यवतमाळ विषबाधा प्रकरणी आणखी तिघांचा मृत्यू

यवतमाळ विषबाधा प्रकरणी आणखी तिघांचा मृत्यू

यवतमाळ : कीडनाशक फवारणी दरम्यान बाधित झालेल्या तीन शेतकरी, शेतमजुरांचा रविवारी (ता. १) उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिघांच्या मृत्यूमुळे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता १८ वर पोचली आहे. तसेच, २५ जणांची दृष्टी बाधित झाली आहे.

कपाशीवर या वर्षी मोठ्या प्रमाणात कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. एेन हाताशी आलेले हे पीक कीड-रोगाच्या परिणामी हातून जाण्याची स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी पीक वाचविण्यासाठी धडपड चालविली आहे. त्याकरिता पिकावर कीडनाशकांची फवारणी केली जात आहे.

पिकाची उंची सहा फुटांपेक्षा अधिक झाली, त्यातच शेतकऱ्यांनी लागवडीच्यावेळी शिफारशीत अंतरापेक्षा कमी अंतरावर कपाशीची लागवड केली. परिणामी या दाट झाडांमध्ये फवारणी करताना शेतमजुरांच्या शरीरात विषाचा अंश उतरतो. नाकावाटे तसेच घामावाटे विष शरीरात भिनते, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष? जिल्ह्यात मे महिन्यापासून फवारणीमुळे विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांवर उपचार सुरू होते. यातील काही शेतकऱ्यांचा यादरम्यान मृत्यूही झाला. सुरवातीला हे प्रमाण कमी असल्याने शासकीय यंत्रणेने याकडे दुर्लक्ष केले. रविवारी विषबाधितांची संख्या ५६० वर पोचली आहे. त्यासोबतच मृतांचा आकडादेखील १८ वर पोचला आहे.

रविवारी (ता. १) मारेगाव तालुक्‍यातील पिसगाव येथील शेतमजूर शंकर आगलावे (वय ५०) यांचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. वणी तालुक्‍यातील आमलोण येथील दत्तात्रेय गजानन टेकाम (वय ३५) यांचा वणी येथील सुगम हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याची नोंद आहे. कळंब तालुक्‍यातील सावरगाव येथील नामदेव फुलमाळी यांचा यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. विशेष म्हणजे या घटनांमध्ये २५ जणांची दृष्टी बाधित झाली आहे. उशिरा सुचलेले शहाणपण प्रशासकीय यंत्रणा आणि कृषी विभाग विषबाधित शेतकरी, शेतमजुरांना वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याचा आव आणत आहे. त्याअंतर्गत बैठकांचे सत्र सुरू आहे. विशेष म्हणजे रविवारी (ता. १) देखील प्रशासकीय यंत्रणेकडून जागृती करण्यात आली. मात्र, हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. फवारणीदरम्यान सुरक्षेकडे दुर्लक्ष, तंबाखू खाण्याच्यावेळी हातदेखील न धुणे, तसेच दाट झाडांमध्ये फवारणी करताना शेतमजुरांच्या नाकावाटे, घामावाटे विष शरीरात भिनते, असे अनेक निष्कर्ष या पार्श्‍वभूमीवर मांडले गेले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com