‘तितली’ चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडकले !

‘तितली’ चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडकले !
‘तितली’ चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडकले !

पुणे  : बंगालच्या उपसागरामध्ये बुधवारी (ता. १०) ‘तितली’ या तीव्र चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. हे वादळ आज पूर्व किनाऱ्यावरील ओडिशाला धडकले आहे. १६५ किमी प्रतितास वाऱ्याचा वेग आहे. १५ मदत पथकांची नियुक्ती, करण्यात आली असून ३ लाख लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. अनेक भागात मुसळधार वृष्टी होत असून, राज्यात सावधानतेचा इशारा.​ अरबी समुद्रातील ‘लुबन’ हे तीव्र चक्रीवादळ ओमानच्या किनाऱ्याकडे सरकत आहे. या दोन प्रणालींमुळे दोन्ही समुद्रांना उधाण आले असून, मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. ‘तितली’च्या प्रभावामुळे पूर्व किनारपट्टीसह महाराष्ट्रात ढगाळ हवामान तयार झाले आहे. शुक्रवारपर्यंत (ता. १२) कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांशी भागातून मॉन्सून परतला आहे. मात्र माॅन्सूनने अद्यापही संपूर्ण देशाचा निरोप घेतलेला नाही. यातच अरबी समुद्रात तयार झालेल्या लुबन वादळाने सर्व बाष्प ओमानकडे ओढून नेल्याने राज्यात दोन दिवस निरभ्र आकाशासह कोरडे हवामान होते. मात्र बंगालच्या उपसागरात ‘तितली’ चक्रीवादळ तयार होतच राज्यात सर्वदूर ढगाळ हवामान तयार झाले अाहे. त्यामुळे कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाली आहे.   अरबी समुद्रात सोमवारी (ता. ८) तयार झालेले ‘लुबन’ चक्रीवादळ अतितीव्र झाले असून, ते ओमानकडे सरकत आहे. बुधवारी (ता. १०) सकाळी हे चक्रीवादळ सलालाह (आेमान) किनाऱ्यापासून ६१० किलोमीटर तर सोकाट्रा (येमन) बेटापासून ५७० किलोमीटर अाग्नेय दिशेला समुद्रात होते. रविवारपर्यंत (ता. १४) ते येमन आणि दक्षिण ओमानच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता असून, अरबी समुद्रात ताशी १३० ते १४५ किलोमीटर वेगाने चक्राकार वारे वाहणार आहे. ‘लुबन’ चक्रीवादळ दूर जात असल्याने त्याचा पश्‍चिम किनाऱ्यावर फारसा परिणाम होणार नाही.

बंगालच्या उपसागरातील ‘तितली’ चक्रीवादळानेही तीव्र स्वरूप धारण केले असून, त्याची तीव्रता आणखी वाढणार आहे. बुधवारी सकाळी ‘तितली’ ओडिशाच्या गोपाळपूरपासून ३२० किलोमीटर, तर आंध्र प्रदेशच्या कलिंगपट्टन्नमपासून २७० किलोमीटर अंतरावर समुद्रात होते. आज (ता. ११) ते किनाऱ्याला धडकणार असून, आेडिशा, आंध्रच्या किनाऱ्यासह पश्‍चिम बंगाल, ईशान्येकडील राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे. किनाऱ्यालगतच्या सखल भागांमध्ये समुद्राच्या लाटांचे पाणी घुसणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

राज्याच्या तापमानातही सातत्याने वाढ होत अाहे. बुधवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३७.७ अंश, तर जळगाव येथे ३७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर परभणी येथे रात्रीचे नीचांकी १६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेल्याचे पुणे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com