राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले

राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले

कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व भागातील तालुक्‍यातही पावसाची रिपरिप सोमवारी दुपारपर्यंत सुरूच राहिली. पश्‍चिमेकडे जोर जास्त असल्याने धरणांच्या पाणीसाठा जलद गतीने वाढत असल्याचे पाटबंधार विभागाच्या सूत्रांनी सांगितले. राधानगरी धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे सोमवारी सकाळी उघडले. या हंगामात दुसऱ्या वेळेस दरवाजे उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यातील बहुतांशी धरणांचा साठा ९० टक्क्‍यांपेक्षा जास्त झाल्याने पाण्याचा ताण कमी करण्यासाठी येत्या दोन दिवसांत बहुतांशी धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे पाटबंधारे विभागातून सांगण्यात आले. अगदी काठोकाठ भरण्याच्या स्थितीत असलेल्या धरणांचे पाणी तातडीने सोडण्याच्या हालचाली सुरू होत्या. दोन दिवस पावसात वाढ झाल्याने त्याचा परिणाम नद्यांची पाणीपातळी वाढण्यावर झाला आहे. बहुतांशी नद्या पुन्हा दुथडी भरून वाहत असल्याचे आपत्कालीन विभागाच्या सूत्रांनी सांगितले. रविवारच्या तुलनेत सोमवारी सकाळपर्यत पुन्हा तीन बंधारे पाण्याखाली गेले. सोमवारी दुपारपर्यंत पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांची संख्या १४ झाली होती.

पंचगंगा नदीवरील कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी सकाळी ७ वाजता २६ फूट ७ इंच इतकी होती. पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यामध्ये पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ हे सात बंधारे पाण्याखाली आहेत. भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे हे चार बंधारे पाण्याखाली आहेत. तुळशी नदीवरील बीड हा एक बंधारा पाण्याखाली गेला आहे. वारणा नदीवरील चिंचोली व माणगाव हे दोन बंधारे पाण्याखाली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com