने युतीतील साहचर्याचाच फेरविचार व्हावा, असे मत काही मवाळपंथीय नेत्यांनी मांडले आहे. मोदी यांच्या विरोधात नाराजीची लाट आली तरी शिवसेनेला काही जागा जिंकायच्या असतील तर भाजपशिवाय पर्याय नसल्याचे या गटाचे म्हणणे आहे. पालघर पोटनिवडणुकीत जबरदस्त शक्ती प्रदर्शन करताना शिवसेनेने तडाखेबंद मतं घेतली. मात्र तरीही भाजपचा विजय झाला. या प्रचारादरम्यान भाजपेतर पक्षांनी एकत्र येण्याची हाक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली होती. मात्र, धर्मनिरपेक्ष पक्षांच्या आघाडीत शिवसेनेला स्थान देणे शक्‍य नाही, अशी कॉंग्रेसची भूमिका आहे. पक्षाचे प्रवक्ते अभिषेक मनुसंघवी यांनी मुंबईत स्पष्ट केले, याकडे सेनेतील भाजपवादी गटाने पक्षनेतृत्वाच्या लक्षात आणून दिल्याचे समजते.  कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होणार हे उघड आहे. भाजपने सातत्याने दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध करीत वेगळे लढायचे ठरले तर परस्परांची मते कापली जातील. त्यामुळे भाजपचे नुकसान होणार असले तरी शिवसेनेची खासदार संख्या जेमतेम ९ वर येते आहे, अशी आकडेवारीही पुढे करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपला विरोध करताना, युतीतून बाहेर पडणे कितपत फायद्याचे ठरेल, असा प्रश्‍नही पुढे आला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर ही आकडेवारी सादर केल्यानंतर मात्र सेनेतील महत्त्वाच्या नेत्यांनी आपला निर्णय मान्य असेल, असेही स्पष्ट केले आहे. या पुढे प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढवली जाईल, असे शिवसेनेने अगोदरच स्पष्ट केले आहे, अशी प्रतिक्रिया यासंबंधी विचारणा केली असता प्रवक्त्यांनी दिली.  शिवसेनेचे रागरंग पाहता भाजप मात्र सध्या हवालदील झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे व्यक्तिगत संबंध उत्तम असले तरी सध्या सेना ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे भाजपकडून सांगण्यात येते. काही दिवसांनी संवाद सुरू होईल, अशी अपेक्षाही भाजपमध्ये व्यक्त केली जाते आहे. मात्र सेनेशिवाय निवडणुकीला सामोरे जावे लागले तर ते कठीण असेल, असे एका ज्येष्ठ नेत्याने कबूल केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com