कडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या घशात

मला एकरी ९० किलोच मुगाचे उत्पादन आले. मागील महिन्यातच चार क्विंटल मुगाची धुळ्यात ३६०० रुपये प्रतिक्विंटल दरात विक्री केली. तेव्हा दर ३६०० ते ४००० रुपये प्रतिक्विंचल होते. आता मुगाचा दर ५१०० झाला, त्याचा मला काय फायदा? कारण शेतकऱ्याला शेतमाल आला की लागलीच त्याची विक्री करावी लागते. हे शासनाला माहीत आहे. मग ते शासकीय खरेदी उशिराच का दरवर्षी करतात. ऑनलाइन नोंदणीत घोळ होतो, हेदेखील त्यांना माहीत आहे, मग या नोंदणीचा अट्टहास का? - नरेंद्र पाटील, शेतकरी, कापडणे (जि. धुळे)
कडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या घशात
कडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या घशात

जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला; परंतु अजूनही शासकीय खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत. मुदतवाढीचा रतीब शासनदरबारी सुरू आहे, दुसरीकडे उडीद व मुगाची कवडीमोल दरात खानदेशातील शेतकऱ्यांना विक्री करावी लागत आहे. आजघडीला ७५ ते ८० टक्के कडधान्याची विक्री खासगी बाजार, बाजार समित्यांमध्ये झाली आहे. शेतकऱ्यांना यात सुमारे २५ कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

खानदेशात धुळे जिल्ह्यात मुगाची १५ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली होती. यातून एकरी ९० किलो ते एक क्विंटल उत्पादन तेथे आले. नंदुरबारातही सुमारे १० हजार हेक्‍टरवर मूग होता. तेथेही पावसाअभावी एकरी एक क्विंटलच उत्पादन हाती आले. तर जळगावात ३० हजार हेक्‍टवर मूग होता. जळगावातही एकरी ९० किलो ते एक क्विंटल उत्पादन आले. अर्थातच खानदेशात मुगाचे एकूण एक लाख १८ हजार क्विंटलपर्यंत मुगाचे उत्पादन आले, असे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले. यातील ८० टक्के मुगाची विक्री झाल्याची माहिती बाजार समित्यांमधील सूत्रांनी दिली आहे. जळगाव, पाचोरा, अमळनेर, शहादा, शिरपूर, चोपडा, यावल, चाळीसगाव, धुळे येथील बाजारांमध्ये जवळपास ८५ हजार क्विंटल मुगाची विक्री झाली आहे. अर्थातच सुमारे २० ते २५ हजार क्विंटल मूग शेतकऱ्यांकडे आहे.

मुगाला हमीभाव कुठल्याही बाजार समितीत मिळाला नाही. सरासरी ३८०० रुपये प्रतिक्विंटल या दरात विक्री झाली. ३५ कोटींची उलाढाल त्यातून झाली. हमीभावापेक्षा क्विंटलमागे तीन हजार रुपये कमी मिळाले. सुमारे २३ कोटींचे नुकसान शेतकऱ्यांना मूग विक्रीसंबंधी खानदेशात सहन करावे लागले. उडदाची जळगाव जिल्ह्यात २५ हजार हेक्‍टरवर, नंदुरबारात १० हजार आणि धुळ्यातही सुमारे १५ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली होती. उडदाचे एकरी दोन क्विंटल उत्पादन आल्याचे कृषी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे. खानदेशात एकूण एक लाख ९० हजार क्विंटलपर्यंतचे उत्पादन आले असून, यातील सुमारे ७५ टक्के उडदाची विक्री बाजारांमध्ये झाली आहे.

उडदालाही प्रतिक्विंटल सरासरी चार हजार रुपये दर मिळाला. उडदाला ५६०० रुपये हमीभाव असून, क्विंटलमागे १६०० रुपये कमी मिळाले. ३० ते ३५ कोटींचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची घोषणा झाली, पण प्रत्यक्ष केंद्र सुरू नाहीत. ऑनलाईन नोंदणीचा घोळ व मुदतवाढीचा धडाका सुरू असल्याने शेतकरी त्रासून खाजगी बाजारात उडीद, मुगाची विक्री करीत आहेत. जळगाव शासकीय खरेदी केंद्रात उडीद व मुगाच्या विक्रीसंबंधी फक्त तीन हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे.

धुळे व नंदुरबारातही ही नोंदणी पाच हजार शेतकऱ्यांपेक्षा अधिक नाही. शासकीय खरेदी लांबतच आहे, यामुळे शेतकरी बाजारात धान्य विक्री करीत आहेत. पुढे सणासुदीसह इतर कारणांसाठी शेतकऱ्यांच्या हाती पैसे हवा असतो. यामुळे शेतकरी किती दिवस प्रतीक्षा करतील, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहे. मग शासनाला २० टक्के कडधान्यही खरेदी करावे लागणार नाही, असे चित्र तूर्त तरी आहे.

ठळक बाबी

  •  खानदेशात यंदा उडीद व मुगाचेउत्पादन सप्टेंबरच्या मध्यातच हाती आले.
  •  उडदाचे एकरी दोन, तर मुगाचे एक क्विंटलपर्यंतचे उत्पादन
  •  उडदाला ४०००, तर मुगाला मिळाला सरासरी ३८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर
  •  मुगाला ६९७५ रुपये प्रतिक्विंटल, तर उडदाला ५६०० रुपये आहे हमीभाव
  •  मुगाला हमीभावापेक्षा ३००० रुपये कमी दर, तर उडदालाही १६०० रुपये कमी दर
  •  ८० टक्के कडधान्याच्या विक्रीनंतर बाजारात दरात सुधारणा
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com