आॅक्टोबर हीटमुळे वाढली तूर अन्‌ कपाशीची होरपळ

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्‍यातील देवगाव शिवारातील एका शेतात जमिनीला ऑक्‍टोबरमध्येच पडलेल्या भेगा.
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्‍यातील देवगाव शिवारातील एका शेतात जमिनीला ऑक्‍टोबरमध्येच पडलेल्या भेगा.

औरंगाबाद : एरवी साधारणपणे डिसेंबरनंतर भेगाळणारी भुई ऑक्‍टोबरमध्येच भेगाळल्याने जमिनीत ओलावा झपाट्याने तुटला आहे. पावसाळ्यात पावसाने दोन ते तीन वेळा प्रदीर्घ खंड दिला. परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने ऑक्‍टोबरमध्येच जमिनीला भेगा पडणे सुरू झाले आहे. जमिनीतील ओल तुटल्यात जमा असून, ऑक्‍टोबरच्या वाढत्या हीटने स्थिती बिकट होत आहे. त्यामुळे कपाशी अन्‌ तुर पिकांची होरपळ वाढली आहे.  अपेक्षेनुसार न बरसलेल्या पावसाने मराठवाड्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचे ढग गडद केले आहेत. मोठा फटका बसलेल्या मूग, उडदानंतर आता सोयाबीनच्याही उत्पादनात शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही लागण्याची चिन्हे नाहीत. दुसरीकडे साधारणत: सप्टेंबरपर्यंत पाऊस सुरू राहिल्यास पुढील दोन ते तीन महिने जमिनीत ओल कायम राहते. डिसेंबरनंतर ओल तुटून जमिनीला भेगा पडणे सुरू होते.  अवस्था कपाशीची  मोठ्या प्रमाणात तुटलेल्या ओलीने १५ लाख ८१ हजार हेक्‍टरवर असलेल्या कपाशीच्या पिकापैकी अपवाद वगळता कपाशीची होरपळ वाढली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी चार तालुक्‍यांतील २३ हजार ५९९ हेक्‍टरवरील कपाशीचे पीक बाधित झाले आहे. जालना जिल्ह्यातही कपाशीला लागलेली थोडीबहुत बोंड सुकण्यासोबतच कीड रोगांचाही प्रादुर्भाव वाढला आहे. बीड जिल्ह्यातील जिरायती क्षेत्रातील पीक सुकत चालले असून गुलाबी बोंड अळीसोबतच रस शोषण करणाऱ्या किडींचाही प्रादुर्भाव वाढला आहे.  सोयाबीनची अवस्था  मराठवाड्यात अपेक्षेच्या पुढे जाऊन सरासरी क्षेत्राच्या दीडपट अर्थात १९ लाख ३३ हजार हेक्‍टरवर सोयाबीनची पेरणी झाली. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील सोयाबीनच्या उत्पादनात ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त फटका बसण्याची शक्‍यता आहे. जालना जिल्ह्यातही यापेक्षा वेगळी स्थिती नसून काही ठिकाणी सोयाबीनवर हुमनीचाही प्रादुर्भाव दिसत आहे. बीड जिल्ह्यात सोयाबीनच्या उत्पादनात ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त घट येण्याची शक्‍यता असून, आजपर्यंतच्या पीक प्रयोगाच्या आकडेवारीत हेक्‍टरी १ क्‍विंटल ३५ किलोपर्यंतच सोयाबीनचे उत्पादन झाल्याचे कृषीचा अहवाल सांगतो.  वाढीच्या व फुलोऱ्याच्या अवस्थेतील तूर संकटात  मराठवाड्यातील जवळपास ४ लाख ५० हजार हेक्‍टरवर लागवड झालेल्या तुरीवरील संकट दुष्काळाच्या सावटाने वाढले आहे. पावसाची नितांत गरज असलेल्या तुरीची वाढ पावसाअभावी खुंटली असून, काही ठिकाणी पाने गुंडाळणाऱ्या अळीचाही प्रादुर्भाव दिसतो आहे. पावसाच्या खंडामुळे तुरीच्या उत्पादनातही घट येणार हे जवळपास स्पष्ट आहे.  दहा एकर शेतीत सोयाबीन, तूर आदी पिके घेणाऱ्या नागापूर (ता. परळी, जि. बीड) येथील काकासाहेब सोळंके यांनी २५०० रुपये प्रतिएकर सोंगणीला देण्यापेक्षा मुलाबाळांसह घरीच सोयाबीन सोंगले. दीड एकरातील सोयाबीनमधून तीन कट्‌टेही सोयाबीन होईल की नाही, अशी शंका त्यांनी व्यक्‍त केली. शिवाय मळणीला देण्यालाही ते परवडलं की नाही, असं ते म्हणाले. म्हणायला दहा एकरच्या आसपास शेती; पणं घरात अजून धान्याचा एक दाना आला नायं. कपाशीबी पाण्याबिगर वाळून चालली. कुटुंबात सहा लोकं, पीकचं झालं नसल्यानं साल कसं धकवावं ही चिंता असल्याचं त्यांनी सांगितलं.  उत्पादन घटीची शक्यता

  • बाजरीच्या उत्पादनातही ३० टक्‍क्‍यांपेक्षा अधिकची घट येण्याची शक्‍यता. 
  • औरंगाबादमधील मुगाच्या १३२ पीक कापणी प्रयोगात हेक्‍टरी १ क्‍विंटल ८० किलोच उत्पादन 
  • बीड जिल्ह्यात मुगाचे हेक्‍टरी २ क्‍विंटल २८ किलो उत्पादन 
  • उडदाच्या उत्पादनात औरंगाबाद जिल्ह्यात ६० टक्‍क्‍यांपर्यंत घटीची शक्‍यता 
  • औरंगाबादमधील उडदाच्या २२ पीक कापणी प्रयोगात हेक्‍टरी ३ क्‍विंटल ३५ किलो उत्पादन 
  • बीड जिल्ह्यातील पीककापणी प्रयोगानुसार उडदाचे ४ क्‍विंटल १ किलो हेक्‍टरी उत्पादन
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com