लातूर बाजारात व्यापारी, अडते संघर्ष पेटला

लातूर बाजारात व्यापारी, अडते संघर्ष पेटला
लातूर बाजारात व्यापारी, अडते संघर्ष पेटला

लातूर ः लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारात व्यापारी व अडते संघर्ष वाढत चालला आहे. काही व्यापारी खरेदी केलेल्या शेतमालाचे पैसेच वेळेवर देत नसल्याने अडते अडचणीत आले आहेत. यात वारंवार मागणी करूनही बाजार समिती लक्ष देत नाही. त्यामुळे बुधवारी (ता. १६) अडते रस्त्यावर आले. त्यांनी बाजार बंद पाडला. समिती कार्यालयासमोर आंदोलन केले. निषेधाच्या  घोषणाही दिल्या. तीन तास हा गोंधळ सुरू होता.

या बाजार समितीत आठ दिवसांत खरेदी केलेल्या शेतमालाचे पेमेंट व्यापाऱ्यांनी अडत्याना देण्याची प्रथा आहे. गेली अनेक वर्षे ही प्रथा सुरू आहे. पण बाजारातील पाच व्यापाऱ्यांनी गेल्या दोन तीन महिन्यांपासून अडत्याचे पेमेंटच केले नाही. वाढत वाढत ही रक्कम कोट्यवधींच्या घरात गेली आहे. त्यामुळे अडते अडचणीत आले आहेत. या व्यापाऱ्यांवर कारवाई करून पेमेंट द्यावे, अशी मागणी अडत्यांकडून समितीकडे केली जात होती. पण समिती काही कारवाई करीत नाही असा समज करून अडते आज रस्त्यावर उतरले. त्यांनी बाजार बंद केला. सौदाही होऊ दिला नाही. शेकडो अडते समितीच्या कार्यालयासमोर आले. 

सुरवातीला सभापती ललितभाई शहा यांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना बोलू दिले गेले नाही. त्यामुळे ते आपल्या कक्षात जाऊन बसले. त्यानंतर अडते मोठ्या संख्येने एकत्र आले. सभापतींच्या नावाने त्यांनी घोषणाबाजीही केली. तीन चार तास हा गोंधळ सुरू होता. व्यापारी संचालक सुधीर गोजमगुंडे, बाळू बिदादा यांनी अडत्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते. घटनास्थळी पोलिस आल्याने पुन्हा अडते चिडले होते. सभापतींनीच येऊन म्हणणे मांडावे असा त्यांचा आग्रह होता. अखेर सभापती शहा आले. त्यांनी संबंधित व्यापाऱ्यांच्या विरोधात बाजार समिती काय कारवाई करीत आहे, याची सविस्तर माहिती अडत्याना दिली. 

बाजार सुरू करण्याची विनंतीही त्यांनी केली. अडत असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य सोनवणे यांनीदेखील पैसे वसूल करण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत, याची माहिती दिली. त्यानंतर अडते शांत झाले; पण बाजार मात्र बंदच राहिला. यात शेतकरी मात्र भरडला गेला.

एका अडत्याला ‘बीपी’चा अॅटॅक अडते जास्तच आक्रमक झाले होते. अनेक अडते सभापतींच्या कक्षावर चालून गेले. तेथे एकच गोंधळ उडाला. यात अडते रमाकांत लोंढे यांना बीपीचा अॅटॅक आला. तातडीने त्यांना येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान एका अडत्याने विष घेण्याचा प्रयत्न केला. पण जवळच्या अडत्याने त्याची बाटली घेऊन फेकून दिल्याने पुढील अनर्थ टळला.

बाजारातील पाच व्यापाऱ्यांचे पैसे थकले आहेत. ही रक्कम मोठी आहे. त्यांच्यावर बाजार समितीच्या वतीने कारवाई सुरू आहे. कोणाचे प्लॉट जप्त करणे, घरावर नोटिसा लावणे, एकाच्या तर आईलाही नोटीस दिली आहे. काही व्यापाऱ्यांनी अडत्यांचे पैसे देण्याची तयारी दर्शवली आहे. आठ ते पंधरा दिवसांत सत्तर टक्के पैसे येतील. तीस टक्के पैशासाठीही प्रयत्न सुरू आहेत. अडत्यांनी बाजार बंद पाडू नये.  - ललितभाई शहा, सभापती, बाजार समिती, लातूर

व्यापाऱ्यांकडून पैसे कसे काढून घ्यायचे याचा प्रयत्न सुरू आहे. समिती व संघटना दोघेही प्रयत्न करीत आहेत. आदी जेवढे पैसे निघतील तेवढे काढून घेण्यात येत आहेत. बाजार बंद पाडू नये. तुमच्यासोबत संघटना आहे.  - अजिंक्य सोनवणे, अध्यक्ष, अडत असोसिएशन.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com