टोमॅटो हंगाम यंदा समाधानकारक

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
औरंगाबाद : गतवर्षी फेकूण द्यायची वेळ आलेल्या टोमॅटोला यंदाचा हंगाम उत्पादकांना बरा गेला, असेच म्हणावे लागेल. एकूण उत्पादनांपैकी बऱ्यापैकी माल कमी दराने गेला असला तरी जवळपास २० ते २५ टक्‍के माल चांगल्या दराने बांधावरूनच गेल्याने लागवड व उत्पादन घटविलेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसत आहे. 
 
टोमॅटो खरेदीसाठी इतर ठिकाणांहून येणाऱ्या व्यापाऱ्यांचा दरवर्षी जवळपास दोन महिने राहणारा मुक्‍काम यंदा मात्र महिनाभरापुरता मर्यादित राहिला. मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यांतर्गत येत असलेल्या टोमॅटो आगाराला जवळपास दोन वर्षे मरणकळा सोसाव्या लागल्या.
 
गतवर्षी दर पडल्याने शेतकऱ्यांनी अक्षरश: टोमॅटोचे पीक काढून टाकले होते. खर्च करूनही उत्पन्नात  दोन वर्षे सतत दगा बसल्याने वरूडकाजी, सुलतानपूर, हिरापूर, कुबेर गेवराई, टोणगाव, जडगाव, वडखा, वरझडी आदी गावशिवारांत यंदा टोमॅटोची लागवड ६० ते ७० टक्‍क्‍यांनी घटली होती. 
 
यंदा जुलैमध्ये लागवड केलेल्या टोमॅटो उत्पादकांना सुरवातील १५० ते ३०० रुपये कॅरेटने उत्पादित मालाची विक्री करावी  लागली. ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान ऐन मालाचे उत्पादन जोमात असताना दर न मिळाल्याने यंदाही टोमॅटो दगा देतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती, परंतु त्यानंतर आधीच क्षेत्र घटलेल्या टोमॅटो आगारातील उत्पादन जसजसे घटले; तसतसे टोमॅटोचे दरही चांगले वधारत गेले.
 
४०० ते ८०० रुपये प्रतिकॅरेटपर्यंत टोमॅटोचे प्रतिकॅरेटचे दर पोचल्यांने यंदा टोमॅटो उत्पादकांना उत्पादनात घट आली तरी दराने बऱ्यापैकी आधार दिल्याची माहिती टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी दिली. 
 
यंदा वरूडकाजीच्या केंद्रावरून ऑगस्ट ते सप्टेबरदरम्यान जवळपास दररोज पंधरा गाड्या (५४० कॅरेट प्रतिगाडीप्रमाणे) टोमॅटो दिल्ली, अलिगड, जयपूर, मुंबई, अलाहाबाद, झांशी, आग्रा, बुलंदशहर आदी ठिकाणी पुरवठा झाला. या शहरांमधील खरेदीदार जवळपास महिनाभर (ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान) वरूडकाजी व परिसरातील गावांमध्ये तळ ठोकूण होते, असे शेतकरी सांगतात. 
   उत्पादन खर्चात वाढ
ऑगस्टमध्ये उत्पादन सुरू झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये जवळपास पंधरवडाभर जोरदार पाऊस झाल्याने त्याचा थेट परिणाम टोमॅटोवर झाला. अतिपाण्यामुळे काही शेतकऱ्यांचे प्लॉट बसले. सततच्या पावसामुळे मालाचा दर्जाही घसरला. त्यामुळे उत्पादन खर्चातही शेतकऱ्यांना वाढ करावी लागली. पाऊस थांबल्यानंतर मात्र शेतकऱ्यांनी घेतलेल्या काळजीमुळे पुन्हा टोमॅटोचे उत्पादन बऱ्यापैकी होऊन त्याला दरही चांगला मिळू लागला. आता या पिकाची दूर्री घेण्याची तयारी शेतकऱ्यांनी चालविली आहे. 
यंदा एकरभर टोमॅटोची लागवड केली होती. जवळपास ११०० कॅरेट माल निघाला. त्याला ४०० ते ८०० रूपये प्रतिकॅरेटचा दर मिळाला. एक महिना उत्पादन मिळाले नाही, मात्र गत दोन वर्षाच्या तुलनेत यंदा टोमॅटोचा हंगाम आजवर बराच राहिला.
- गणेश कुबेर, कुबेर गेवराई, ता. जि. औरंगाबाद. 
 
माझ्या सहा एकर टोमॅटोच्या क्षेत्रातून जवळपास साडेचार हजार कॅरेट टोमॅटो आजवर निघाला. जवळपास तीन हजार कॅरेट टोमॅटो १५० ते २०० रुपये दरम्यान गेले. दीड हजार कॅरेट मात्र ५०० ते ९०० रुपये प्रतिकॅरेट प्रमाणे गेले. दोन वर्षांच्या तुलनेत यंदा टोमॅटोचे उत्पादन बरे राहिले अाहे.
- गणेश देशमुख, टोमॅटो उत्पादक, वरूडकाजी ता. जि. औरंगाबाद.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com