ऊसाला ठिबकसाठी दोन टक्क्याने कर्ज

शेतकऱ्यांना कमी व्याजात ऊस लागवडीसाठी ठिबक संचाकरिता कर्ज देण्याची राष्ट्रीयीकृत बॅंकांची भूमिका स्तुत्य आहे. त्यामुळे जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळेल. नाबार्डचा निधी उपलब्ध होताच या योजनेचे प्रत्यक्ष काम सुरू होईल. - संभाजी कडूपाटील, साखर आयुक्त
ऊस ठिबक
ऊस ठिबक

पुणे : पाण्याची बचत व ऊस उत्पादकता वाढीसाठी कमी व्याजदरात शेतकऱ्यांना कर्ज देण्यास राष्ट्रीयीकृत बॅंका देखील तयार झालेल्या आहेत. केवळ दोन टक्के व्याजात ठिबकसाठी कर्जवाटप लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. राज्यातील तीन लाख हेक्टरवरील ऊस लागवड येत्या दोन वर्षांत ठिबकखाली आणण्याचे उद्दिष्ट या योजनेत ठेवण्यात आलेले आहे. पश्चिम महाराष्ट्र तसेच सोलापूर सारख्या दुष्काळी भागातील ३५ साखर कारखाने या योजनेखाली आणले जातील. 

साखर कारखान्यांकडून कार्यक्षेत्रातील शेतकरी सभासदांना ऊस लागवड करताना ठिबक बंधनकारक केले जाणार आहे. त्यासाठी प्रतिहेक्टरी ८५ हजार रुपये कर्ज पाच वर्षांकरिता किमान पाच हेक्टरसाठी मिळेल. ही योजना राबविण्यासाठी नाबार्डकडून आधी बॅंकांना कर्ज वाटले जाईल. पहिल्या टप्प्यात नाबार्डकडून शिखर बॅंकेला साडेपाच टक्क्यांनी कर्ज दिले जाईल. शिखरकडून सहा टक्क्यांनी जिल्हा बॅंकांना आणि शेतकऱ्यांना सव्वा सात टक्क्यांनी कर्ज देण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. 

‘‘कर्जवाटपाच्या या प्रक्रियेत बॅंकांनाही चांगला व्यवसाय मिळण्याची शक्यता आहे. शासन व साखर कारखान्यांचे व्याज हमखास मिळणार असल्यामुळे या योजनेत सहभागाचा प्रयत्न राष्ट्रीयकृत बॅंकादेखील करीत होत्या. त्यांची मागणी मान्य केली गेली आहे. मात्र, शेतकऱ्यांकडून या बॅंकांना दोन टक्क्यांपेक्षा जादा व्याज आकारता येणार नाही,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.

दोन टक्केच व्याज द्यावे लागणार ऊस ठिबक योजनेसाठी व्याजदर सव्वासात टक्के ठेवला गेला आहे. मात्र, शेतकरी केवळ दोन टक्के व्याज भरणार आहे. शेतकऱ्यांच्या वतीने राज्य शासन चार टक्के तर साखर कारखाना सव्वा टक्के व्याज भरणार आहे. प्रोत्साहन म्हणून शेतकऱ्याला पाणी पट्टीत २५ टक्के सवलत मिळणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com