रोहित्र दुरुस्तीचा विलंब भोवला; भरपाई देण्याचे आदेश

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला :  वीज रोहित्राची वेळेवर दुरुस्ती न झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे नेहमीचे प्रकार बघायला मिळतात. मात्र जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील चार शेतकऱ्यांनी याविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी ग्राहक मंचात लढा देत जबाबदार अधिकाऱ्याला शेतकऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे तब्बल साडेसहा लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सुनगाव येथील चार ग्राहकांनी नागपूर येथील वीज मंडळाच्या ग्राहक मंचाकडे तक्रार केली होती. त्याचा निकाल नुकताच लागला असून, वीज मंडळाच्या मलकापूर येथील कार्यकारी अभियंत्याला नुकसान भरपाई देण्याचे आदेश आले आहेत. यासाठी शेतकऱ्यांना एक वर्षाच्या संघर्षानंतर हा न्याय मिळाला.

याबाबत अधिक माहिती अशी, सुनगाव येथे वावडी हरदो शिवारात असलेले रोहित्र नादुरुस्त झाले होते. वारंवार मागणी करूनही तब्बल साडेचार महिने वीज मंडळाने दुरुस्त न केल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. नेहमी वीज वितरण कंपनीच्या कार्यपद्धतीबाबत तक्रारी होतात. परंतु याविरुद्ध कोणीही न्यायालय किंवा ग्राहक मंचाकडे दाद मागत नाही.

परंतु, सुनगाव येथील अरुण गणपतराव धुळे, महादेव सखाराम बार पाटील व आशा महादेव बार पाटील हे अपवाद ठरले. या शेतकऱ्यांनी रोहित्र बंद पडल्याने शेतीच्या पिकांचे जे नुकसान झाले, त्याबाबतची तक्रार नागपूर येथील वीज मंडळाच्या ग्राहक मंचाकडे केली. वीज वितरण कंपनीचे अधिकारी ए. जी. काठोळे आणि या तीन शेतकऱ्यांची बाजू समजून घेतल्यानंतर या मंचच्या न्यायाधीश चित्रकला झुत्शी यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला.

त्यात वीज मंडळाच्या निष्काळजीपणामुळे रोहित्र जितके दिवस बंद होते, त्या १३४ दिवसांना प्रतितास ५० रुपयांप्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. तसेच अन्य खर्चाची रक्कमसुद्धा त्यामध्ये समावेश करीत शेतकऱ्यांना मानसिक त्रास झाल्याबद्दल दोन हजार रुपयांची नुकसान भरपाईसुद्धा देण्याच्या निकालात म्हटले.

मलकापूर येथील कार्यकारी अभियंता यांना सहा लाख बावन्न हजार पाचशे रुपयांचे चार चेक शेतकऱ्यांना द्यावे लागले. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. रोहित्र १५ जुलै ते २६ नोव्हेंबर २०१६ या काळात बंद होते. यासाठी शेतकऱ्यांना बुलडाणा, अकोला व नागपूर येथील ग्राहक मंचात एक वर्ष संघर्ष करावा लागला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com