ऊस वाहतुक दराची पारंपरिक पद्धत योग्य

ऊस वाहतुक दराची पारंपरिक पद्धत योग्य
ऊस वाहतुक दराची पारंपरिक पद्धत योग्य

पुणे : ऊस वाहतुकीचा खर्च अंतरावर आकारण्याची पद्धत शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे. यासाठी सरकारने पांरपरिक पद्धतीचाच अवलंब केला पाहिजे. पुढील वर्ष हे साखर उद्योगासाठी अडचणींचे आणि काळजीचे ठरणार अाहे. परिणामी सर्वांनी काटकसरीने साखर उद्याेग चालविण्याची गरज आहे, असे आवाहन वसंतदादा साखर संस्थेचे (व्हीएसआय) अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी (ता. २६) केले. साखर निर्यातीमधील आंतरराष्ट्रीय संघटनांनी भारताची साखर बाजारपेठ खुली करा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. यामुळे अन्य देशांतून साखर येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि विविध पुरस्कांचे वितरण श्री. पवार यांच्या हस्ते मंगळवारी संस्थेच्या मांजरी येथील मुख्यालयात झाले. कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, खासदार विजयसिंह माेहिते पाटील, माजी मंत्री अजित पवार, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थाेरात, ज्येष्ठ नेते शंकरराव काेल्हे, सतेज पाटील आदी या वेळी उपस्थित हाेते.

श्री. पवार म्हणाले, की पुढील वर्षी देशातील आणि राज्यातील उसाचे क्षेत्र वाढणार असून, साखर उत्पादन विक्रमी ठरणार आहे. या विक्रमी हंगामाच्या नियाेजनासाठी विशेष आखणी आणि नियमावली करण्याची गरज आहे. ज्या कारखान्यांना ऊस नाही अशा कारखान्यांना इतरांनी मदत करता येईल का, याचेही नियाेजन करावे लागणार आहे. विक्रमी क्षेत्रामुळे हंगाम लवकर सुरू करून, मे-जूनपर्यंतदेखील सुरू ठेवण्याची शक्यता निर्माण हाेणार आहे. येता हंगाम अडचणी आणि काळजीच असल्याने कमीत कमी खर्चात कारखाना चालविण्याची गरज आहे.

साखरेच्या आयात निर्यातीबाबत पवार म्हणाले, की आंतरराष्ट्रीय साखर संघटनेने इतर देशांना निर्यातीसाठी भारताची बाजारपेठ खुली करावी, अशी मागणी केंद्र शासनाकडे केली आहे. यामुळे अन्य देशांतून साखर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तसे हाेणार नाही असे वाटते. यासाठी पुढील वर्ष साखर उद्याेगासाठी अडचणीचे असून, त्याची काळजी करावी.

या वेळी ऊस आणि साखर उद्याेगात उल्लेखनीय कार्य केलेल्या शेतकरी, संशाेधक, अधिकारी आणि साखर कारखान्यांना विविध पुरस्कारांनी गाैरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार दिलीप वळसे पाटील यांनी केले.

पुरस्कारांच्या रकमेत वाढ विविध कारखान्यांना देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारांची रक्कम १ लाखांवरून २ लाख ५१ हजार केल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

केंद्र आणि राज्य सरकारने साखर उद्याेगांना मदत केली पाहिजे. साखर उद्याेगांपुढील समस्या आणि अडचणींबाबत चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष वेळ दिला असून, लवकरच त्यांच्यासाेबत बैठक हाेणार आहे. - शरद पवार , माजी केंद्रीय कृषिमंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com