agriculture news in marathi, traditional water management, Abhijeet Ghorpade | Agrowon

परंपरागत जल व्यवस्थांचा संपन्न वारसा : अभिजित घोरपडे
अभिजित घोरपडे
शनिवार, 20 एप्रिल 2019

परंपरागत जल व्यवस्थांमधून घेण्याजोग्या आणि आजही आचरणात आणण्याजोग्या अनेक गोष्टी आहेत. विशेषतः शिस्त, सामूहिक शक्ती, सौंदर्यदृष्टी, व्यवस्थांमधील नेमकेपणा या गोष्टींची आज नितांत आवश्यकता आहे. काळाच्या ओघात समाज म्हणून आपण या गोष्टी विसरलो आहोत. त्या पुन्हा व्यवहारात आणायच्या असतील, तर परंपरागत जल व्यवस्थांच्या रूपात असलेली ही उदाहरणे विसरून कशी चालतील? या सर्वच व्यवस्था आपला वारसा आहेतच, शिवाय आपल्या विकासाच्या साक्षीदारसुद्धा. हा वारसा असाच वाया घालवणे हे कृतघ्नपणाचे लक्षण ठरेल आणि स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेणंसुद्धा.

परंपरागत जल व्यवस्थांमधून घेण्याजोग्या आणि आजही आचरणात आणण्याजोग्या अनेक गोष्टी आहेत. विशेषतः शिस्त, सामूहिक शक्ती, सौंदर्यदृष्टी, व्यवस्थांमधील नेमकेपणा या गोष्टींची आज नितांत आवश्यकता आहे. काळाच्या ओघात समाज म्हणून आपण या गोष्टी विसरलो आहोत. त्या पुन्हा व्यवहारात आणायच्या असतील, तर परंपरागत जल व्यवस्थांच्या रूपात असलेली ही उदाहरणे विसरून कशी चालतील? या सर्वच व्यवस्था आपला वारसा आहेतच, शिवाय आपल्या विकासाच्या साक्षीदारसुद्धा. हा वारसा असाच वाया घालवणे हे कृतघ्नपणाचे लक्षण ठरेल आणि स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेणंसुद्धा.

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका कमी पावसाचा. तिथं अनेक ऐतिहासिक गावं आहेत, त्यापैकी एक मलठण. पवार सरदारांचं हे गाव. तिथल्या गढीत आकर्षक अशी बारा कोनी विहीर आहे, तीसुद्धा तीन मजली. विटांचं नाजूक बांधकाम, तिला असलेल्या कमानी- सज्जे आणि प्रत्येक मजल्यापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था. पाण्याची पातळी वाढते, तसा एकेक मजला पाण्याखाली जातो. आजही या विहिरीला बारमाही पाणी असतं, स्वच्छ आणि नितळ!

महाराष्ट्रातील परंपरागत जल व्यवस्थांचं हे एक प्रातिनिधिक उदाहरण. आपल्या भूमीत विहिरी, आड, तलाव, कुंडं, बांध, पाट, टाकी, पुष्करणी अशा असंख्य जल व्यवस्था आहेत. या व्यवस्थांनी आधीच्या सर्वच पिढ्यांना जगवलं, विकसित करायला मदत केली. या व्यवस्थांची रूपं पाहणं हा आनंददायी अनुभव असतो. याचं कारण म्हणजे या व्यवस्थांचा जुनेपणा, भक्कम बांधकाम, त्यातलं सौंदर्य, काळजीपूर्वक केलेलं आखीवरेखीव काम, त्यात असलेली विविधता आणि स्थानिक परिस्थितीचा उत्तम प्रकारे करून घेतलेला वापर. महाराष्ट्राला हा वारसा किती जुना आहे? तर, हा काळ तब्बल साडेचार हजार वर्षांपर्यंत मागे जातो. शिरूर तालुक्यातच इनामगाव या ठिकाणी उत्खनन झालंय. त्यात एक जुना कालवा सापडलाय. हा कालवा म्हणजे महाराष्ट्रातील ज्ञात असलेली पहिली जल व्यवस्था. त्यानंतर या भूमीत असंख्य जल व्यवस्था निर्माण झाल्या.

खरंतर आता आपली जीवनशैली, गरजा बदलल्या आहेत, त्यामुळे अनेकांच्या मनात स्वाभाविकपणे प्रश्न येईल, या जुन्या जल व्यवस्थांचं करायचं काय? यावर निर्णय घेण्यापूर्वी या जल व्यवस्थांची वैशिष्ट्यं, आजच्या काळातील औचित्य आणि उपयुक्तता हे समजून घ्यावं लागेल.

परंपरागत शहाणपण
या व्यवस्था निर्माण झाल्याचा काळ विचारात घेतला, तर त्याकाळी आताइतकं तंत्रज्ञान विकसित नव्हतं हे नक्की. पण आधीच्या पिढ्यांनी त्याकाळात उपलब्ध तंत्रज्ञानाचा खुबीने उपयोग करून घेतल्याचं पाहायला मिळतं, त्याला जोड होती ती शहाणपणाची. या व्यवस्थांची निर्मिती करताना किती बारकाईने विचार केला जायचा, याचं चपखल उदाहरण म्हणजे मोटेची धाव. विहिरीतून मोटारी वापरून पाणी काढण्याचं तंत्र विकसित होण्यापूर्वी सर्वांत कार्यक्षम व्यवस्था होती ती मोटेची. मोटेला बैल किंवा इतर प्राणी जोडून विहिरीतील पाणी उपसलं जायचं. बैलांना पुढे-मागे चालण्यासाठी एक मार्ग असायचा. त्याला धाव म्हटलं जायचं. बैलांना रस्सी बांधून तिला पखाल (पाणी काढण्यासाठीची चामडी पिशवी) जोडलेली असे. बैल धावेवरून पुढे गेले की पखाल वर यायची, तिचं पाणी बाहेर पडायचं आणि बैल मागे झाले की रिकामी पखाल पुन्हा विहिरीत जायची. पखाल अशी वर-खाली व्हायची आणि विहिरीतून पाणी बाहेर यायचं. यातील बारकावा म्हणजे - बैल ज्यावर चालायचे त्या धावेला पुढच्या बाजूला थोडासा उतार असायचा. कारण बैलाला पुढे जाताना भरलेली पखाल ओढावी लागायची. धावेच्या उतारामुळे हे सोपं जायचं. पाण्याचा पुनर्वापर हे जुन्या व्यवस्थांमधील एक प्रमुख वैशिष्ट्य दिसतं. अनेक ठिकाणी एकमेकांना जोडलेली कुंडं, तलाव दिसतात. पहिल्या तलावाचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी, त्यातून पाणी दुसऱ्यात जातं. त्याचा उपयोग अंघोळीसाठी. त्यातून पाणी तिसऱ्यात जातं, त्याचा उपयोग कपडे धुण्यासाठी. त्यानंतर ते पाणी ओढ्यावाटे पिकांना पुरवलं जातं. पुण्याजवळचं रांजे, साताऱ्याजवळचं धावडशी अशा अनेक गावांची उदाहरणं राज्यभर पाहायला मिळतात.

स्थानिक परिस्थितीचा उपयोग 
या जल व्यवस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात विविधता पाहायला मिळते. त्याचं प्रमुख कारण म्हणजे स्थानिक परिस्थितीनुसार केलेली त्यांची निर्मिती. प्रत्येक भागानुसार भूरचना, हवामान बदलतं आणि लोकांच्या गरजासुद्धा. उदाहरण द्यायचं तर कोकणात ‘पाट'' या व्यवस्थेद्वारे डोंगरावरील झऱ्यांचं पाणी गावात आणलेलं पाहायला मिळतं. डोंगरउताराचा वापर करून खाली असलेल्या गावांमध्ये हे पाणी आणलं जातं. त्यासाठी कोणतीही बाहेरची ऊर्जा वापरावी लागत नाही. त्याचवेळी कमी पावसाच्या मराठवाड्यात मोठाल्या बारवा निर्माण झालेल्या दिसतात. कमी पाऊस म्हटल्यावर पाणी जमिनीखाली साठवणं सोयीचं ठरतं. याउलट जास्त पावसाच्या विदर्भात तलावांची संख्या मोठी आहे. भंडारा, चंद्रपूर हे तर तलावांचे जिल्हे म्हणून प्रसिद्ध आहेत. या जल व्यवस्था निर्माण करताना स्थानिक परिस्थितीचा कसा विचार, उपयोग करून घेण्यात आलाय, हे या

उदाहरणांमधून पाहायला मिळतं.
याचा आणखी एक वेगळा फायदा झालेलाही दिसून येतो. तो म्हणजे, या सर्वच व्यवस्था विकेंद्रित आहेत. त्यामुळे लोकांना कोणत्याही एका मध्यवर्ती व्यवस्थेवर अवलंबून राहावं लागत नसे. या व्यवस्था उभ्या करणं आणि त्यांचं व्यवस्थापन करणं हे स्थानिक समाज करू शकायचा. परिणामी, त्यांना आपापल्या गरजा भागवणं शक्य व्हायचं.

जल व्यवस्थांच्या संवर्धनात सहभागी व्हा
परंपरागत जल व्यवस्थांच्या संवर्धनासाठी ‘भवताल’च्या वतीने उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार सुरवातीला महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण जल व्यवस्थांचे दस्तावेजीकरण (डॉक्युमेंटेशन) करण्यात येत आहे. वैशिष्ट्यपूर्ण जल व्यवस्थांची माहिती फेसबुक, यू-ट्यूब या सोशल मीडियांच्या मंचांद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. त्यामुळे या व्यवस्थांचं वेगळेपण, सौंदर्य, उपयुक्तता लोकांपर्यंत ठळकपणे पोहोचत आहे. त्यात आपणही सहभागी होऊ शकता. आपल्या भागातील वैशिष्ट्यपूर्ण जल व्यवस्थांची माहिती कळवू शकता आणि या चळवळीत सहभागी होऊ शकता.

सौंदर्य मूल्य 
परंपरागत जल व्यवस्थांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे- त्यांच्यात असलेलं सौंदर्य मूल्य. खरंतर या व्यवस्था पाणी साठवण्यासाठी किंवा पाणी वाहून नेण्यासाठी आहेत; पण त्या इतक्या सुंदररीत्या निर्माण करण्यात आल्यात, की पाहिलं तरी त्यांच्याबद्दल आस्था निर्माण होते. त्यांची रचना, त्यासाठी वापरलेला दगड, त्याची ठेवण, त्यातील नक्षी, त्यात वापरलेली शिल्पं या सर्वच गोष्टी आकर्षित करतात. वास्तू इतक्या चांगल्या असतील तर त्या टिकवाव्याशा वाटतात, मग त्या दीर्घकाळ टिकून राहण्याची शक्यताही वाढते. म्हणून तर एखादी आजची पाण्याची टाकी आणि जुनी विहीर यापैकी काय पाहावंसं वाटतं?.. याचं उत्तर निश्चितच विहीर असं येतं.

सामूहिक प्रयत्न आणि इतरांचा विचार
या जुन्या जल व्यवस्थांचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे समूहाचं एकत्र येणं. ते उभारण्यासाठी सामूहिक प्रयत्न व्हायचे, त्यामुळे टिकवण्याची जबाबदारीसुद्धा सामूहिक असायची. हे सारं समाजच टिकवणार असेल तर त्याची शाश्वतता वाढण्यास मदत होते. सामूहिक प्रयत्न म्हटल्यावर इतरांचा विचार आलाच. सर्वच व्यवस्था आणि त्या वापरणाऱ्यांमध्ये इतरांचा विचार पाहायला मिळायचा. याचं उत्तम उदाहरण म्हणजे खानदेशातील ‘फड पद्धती’. पाण्याचं इतकं समन्यायी वाटप इतरत्र क्वचितच पाहायला मिळेल. या पद्धतीत नदीचं पाणी काही बांध टाकून बाजूला काढलं जायचं. ते शेतीसाठी वापरलं की उरलेलं पाणी पुन्हा नदीच्या पात्रात जाईल याची व्यवस्था केली जायची. हे पाणी सर्वांसाठी अतिशय न्याय्य पद्धतीने वितरित केलं जायचं. परंपरागत जल व्यवस्थांची ही काही वैशिष्ट्यं. तरीही त्यांची आजची स्थिती अतिशय गंभीर, शोचनीय आहे. या व्यवस्था एकतर नष्ट केल्या आहेत किंवा जणू केवळ कचरा साठवण्यासाठीच राखून ठेवल्या आहेत. याला फारच थोडे अपवाद आहेत. 

जल व्यवस्थांचं करायचं काय?
या व्यवस्थांची वैशिष्ट्य पाहता त्या टिकवायला हव्यात हे नि:संशय. त्या आज, शेकडो वर्षांनंतरही आपल्याला उपयुक्त ठरतात आणि अनेक गोष्टी शिकवून जातात. त्यामुळे आता काळ बदलला असला तरी त्या पूर्णपणे कालबाह्य झालेल्या नाहीत. बदलत्या काळानुसार आपल्या पाण्याच्या गरजा बदलल्या आहेत, त्या भागवण्यासाठी जुन्या व्यवस्था पुऱ्या पडणार नाहीत हे खरं. पण आपत्कालीन परिस्थितीत आपल्या पाच-दहा टक्के गरजा पुऱ्या करण्यास या व्यवस्था सक्षम आहेत. शिवाय, त्या गावोगावी विखुरलेल्या आहेत. हे म्हणणं केवळ भावनेच्या भरात नाही, तर असं करणं व्यवहार्यसुद्धा आहे. आधीच्या पिढ्यांनी या व्यवस्थांमध्ये पैसा, श्रम, शहाणपण आणि सामूहिक शक्ती यांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळेच या व्यवस्था उभ्या राहिल्या आहेत. या जल व्यवस्थांची डागडुजी करून या गुंतवणुकीचा परतावा मिळवणं हा मार्ग समोर असताना, ही गुंतवणूक मोडीत काढणं कसं समर्थनीय ठरेल?
दुसरी बाब म्हणजे या व्यवस्थांमधून घेण्याजोग्या आणि आजही आचरणात आणण्याजोग्या अनेक गोष्टी आहेत. विशेषतः शिस्त, सामूहिक शक्ती, सौंदर्यदृष्टी, व्यवस्थांमधील नेमकेपणा या गोष्टींची आज नितांत आवश्यकता आहे. काळाच्या ओघात समाज म्हणून आपण या गोष्टी विसरलो आहोत. त्या पुन्हा व्यवहारात आणायच्या असतील, तर परंपरागत जल व्यवस्थांच्या रूपात असलेली ही उदाहरणं विसरून कशी चालतील?

तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे- या सर्वच व्यवस्था आपला वारसा आहेतच, शिवाय आपल्या विकासाच्या साक्षीदारसुद्धा. आपण जल व्यवस्थांच्या विकासात इथपर्यंत कसे पोहोचलो हेही या जल व्यवस्था सांगतात. त्यामुळे त्या टिकवणं, त्यांचं संवर्धन करणं हे कर्तव्य आहे आणि जबाबदारीसुद्धा. हा वारसा असाच वाया घालवणं हे कृतघ्नपणाचं लक्षण ठरेल आणि स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेणंसुद्धा. त्याऐवजी त्यांचं संवर्धन करण्याचे प्रयत्न केले तर आपण काही प्रमाणात तरी आपल्या गरजा भागवू शकू.

संपर्कासाठी : मोबाईल -  ९८२२८४०४३६
 फेसबुक पेज : @bhavatal / भवताल
 यू-टयूब चॅनेल : https://bit.ly/2Yty1w1
 ई-मेल : bhavatal@gmail.com
 मेसेज : ९५४५३५०८६२

(लेखक पर्यावरण अभ्यासक व ‘भवताल’ या नियतकालिकाचे संपादक आहेत.)

इतर अॅग्रो विशेष
उद्योगाला साखर कडूचमहाराष्ट्रातील गळीत हंगामाची सांगता नुकतीच झाली...
‘एफआरपी'साठी शेतकरी संघटना पुन्हा...सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या...
विदर्भात उत्कृष्ट व्यवस्थापन असलेली २३...वर्धा जिल्ह्यात केळी पिकाला पुन्हा गतवैभव प्राप्त...
भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसन...पुणे : भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसनाची...
वर्षभरात पाच हंगामात दर्जेदार कोथिंबीरपाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे...
राज्यात आता पीकविमा शेतकरी सहभाग अभियानपुणे: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी यंदा...
छावण्यातील जनावरांची आठवड्यातून एकदा...मुंबई ः दुष्काळी भागातील चारा छावण्यांमधील...
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला मागणीकोल्हापूर: निर्यातीच्या बाबतीत पिछाडलेल्या...
शुक्रवारपर्यंत उष्ण लाटेचा इशारापुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने चटका असह्य...
आखातात १८ हजार टन केळी निर्यातजळगाव ः मागील दोन महिन्यांत राज्यातून प्रतिदिन १५...
मॉन्सून एक्सप्रेसची गती मंदावली;...पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (...
कृषी विभागाच्या बदल्या यंदाही...पुणे : कृषी विभागातील बदल्यांचा घोडेबाजार...
एकनाथ डवलेंकडे कृषी सचिवपदाचा पूर्णवेळ...मुंबई : मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले...
परभणी : दुष्काळाच्या फेऱ्यात फळबागा...परभणी ः जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढल्यामुळे...
पूरक धोरणानेच वाढेल निर्यातकें द्रातील मोदी सरकारच्या सुरवातीच्या काळात...
निवडणूक आयोगाला घरचा आहेर! सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदान प्रक्रिया कालच...
विरोधी पक्षनेता आज ठरणार; पृथ्वीराज...नागपूर ः राधाकृष्ण विखे पाटील यांच्या...
कृषी निविष्ठांमध्ये हवी मधमाशीपुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या...
विषबाधा नियंत्रणाची जबाबदारी आता...यवतमाळ : जिल्ह्यात फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधा...
उन्हाचा चटका अन् उकाड्यातही वाढपुणे : विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरीसह मध्य...