सोलापुरात पाळी, पेरणीसाठी ट्रॅक्‍टरचे दर वाढले

सोलापुरात पाळी, पेरणीसाठी ट्रॅक्‍टरचे दर वाढले
सोलापुरात पाळी, पेरणीसाठी ट्रॅक्‍टरचे दर वाढले

सोलापूर ः पेट्रोल आणि डिझेलच्या दरात रोज होणाऱ्या दरवाढीचा फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहेच. पण त्याचा सर्वाधिक फटका थेट शेतीवरही झाला आहे. शेतीतील ट्रॅक्‍टरचलित अवजारांच्या कामासाठीचे दर इंधन दरवाढीमुळे अव्वाच्या सव्वा झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. सध्या जिल्ह्यात दुष्काळसदृश्‍ा स्थितीमुळे पाण्यासाठी वणवण सुरू आहे. पण उजनी धरणाच्या पट्ट्यात सध्या पाणी असल्याने या भागात सुरू असलेल्या ऊसलागवड आणि पेरणीच्या पूर्वतयारी कामात त्यामुळे अडथळे निर्माण झाले आहेत.

गेल्या महिनाभरापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. रोज किमान १० ते १५ पैशांनी त्यात चढ-उतार होतोच आहे. पण उतारापेक्षा दराची उसळीच सारखी होते आहे. साहजिकच, शेतकऱ्यांचे बजेट त्यामुळे कोलमडत आहे. आधीच पाऊस नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यात ही नवीच समस्या समोर आली आहे. 

येत्या काही दिवसांत पाऊस पडेल आणि रब्बीच्या पेरण्या करता येतील, या आशेवर सध्या शेतात पाळी टाकून रान तयार करण्याची घाई शेतकरी करत आहेत. पण पेट्रोल, डिझेलच्या या दरवाढीमुळे मोठी आर्थिक अडचण होऊन बसली आहे. त्याशिवाय शेतमाल वाहतुकीमध्येही प्रतिपोते, बॉक्‍स भाड्यातही २० ते ३० रुपयांनी दर वाढले आहेत. पंढरपूर, माढा, माळशिरस, मोहोळ, करमाळा भागात सध्या उसाच्या लागवडी सुरू आहेत. त्यासाठी पाळी टाकून सरी बांधण्याचे कामे सुरू आहेत. ही सगळी कामे ट्रॅक्‍टरवर केली जातात. पण ट्रॅक्‍टरचलित अवजारांचे भाडे वाढल्यामुळे शेतकरी द्विधा स्थितीत आहेत. अनेक ठिकाणी शेतकरी दोन-दोन पाळ्या टाकतो, पण वाढणाऱ्या या दरामुळे एकाच पाळीवर काम भागवले जात आहे. 

सध्या ट्रॅक्‍टरच्या संपूर्ण पाळीच्या एका एकराला १४०० रुपये भाडे घेतले जाते, त्याशिवाय रोटरणे व डंपिंग या अन्य कामासाठी प्रतितास किंवा प्रतिएकर यानुसार ६०० रुपयांपासून २००० रुपयांपर्यंत वेगवेगळे दर आहेत. पण सध्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे त्यात १०० ते २०० रुपयांच्या फरकाने ट्रॅक्‍टरमालकांनी त्याचे दर वाढवले आहेत. त्यात हातची वेळ निघून जाईल, यामुळे नाईलाजाने शेतकरीही ही कामे करून घेत आहेत.

गेल्या महिन्यात ७० रुपये प्रतिलिटर असणारे डिझेल अवघ्या १२ दिवसांत ७६ रुपयांवर पोचले आहे. पेट्रोल- डिझेलचे दर वाढल्यामुळे नाईलाजाने आम्हाला दरवाढ करावी लागते, पण त्याशिवाय पर्याय नाही, ड्रायव्हरचा पगार, डिझेलचा दर आणि मिळणारे भाडे, याचा मेळ बसला पाहिजे.  - दयानंद मेटकरी, ट्रॅक्‍टर मालक, जामगाव, ता. मोहोळ, जि. सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com