अवैध एचटीबीटी बियाणे एसआयटीला मुदतवाढ

बीटी बियाणे
बीटी बियाणे

मुंबई: परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील जनूक (हर्बीसाईड टॉलरंट ट्रान्सजेनिक जीण, एचटी) वापरून बीटी बियाणांचे अवैधपणे उत्पादन, साठवणूक आणि विक्री केल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) चौकशीसाठी आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. एसआयटी प्रमुख विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांच्या विनंतीनुसार ही दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.  यासंदर्भातील शासन आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे. मात्र, या वाढीव कालावधीची मुदत ३ डिसेंबर रोजीच संपली असल्याने पथकाला आणखी मुदतवाढ मिळणार की एसआयटीकडून चौकशी अहवाल सादर होणार याकडे लक्ष लागले आहे. राज्यातील आघाडीची बियाणे उत्पादक कंपनी असलेल्या महिको मॉन्सँटो बायो टेक (इंडिया) प्रा.लि., मॉन्सँटो हाेल्‍डिंग्ज प्रा.लि., मॉन्सँटो इंडिया लिमिटेड या कंपन्यांसह इतर कंपन्यांचे हर्बीसाईड टॉलरंट ट्रान्सजेनिक जीण असलेल्या बीटी कापूस बियाण्यांचे अनधिकृतपणे राज्यातील उत्पादन, साठवणूक व विक्री यातील सहभाग, भूमिकेची चौकशी करून दोषी कंपन्यांवर कारवाईची शिफारस करण्याची जबाबदारी या एसआयटीवर सोपविण्यात आली आहे. भारतात व्यावसायिक स्तरावर बीटी कापूस बियाणे बीजी-एक आणि बीजी-दोन या दोनच वाणांना विक्रीस परवानगी आहे. तरीही बीटी कापसाच्या बियाण्यांमध्ये परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील असणारे जनूक (हर्बीसाईड टॉलरंट ट्रान्सजेनिक जीण) वापरून बियाण्यांची अवैध विक्री होत असल्याची बाब निदर्शनाला आली आहे. सीआयसीआर संस्थेच्या अहवालानुसार जादू, एटीएम, बलभद्र, अर्जुन, कृष्णा-गोल्ड या पाच ब्रँडेड बीटी कापूस बियाण्यांमध्ये हर्बीसाईड टॉलरंट ट्रान्सजेनिक जीण अस्तित्वात असल्याचे दिसून आलेले आहे.  केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्य सरकारने फेब्रुवारी २०१८ मध्ये विशेष तपास पथकाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता. व्हीआयपी सुरक्षा विभागाचे प्रमुख विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमण्यात आली. समितीमध्ये अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे हे सदस्य सचिव आहेत. समिती नेमताना चौकशीसाठी एका महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. या काळात चौकशी पूर्ण न झाल्याने आणि समितीच्या विनंतीनुसार कृषी खात्याने पाच महिन्यांची मुदतवाढ दिली होती. या कारणामुळे मुदतवाढ मधल्या काळात राज्यात विविध ठिकाणी मराठा आरक्षण आंदोलन सुरू होते. त्यामुळे निर्माण झालेली कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती तसेच राज्यातील व्हीआयपी व्यक्तींसाठी असलेली सुरक्षा व्यवस्था सांभाळणे, अतिरिक्त पदाचे सोपविण्यात आलेले पदभार व विशेष तपास पथकाने यापूर्वी दाखल केलेल्या पोलिस गुन्ह्यांच्या तपास कामासाठी लागणारा कालावधी आदी कारणांमुळे विहित मुदतीत तपास अहवाल सादर करणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे विशेष तपास पथकाचे प्रमुख विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांनी आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. त्यानुसार कृषी खात्याने एसआयटीला ३ सप्टेंबरपासून पुढे तीन महिन्यांचा कालावधी वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com