परभणी, हिंगोलीतील सिंचनासाठीच्या पाण्याचे २० टक्के नमुने उत्तम प्रतीचे

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये तपासणी करण्यात आलेल्या सिंचनासाठीच्या पाणी नमुन्यांपैकी २० टक्के नमुने उत्तम प्रतीचे, ७४ टक्के नमुने मध्यम प्रतीचे, तर ६ टक्के नमुने मचूळ (खराब) प्रतीचे असल्याचे आढळून आले. पीक उत्पादनवाढीसाठी पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जलस्रोतांमधील पाणी सिंचनासाठी वापरण्यापूर्वी पाण्याच्या गुणधर्माचे विश्लेषण करून घेणे आवश्यक आहे, असा सल्ला जिल्हा मृदा सर्वेक्षण आणि मृदा चाचणी अधिकारी एस. एच. पवार यांनी दिला. 

परभणी येथील जिल्हा मृदा चाचणी प्रयोगशाळेमध्ये परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून संकलित करण्यात आलेले माती, तसेच पाणी नमुन्यांचे परीक्षण केले जाते. पाण्याची प्रत पीक उत्पादनावर परिणाम करते. विविध कारणांनी पाण्याच्या गुणधर्मावर परिमाण होत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील जलस्रोतांचे पाणी सिंचनासाठी वापरण्यापूर्वी त्याच्या गुणधर्माचे विश्लेषण करून पाण्याची प्रत समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी पाणी नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यावी लागेल.

प्रयोगशाळेमध्ये पाणी नमुन्याचा आम्ल, विम्ल निर्देशांक, क्षारता, विद्युत वाहकता या गुणधर्मासोबत सोडिअम, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, कार्बोनेट, बायकार्बोनेट, क्लोराइड, सल्फेट या घटकांची तपासणी केली जाते. पाण्याची प्रत ही विद्युत वाहकतेवर ठरविली जाते. क्षारता तपासणी करण्यासाठी पाणी नमुना काढल्यानंतर तत्काळ प्रयोगशाळेत पाठविणे आवश्यक आहे. नमुना पाठविण्यास विलंब झाल्यास पाण्याचे क्षार बाटलीच्या तळाशी जाऊन बसतात. त्याचा परिणाम क्षारतेच्या वर्गवारीवर होतो. तपासणीसाठी पाणी नमुना घेत असताना स्वच्छ काचेच्या किंवा प्लॅस्टिक च्या बाटलीमध्ये घ्यावा.  --- असे आहेत निष्कर्ष  २०१७-१८ मध्ये परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातून एकूण एक हजार पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. एकूण पाणी नमुन्यांपैकी २० टक्के नमुने उत्तम प्रतीचे, ७४ टक्के नमुने मध्यम प्रतीचे तर ६ टक्के नमुने मचूळ (खराब) प्रतीचे असल्याचे आढळून आले.

  •    उत्तम प्रतीच्या पाण्याची विद्युत वाहकता ०.२५ मिली सायमन पर सेमी. पेक्षा कमी असते. तसेच सोडीयम शोषण गुणोत्तर १० पेक्षा कमी असते.
  •     मध्यम प्रतीच्या पाण्याची विद्युत वाहकता ०.२५ ते ०.७५ मिली सायमनपर सेमी पेक्षा जास्त असते. सोडिअम शोषण गुणोत्तर १० ते १८  असते.
  •     मचूळ (खराब) प्रतीच्या पाण्याची विद्युत वाहकता ०.७५ ते २.२५ मिली सायमेन पर सेमी पेक्षा जास्त असते तर सोडियम शोषण गुणोत्तर २६ पेक्षा अधिक असते. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com