मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही दूध संकलनावर परिणाम

मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही दूध संकलनावर परिणाम
मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही दूध संकलनावर परिणाम

औरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या गेलेल्या आंदोलनामुळे मराठवाड्यातील दूध संकलनावर तिसऱ्या दिवशीही परिणाम जाणवला. बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील दूध संकलनातील घट कमालीची असून, काही ठिकाणी दूध मोफत वाटप करण्यासोबतच काही ठिकाणी टॅंकर अडवून दूध रस्त्यावर सोडून देण्याच्या घटना घडल्या.  

औरंगाबाद जिल्ह्यातील दूध संकलनात आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून जवळपास पंधरा ते वीस हजार लिटरची सुरू असलेली घट कायम आहे. शिवाय, जालना जिल्ह्यातील संकलनातही पन्नास टक्‍के घट आहे. बीड जिल्ह्यातील बीड व आष्टी तालुक्‍यात चार ते पाच हजार लिटरचे झालेले संकलन वगळता दूध संकलनातील घट आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासूनच कायम आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील दूध संकलनातही मोठी घट नोंदली गेली आहे.

जिल्ह्यात कार्यरत असलेल्या मोठ्या प्रमाणातील खासगी डेअऱ्यांचे दूध संकलनही जवळपास ठप्पच असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बीड व उस्मानाबाद जिल्ह्यात दूध उत्पादकांनीही मोठ्या प्रमाणात दूध संकलनाकडे पाठ फिरविल्याने दूध संकलनावर परिणाम झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दुसरीकडे शासनाच्या दूध संकलनावर फारसा काही परिणाम झाला नसल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. शिवाय, संकलित केलेल्या दुधाची अपेक्षित पोचही अत्यंत गोपनीय पद्धतीने व पोलिस बंदोबस्तात केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जालना- नागपूर बायपास रोडवर दुधाचे टॅंकर अडविण्यात आले. त्यापैकी एका टॅंकरमधील दूध रस्त्यावर सांडून देण्यात आले. जालना जिल्ह्यातून जवळपास तेरा टॅंकर पोलिस बंदोस्तात अपेक्षित ठिकाणी रवाना करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. पैठण तालुक्‍यात रहाटगाव येथे विद्यार्थ्यांना मोफत दूध वाटून शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. दरम्यान दूध उत्पादकांच्या नजरा शासनाच्या दराविषयीच्या भूमिकेकडे लागल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com