agriculture news in marathi, tomato season in trouble due to rate down, Maharashtra | Agrowon

अडीचशे कोटींचा टोमॅटो हंगाम संकटात
ज्ञानेश उगले
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

पिंपळगाव बसवंत बाजारात रोज १ लाख हून अधिक टोमॅटो क्रेटची आवक होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत हंगामाच्या सुरवातीलाच ही जास्त आवक आहे. त्या तुलनेत देशांतर्गत तसेच निर्यातीच्या बाजारपेठेत मागणी कमी आहे.
- राजेश ठक्कर, टोमॅटो व्यापारी व निर्यातदार, पिंपळगाव बसवंत 

नाशिक  : मागील वर्षी हंगामाच्या सुरवातीपासून टोमॅटोच्या २० किलोच्या क्रेटला सरासरी २०० रुपयांचा दर होता. यंदा हंगामाची सुरवात ५० रुपयांनी झाली आहे. मागील ८ दिवसांपासून टोमॅटो बाजार ५० रुपयांवर स्थिर असताना यात वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतातील टोमॅटो खुडावा की तसाच सोडून द्यावा, या मनःस्थितीत शेतकरी आहेत. देशभरात टोमॅटोची आवक जास्त असल्याने त्याचा फटका टोमॅटोला बसत आहे. यातून जर बाजार सावरला नाही, तर एकट्या नाशिक जिल्ह्याला तब्बल २५० कोटींचा फटका बसणार आहे.

राज्यातील नाशिक, नगर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांत टोमॅटोचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. सद्यःस्थितीत राज्यभरातील टोमॅटो मंदीच्या कचाट्यात सापडला आहे. नाशिक जिल्ह्यात ५० हजार हेक्‍टरवर हे पीक होते. हेक्‍टरी १० टन उत्पादन सरासरी १० रुपये किलोने धरले, तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किमान २५० कोटींचे उत्पन्न यातून मिळते. मंदीच्या तडाख्यामुळे हा २५० कोटींचा व्यवसाय संकटात सापडला आहे.

 नाशिकच्या पिंपळगाव बसवंत बाजार आवारात बुधवारी (ता. २९) लिलावात टोमॅटोच्या क्रेटला ५० रुपयांचा भाव निघाला. या वेळी बाजारात तब्बल १ लाख क्रेटची आवक होती.. दूरवरून बाजारात माल घेऊन आलेल्या हताश झालेल्या शेतकऱ्यांनी लालभडक टोमॅटो आवारात आणि रस्त्यावर फेकून देण्याचा पर्याय स्वीकारला. कारण तो तसाच परत नेणेही परवडणारे नव्हते. मागील पंधरवड्यापासून टोमॅटोचे मार्केट संथ गतीनेच सुरू आहे.

मागील तीन दिवस मात्र दरात जास्तच घसरण झालीय. वाहतूक खर्चही निघत नसल्याने टोमॅटो उत्पादक संकटात सापडले आहेत. मंदीमुळे नाशिक, नगर, पुणे या टोमॅटो उत्पादक पट्ट्यातील अर्थकारणच कोलमडले आहे. 
वर्ष २०१६ च्या नोव्हेंबर मध्ये नोटाबंदीच्या निर्णयानंतर टोमॅटो बाजारात पूर्णपणे कोसळला. या वेळी संपूर्ण हंगाम तोट्यात गेला होता. त्यानंतर मागील वर्षी खर्च निघेल इतका दर मिळाल्याने नोटाबंदीचे दु:ख विसरण्यास मदत झाली होती. मात्र यंदा हंगामाच्या सुरवातीपासूनच मंदीचा ब्रेक लागला असल्याने टोमॅटो उत्पादकांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग दाटले आहेत.  

हजारो एकरांवरील टोमॅटो शेतातच पडून
नाशिक भागातील ५० हजार हेक्‍टरवरील टोमॅटो बाजारात येण्याच्या तयारीत आहे. बहुतांश टोमॅटोचा अद्याप पहिला खुडाही झालेला नाही. हंगामाच्या सुरवातीलाच टोमॅटोच्या शिवारात मंदीचे मळभ दाटून आलेय..चांदवड तालुक्‍यातील धोंडगव्हाण येथील सुभाष पूरकर म्हणाले, की मागील वर्षी याच वेळी टोमॅटोला क्रेटला सरासरी ४०० रुपये दर मिळाला.

यंदा मात्र तोच दर अवघा ५० रुपयांवर आलाय. जागेवर खुडणीचा खर्च १५ रुपये, बाजारापर्यंत वाहतूक खर्च १५ रुपये, बाजारातील इतर खर्च २० रुपये असा जागेवरच ५० रुपये खर्च येत असताना ५० रुपयांत टोमॅटो परवडतच नाही. माल सुरू होईपर्यंत टोमॅटोला एकरी ३ लाख रुपये खर्च झालाय तो वेगळाच!..पूरकर यांची स्थिती प्रातिनिधिक आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, चांदवड, मालेगाव, नांदगाव, मनमाड, येवला, नगर जिल्ह्यातील कोपरगाव, रवंधा, टाकळी या भागांतील टोमॅटो उत्पादकांची यंदा बाजारभावाने दैनाच केली आहे.

आवक वाढली
यंदा पाऊसमान चांगले झाल्याने राज्यभरातील बहुतांश भागांत शेतकऱ्यांनी इतर पिकांऐवजी टोमॅटोकडे मोर्चा वळवला आहे. केवळ उत्तर व पश्‍चिम महाराष्ट्रात नव्हे, तर विदर्भ, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्रातही टोमॅटो पिकाची लागवड वाढली आहे. नवीन जमिनीत, नवीन वाणांमधून उत्पादकतेतही वाढ झाली असली, तरी त्यामुळे राज्यभरातील बाजारात टोमॅटोची आवकही वाढली आहे. महाराष्ट्रासह राज्याबाहेरील बाजारपेठेतही यंदा टोमॅटोची आवक जास्त असल्याने मागणी स्थिरावली असल्याचे या भागात माल पाठविणाऱ्या व्यापाऱ्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया 
नारायणगाव भागातील टोमॅटोची आवक ही गतवर्षीच्या तुलनेत निम्म्याने घटली आहे. मात्र देशभरात वाढलेली आवक, नेपाळ, बांगलादेश या देशांनी वाढविलेले आयातशुल्क यामुळे अतिरिक्त टोमॅटोचा निपटारा होण्यात अडचणी येत आहे.
- रमेश कोल्हे, नारायणगाव, जि. पुणे

गुजरात राज्यात रोज चार ते पाच ट्रक माल आम्ही पाठवतो. मागील दोन दिवसांपासून खप कमी झाला आहे. बंगळूर येथील टोमॅटो या बाजारात वाढला आहे. यंदाची आवक पाहता गतवर्षीच्या तुलनेत ही तीनपटीने अधिक आहे.
- राजेश म्हैसधुणे, टोमॅटो व्यापारी, नाशिक
 

 

इतर अॅग्रो विशेष
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...
प्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...
चीनसह बांगलादेशची कापूस आयात वाढणारजळगाव ः देशात आॅगस्टअखेर ११२ लाख हेक्‍टरवर...
भाजीपाला शेतीसह कापूस बीजोत्पादनातील...भाजीपाला पिके तसेच कापूस बीजोत्पादन या पद्धतीतून...
मिर्झापूर ः साखळी शेततळ्यांचे गाव‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत मिर्झापूर (ता...
इजा झाल्यानंतर वनस्पती पाठवतात धोक्याचा...जेव्हा वनस्पतींना इजा होते, त्या वेळी वनस्पतीच्या...
ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...नागपूर  ः ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...
कमी दाब क्षेत्राचे निर्माण; पावसाच्या...पुणे   : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...
पावसाने ताण दिल्यामुळे खरीप धोक्यातपुणे ः राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी...
चांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली...सातारा जिल्ह्यातील चांदक-गुळुंब (ता. वाई) हा ओढा...