सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल २७० कोटींनी घटली

बाजार समिती बंद होऊ नये यासाठी आम्ही काळजी घेतली आहे. तसेच शेतीमालाची आवक झाल्यावर लगेच वजन आणि पट्टी देण्याचे नियोजन करत आहे. यासाठी नवीन जमीन घेऊन त्या ठिकाणी सौदे केले जाणार आहे. - दिनकर पाटील, सभापती, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा दिल्यामुळे त्यांनी संप केला होता. परिणामी सौदे बंद असल्याने गुळाची गुऱ्हाळ घरावरून वाढती खरेदी आणि हळदीचा उतार कमी व मंदीचा फटका, यामुळे २०१८-१९ मध्ये सांगली बाजार समितीतील हळद आणि गुळाची उलाढाल सुमारे २७० कोटींनी कमी झाली आहे. याचा बाजार समितीच्या सेसवर परिमाण होणार असल्याने बाजार समितीला सुमारे दीड कोटी रुपयांहून अधिक रकमेचा फटका बसला आहे. 

सांगली बाजार समिती राज्यातील मोठी बाजारपेठ आहे. ही शेतीमालाची प्रमुख उतारपेठ आहे. बाजार समितीच्या अंतर्गत आवारामध्ये शेतीमालाची सुमारे दोन हजार कोटींहून अधिक उलाढाल असते. बाजार समितीत २०१७-१८ च्या तुलनेत २०१८-१९ मध्ये हळदीची आवक ३ लाख ४८ हजार क्विंटल तर गुळाची आवक १ लाख ४७ हजार क्विंटलने कमी झाली आहे. याचा परिमाण थेट बाजार समितीला मिळणाऱ्या सेसवरदेखील झाला आहे. बेदाणा नियमनमुक्त असतानाही सांगली बाजारात समितीत बेदाण्याची आवक वाढली असल्याचे चित्र आहे. 

गुळाची खरेदी थेट गुऱ्हाळ घरावरून  येथील बाजार समितीत कर्नाटकातील रायबाग, गोकाक, अथणी, हारुगिरी आदी भागातून गुळाची मोठ्या प्रमाणात आवक होते. गुजरात आणि राजस्थान या राज्यात येथील व्यापाऱ्यांकडून गूळ रवाना होतो. परंतू राजस्थान, गुजरात आणि आंध्र प्रदेशमधील व्यापाऱ्यांनी थेट गुऱ्हाळ घराकडे धाव घेतली आहे. गुऱ्हाळ घरावर बाजार समितीपेक्षा चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटलने दर कमी मिळत आहे. त्यामुळे गुळाची थेट गुऱ्हाळ घरावरून खरेदी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच कर्नाटकातील गूळ कोल्हापूर मार्केटकडे जाऊ लागला आहे. तसेच गूळ उत्पादन करणाऱ्या भागातही साखर कारखाने वाढले, याचा सर्व परिणाम सांगली बाजार समितीवर होऊ लागला आहे. 

हळदीचा उतारा कमी; मंदीचा फटका  सांगली मार्केटमध्ये महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा या ठिकाणाहून हळदीची आवक होते. हळदीसाठी ही मोठी बाजारपेठ आहे. याच बाजारपेठेवरून देशातील हळदीचे दर ठरतात. परंतू यंदा देशात हळदीच्या लागवडीत वाढ झाली असली तरी रोगाचा प्रादुर्भाव आणि पाण्याची कमतरता यामुळे हळदीच्या उताऱ्यात घट झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यातच गेल्या चार ते पाच वर्षांपासून हळदीला प्रति क्विंटलला ९ हजार ते ९५०० रुपये असा दर मिळतोय. हळदीच्या दरात तेजी मंदी होणार नसल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले. काही भागात व्यापाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांकडून हळद खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. याचा परिमाण हळदीच्या आवकेवर झाला आहे. वास्तविक पाहता २०१७-१८ मध्ये हळदीची आवक १५ लाख क्विंटल होती. २०१८-१९ मध्ये ११ लाख ५५ हजार क्विंटल आवक झाली आहे. अर्थात ३ लाख ४८ हजार क्विंटलने हळदीची आवक घटली आहे.   

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक झालेला शेतीमाल (क्विंटलमध्ये)
शेतीमाल  २०१६-१७ २०१७-१८ २०१८-१९ वाढ(+) घट (-) 
बेदाणा ४,३४,१५१ २,४४,४५४ ३,६५,१३३ (+) २०,६७९ 
हळद ३,२०,१४९ १५,०३,५९६  ११,५५,५५१ (-) ३,४८,०४५ 
गूळ रवे ३,१८,४५९  ३,८३,३३१ ३,५७,१८७  (-) २६१५३ 
गूळ भेली  ६,१२,२५३  ७,३६,०२८  ६,१४,४८८  (-)१,२१,५४०
लाल मिरची ३१,५७८  ३३,६२६  १५,३६०  (-) १८,२६६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com