बारा प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा टेकड्यांवर फुलतेय हिरवाई

वृक्षलागवड
वृक्षलागवड

मुंबई : राज्यात ३ वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्णत्वाला नेताना राज्य सरकारने लॅंड बँकेचा प्रयोग राबवण्यास सुरवात केली. त्यातील एक पर्याय म्हणून उजाड टेकड्यांवर हिरवाई फुलवण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वंयसेवी संस्था, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पावसाळ्यात गावाजवळच्या डोंगरावर जात तिथे विविध वृक्षांच्या बीजांची पेरणी केली. अशी अनेक उदाहरणे मागील दोन वर्षांत राज्यातील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी घालून दिली. वन विभागानेही टेकड्यांच्या हरितीकरणाचा उपक्रम हाती घेतला. राज्यातील महत्त्वाच्या बारा रस्त्यांच्या दुतर्फा हिरवाई फुलवण्यात वन विभागाला यश आले आहे.  पर्यावरण संतुलनात वाढते हरित क्षेत्र मोलाची भूमिका बजावते, हे लक्षात घेऊनच राज्यातील काही महत्त्वाच्या रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या टेकड्यांवर वृक्ष लागवड करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार महत्त्वाच्या रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या १२ टेकड्या यासाठी पहिल्या टप्प्यात निवडल्या गेल्या. निवडण्यात आलेल्या १२ स्थळांमध्ये अहमदनगर-इसळक, नाशिक-औंढा, कोल्हापूर-धोंडेवाडी, पुणे-रेटवाडी-मलठण, औरंगाबाद-लंगडातांडा, बीड-गवळवाडी, ठाणे-रायता, रायगड-गालसुरे-कार्ले, नागपूर-वेणा निमजी, गोंदिया-लाहोरा-सुब्रातोला, वर्धा-पिंपरी मेघे या स्थळांचा समावेश झाला. २०१५-१६ ते २०१९-२० या पाच वर्षांच्या काळात या टेकड्यांवर हिरवाई फुलवण्याचा निर्णय झाला आणि पहिल्याच वर्षीपासूनच रोप लागवडीला सुरवात झाली. रोप लागवड, लावलेल्या रोपाचे संरक्षण आणि संगोपन यांसारख्या विविध कामांसाठी आतापर्यंत जवळपास ६ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च झाला आहे. टेकड्यांवर हिरवाई फुलू लागली आहे. २०२० पर्यंत उजाड असणाऱ्या या टेकड्यांवर आपल्याला हिरवीकंच वनराई फुललेली पाहायला मिळू शकेल. निधीच्या उपलब्धतेनुसार या वर्षी आणखी काही टेकड्यांवर वृक्ष लागवड करण्याचा प्रयत्न आहे.  हिरवाई वाढवणे हा वृक्ष लागवडीचा हेतू आहेच, परंतु त्याचबरोबर भूसंवर्धन आणि जलसंधारणाच्या कामाला वेग देणे, पडणाऱ्या पावसाचे पाणी माथा ते पायथा अडवणे आणि जिरवणे, शासकीय-निमशासकीय जमिनीवरची अतिक्रमण थांबवणे हाही एक महत्त्वाचा उद्देश त्यामागे होता. वृक्ष लागवडीच्या माध्यमातून राज्याचे वनक्षेत्र ३३ टक्क्यांपर्यंत नेण्याचा वन विभागाचा मानस आहे. त्या दृष्टीने राज्यात लॅंड बँक तयार केली जात आहे. वन विभागाच्या मालकीच्या जमिनीबरोबर, वनेत्तर क्षेत्रात मागील दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली गेली आणि भविष्यातही केली जाणार आहे. विविध प्रजातींचे वृक्ष टेकड्यांवर लावल्यानंतर वन्यजीव तसेच पक्ष्यांना एक नैसर्गिक अधिवास मिळू शकणार आहे, यातून त्यांच्यासाठी असलेली अन्नसाखळीदेखील विकसित होण्यास मदत होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com