ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प अखेर रखडला

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील दुहींमुळे जैविक कीडनियंत्रणासाठी पूरक ठरू पाहणारा ट्रायकोकार्ड प्रशिक्षणाचा प्रकल्प रखडल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये कृषी विभागाच्या उपसचिवांचा अड्डेलतट्टूपणा कारणीभूत असल्याचेदेखील सांगण्यात आले. 

राज्यासह विदर्भात कापसावर मोठ्या प्रमाणावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. त्याच्या नियंत्रणासाठी विविध उपाययोजनांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. त्यामध्ये ट्रायकोकार्डच्या माध्यमातून जैविक कीड नियंत्रणाच्या पद्धतीचा देखील समावेश होता. यवतमाळ जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी ट्रायकोकार्डच्या वापरामुळे बोंड अळी नियंत्रणात आल्याचा दावा केला. त्यानंतर ट्रायकोकार्डच्या उपयुक्ततेची माहिती घेण्यासाठी तत्कालीन कृषी सचिव बिजयकुमार थेट कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या नागपूर कृषी महाविद्यालयाच्या कीटकशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत पोचले. मुसळधार पाऊस सुरू असताना बिजयकुमार यांनी प्रयोगशाळेला दिलेली भेट चर्चेत आली होती.

प्रयोगशाळेत प्रा. राम गावंडे, हरिष सवाई यांनी त्यांना ट्रायकोकार्डची माहिती दिली. त्यामुळे प्रभावित झालेल्या बिजयकुमार यांनी ट्रायकोकार्ड तयार करण्याच्या प्रशिक्षणाकरिता तत्काळ निधी देण्याची तयारी केली. कृषी विद्यापीठाने पहिल्या टप्प्यात ४० लाख रुपयांच्या निधीची गरज असल्याचे स्पष्ट केले. त्याला बिजयकुमार यांनी सहमती दिली. 

...आणि प्रकल्प रखडला गावपातळीवर ट्रायकोकार्ड निर्मितीतून शेतकरी आणि ग्रामीण युवकांना रोजगार मिळावा, याकरिता शेतकरी व ग्रामीण युवक तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रशिक्षण देण्याचा कृषी विद्यापीठाचा प्रस्ताव होता. परंतु कृषी विभागाच्या उपसचिवांनी मात्र कृषी विभागाचे कर्मचारी आणि केव्हीकेस्तरावर प्रशिक्षण देण्याचा अट्टाहास धरला. तंत्रज्ञान विस्ताराचे काम कृषी विभाग आणि केव्हीकेचे असल्याचे उपसचिवांचे म्हणणे होते. परंतु आमच्या भूमिकेत गैर काय? असा सवाल कृषी विद्यापीठाचा होता. कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाच्या ‘पहले आप, पहले आप’ अशा धोरणामुळे अखेरीस हा प्रकल्प रखडला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com