तूर खरेदीचा अाज शेवटचा दिवस

तूर खरेदीचा अाज शेवटचा दिवस
तूर खरेदीचा अाज शेवटचा दिवस

अकोला : शासनाने दिलेली मुदतवाढ मंगळवारी (ता. १५) संपत असल्याने या दिवशी सायंकाळी पाच वाजेनंतर तूर खरेदी थांबवली जाणार अाहे. खरेदीला अाणखी मुदतवाढ मिळण्यासाठी शासनाकडे मागणी झालेली असली, तरी शासनाकडून अद्याप कुठलीही घोषणा नसल्याने खरेदी बंद होण्याचीच चिन्हे अधिक अाहेत. शिवाय साठवणुकीसाठी गोदामांचा प्रश्नही अद्याप सुटलेला नाही. वऱ्हाडात अाॅनलाइन नोंदणी केलेल्यांपैकी अातापर्यंत केवळ ४० टक्के शेतकऱ्यांचीच तूर मोजून झाल्याचा अंदाज अाहे. फेब्रुवारी महिन्यापासून तूर खरेदीला सुरवात झाली. या खरेदीसाठी अकोला अाणि वाशीम जिल्ह्यात नाफेडच्या केंद्रावर एकूण ५१ हजार २७८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली अाहे. त्यापैकी अाजवर अकोल्यात ७२२७ अाणि वाशीममध्ये ४७३२ शेतकऱ्यांची अशी एकूण १२४५९ जणांची तूर मोजून झाली. अद्याप ३८ हजार ८०० पेक्षा अधिक शेतकरी वेटिंगवर अाहेत. तूर खरेदीला अाता एक दिवस शिल्लक असून, मोजमाप झालेल्यांच्या संख्येत एक हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांची घट येऊ शकते. तरीही ३७००० पेक्षा अधिक शेतकरी प्रतीक्षेत राहणार अाहेत. सोबतच विदर्भ मार्केटिंग फेडरेशनची केंद्रे असलेल्या ठिकाणी नोंदणी वेगळी अाहे. त्या केंद्रावरही हजारोंच्या संख्येत शेतकरी प्रतीक्षेत अाहेत. 

नाफेडच्या अकोला, तेल्हारा, पिंजर, पातूर, वाडेगाव या केंद्रावर अातापर्यंत १ लाख २४ हजार ८१७ क्विंटल तूर खरेदी झाली अाहे.  तर वाशीम मध्ये रिसोड, मालेगाव, मानोरा, वाशीम या चार केंद्रांवर ७५ हजार ४० क्विंटल तूर खरेदी झाली. उर्वरित केंद्रावर विदर्भ मार्केटिंग फेडरेशनने खरेदी केली.  गोदामात क्षमतेपेक्षा अधिक साठवण कधी नव्हे इतका साठवणुकीचा प्रश्न या वेळी यंत्रणांना त्रस्त करीत अाहे. वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक १३० टक्के माल सध्या साठवलेला अाहे. हे गोदाम गेल्या वर्षातील तुरीने तुडुंब झालेली अाहेत. या तुरीची विल्हेवाट न लावल्याने नवीन खरेदी केलेले धान्य साठवणे अडचणीचे झाले. दर दिवसाला जुन्या तुरीचा दर्जा खालावत चालला अाहे. वखार महामंडळाची गोदामे उपलब्ध नसल्याने खासगी गोदाम भाड्याने घेत माल साठवावा लागत अाहे. ते गोदामही वेळेवर उपलब्ध झालेले नाहीत. पहिली मुदतवाढ नावापुरतीच गेल्या महिन्यात तूर खरेदी थांबल्यानंतर शासनाने एक ते १५ मे या काळात खरेदीची मुदत वाढवून दिली. परंतु साठवणुकीसाठी गोदाम अाणि बारदाना हा प्रश्न न सुटल्याने नाममात्र खरेदी होऊ शकलेली अाहे. शासनाला अपेक्षित असलेली खरेदी झालेली नाही.

  •  अाॅनलाइन नोंदणी ः ५१२७८
  •  मोजणी झालेले ः१२४५९
  •  शिल्लक शेतकरी ः ३८८००
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com