तीन जिल्ह्यांत ५३३ एकरांवर नवीन तुती लागवड

तुती लागवड
तुती लागवड
परभणी  : जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयांतर्गत परभणी, नांदेड, हिंगोली या तीन जिल्ह्यांत यंदा ५१३ शेतकऱ्यांनी ५३३ एकरांवर नवीन तुती लागवड केली आहे. या तीन जिल्ह्यांत नवी आणि जुनी मिळून एकूण १११६ शेतकऱ्यांकडे १११० एकरांवर तुती लागवड झाली आहे. दरवर्षी तुती लागवड क्षेत्रात वाढ होत आहे. परंतु, अपुऱ्या कर्माचारी संख्येमुळे शेतकऱ्यांना गावात जाऊन रेशीम कोश उत्पादनाबाबत तांत्रिक मार्गदर्शन करत असताना सध्याच्या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
 
पारंपरिक पिकांपेक्षा रेशीम कोष उत्पादनातून शाश्वत उत्पन्न मिळू लागल्यामुळे परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांतील शेतकरी शेतीपूरक परंतु काहीशा तांत्रिक स्वरुपाच्या रेशीम शेती व्यवसायाकडे आकर्षित झाले आहेत. त्यामुळे तुती लागवडीखालील क्षेत्रात दरवर्षी वाढ होत आहे.
 
या योजनेचा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत समावेश करण्यात आला असल्यामुळे २५ च्या समूहाने शेतकरी एकत्र येऊन तुती लागवड करत आहेत. परंतु गटासाठी आवश्यक शेतकऱ्यांची संख्या होत नसलेल्या गावातील अनेक शेतकरी व्यक्तिगत तुती लागवड करत आहेत.
 
परभणी जिल्ह्यात यंदाच्या सप्टेंबर अखेरपर्यंत १८४ शेतकऱ्यांनी २०० एकरांवर तुती लागवड केली आहे. गतवर्षीपर्यंत २८६ शेतकऱ्यांनी ३०४ एकरांवर तुती लागवड केलेली आहे. नवी आणि जुनी मिळून एकूण ४७० शेतकऱ्यांनी ५०४ एकरांवर तुती लागवड केली आहे.
 
डिसेंबर अखेरपर्यंत २५६ शेतकऱ्यांना दीड लाख अंडीपुंजाचे वाटप करण्यात आले आहेत. त्यापासून ५२ टन कोश उत्पादन मिळाले आहे.२०१८-१९ मध्ये जिल्ह्यात ४०० एकर तुती लागवडीचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात ७१५ शेतक-यांनी महारेशीम अभियानअंतर्गत तुती लागवडीसाठी नोंदणी केली आहे. मनरेगाच्या निकषात बसत नसल्यामुळे ११० शेतकऱ्यांनी व्यक्तिगत १४० एकरांवर तुती लागवड केली आहे.
 
नांदेड जिल्ह्यात यंदा १२० शेतकऱ्यांनी १२६ एकरांवर नवीन तुती लागवड केली आहे. आजवर १७२ शेतकऱ्यांनी २१७ एकरावर तुती लागवड केली आहे. नवी आणि जुनी मिळून एकूण २९२ शेतकऱ्यांकडे ३३७ एकरांवर तुती लागवड झाली आहे. यावर्षी या शेतकऱ्यांना १ लाख १७ हजार ३५० अंडीपूंज वाटप करण्यात आले असून ६२ हजार ९८२ किलो रेशीम कोष  उत्पादन मिळाले आहे.
 
हिंगोली जिल्ह्यात यंदा २१३ शेतकऱ्यांनी २०३ एकरांवर नवीन तुती लागवड केली असून १०१ शेतकऱ्यांकडे १०६ एकरांवर जुनी तुती आहे. नवी आणि जुनी मिळून एकूण ३१४ शेतकऱ्यांकडे ३०९ एकरांवर तुती लागवड झाली आहे. तीन जिल्ह्यांत एकूण ५१३ शेतकऱ्यांनी ५३३ एकरांवर नवीन तुती लागवड केली आहे. ६०३ शेतकऱ्यांकडे ५७७ एकरांवर जुनी तुती लागवड आहे. नवी आणि जुनी मिळून एकूण १११६ शेतकऱ्यांकडे १११० एकरांवर लागवड झाली आहे.

आजवर चुडावा, देवठाणा, वझूर, बोरगव्हाण, खादगांव, लोहिग्राम शिर्शी या गावात रेशीम क्लस्टर होते. यावर्षी जिल्ह्यातील ६० गावांमध्ये ८५ रेशीम कोश उत्पादक क्लस्टर नव्याने निर्माण झाले आहेत. येत्या काळात क्लस्टरची संख्या वाढणार आहे.

सध्या जिल्हा रेशीम विकास अधिकारी यांच्यासह ५ कर्मचारी कार्यरत आहेत. तुती लागवड क्षेत्रात वाढ होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रस्तावांची छाननी करणे  शेतकऱ्यांना अंडीपूंज वितरित करणे, गावात जाऊन तांत्रिक मार्गदर्शन करणे यासह कार्यालयीन कामांसाठी कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. सध्याच्या कर्मचाऱ्यावरील कामाचा ताण वाढला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com