साधे कोण बघायलासुद्धा आले नाहीत, तुमीच पहिल्यांदा...

साधे कोण बघायलासुद्धा आले नाहीत, तुमीच पहिल्यांदा...
साधे कोण बघायलासुद्धा आले नाहीत, तुमीच पहिल्यांदा...

उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या द्राक्ष उत्पादकांनी व्यथा तासगाव, जि. सांगली ः  ‘साधे कोण बघायलासुद्धा आले नाहीत, तुमीच पहिल्यांदा’ अशा शब्दांत आपल्या व्यथा तासगाव तालुक्‍यातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी रविवारी (ता. २६) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडल्या. ‘सायेब म्हणत्यात तशी पीकविम्याची भरपाई आमच्या द्राक्षाला मिळाली तर मी तुमच्या घरी येऊन तुमचा सत्कार करतो!’ अशा शब्दांत शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या. तासगाव तालुक्‍यात अवकाळी पाउस आणि बदलत्या हवामानामुळे अडीच हजार एकरावरील द्राक्ष बागा दावण्याने वाया गेल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर रविवारी (ता. २६) सकाळी दहा वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार अनिल बाबर यांनी बोरगाव (ता. तासगाव) येथील अशोक जयसिंग मदने यांच्या द्राक्ष बागेला भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या वेळी उद्धव ठाकरे यांनी तब्बल वीस मिनिटे बागेतच शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले.  बागेची पाहणी करण्यास उद्धव ठाकरे येणार म्हटल्यावर कृषी विभागाचे अधिकारीही या ठिकाणी उपस्थित होते. श्री. ठाकरे यांना द्राक्ष बागेचे झालेले नुकसान डाउनीचा झालेला प्रादुर्भाव, पीकविमा भरपाई, हवामान अंदाज याबाबत अधिकारी माहिती देत असताना तेथे उपस्थित असलेले द्राक्ष बागायतदार लालासाहेब पाटील यांनी, ‘साहेबांना राग आला तरी चालेल'', असे म्हणून आपले म्हणणे मांडण्यास सुरवात केली. ‘साहेब सांगत असलेला पीकविमा द्राक्ष बागेला कधी मिळतच नाही, आणि जर मिळाला तर मी तुम्हाला मुंबईला येऊन भेटतो. मी तुमच्या घरी येऊन तुमचा सत्कार करतो. आम्ही द्राक्ष बागेच्या छाटण्या करतो सप्टेंबरमध्ये आणि यांचे हवामान केंद्र सुरू होते ऑक्‍टोबरमध्ये.  पीकविम्याच्या हवामानाच्या आणि तारखांच्या अटी इतक्‍या आहेत, की त्यामुळे आम्हाला पीकविमा मिळतच नाही, अशी तक्रार त्यांनी मांडली. नुसतं पाणी मिळून काय करायचं नुकसान झालं तर त्याची नुकसानभरपाईही मिळायला पायजे. बागेच्या छाटणीपासून ते द्राक्षे जाईपर्यंत पीकविमा मिळाला तरच उपयोग. ज्या पिकाचा विमा सगळ्यात जादा भरला जातो, त्या द्राक्षालाच विमा मिळत नाही. अशा शब्दांत लालासाहेब आपली व्यथा मांडत होते. दावण्यानं बागा गेल्या सरकारमधलं कोण विचारायला बी आलं नाही. तुम्हीच पहिल्यांदा येऊन ऐकून तरी घेतलं, अशी व्यथाही त्यांनी मांडली.   श्री. ठाकरे यांनी, लालासाहेब पाटील यांचे म्हणणे ऐकून घेऊन अधिकाऱ्यांना अडचणी विचारल्या. पीकविमा आणि हवामान केंद्र सुरू आहेत. त्यानुसार कृषी विभागाचे काम सुरू आहे, अशी कृषी अधिकारी सांगत असताना शेतकरी म्हणाले, ‘साहेब कृषी अधिकारी खोटं बोलत आहेत.’ त्यावर श्री. ठाकरे म्हणाले, की याबाबत काय करायला पाहिजे हे मला सांगा मी करून घेतो, अशा सूचना केल्या. शेवटी जाताना लालासाहेब पाटील यांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले, की जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे पीकविम्यात बदल झाले, तर तुम्ही मला समाधानाने मुंबईला येऊन भेटून सांगायचे,  आनंदाने भेटा असे मी म्हणणार नाही, कारण जर शेतकऱ्यांना अडचण असेल तर ती सोडविण्याचे आमचे कामच आहे, अशा शब्दांत या शेतकऱ्यांना त्यांनी दिलासा दिला. मी देतो आदेश... गेल्या महिन्यात पावसाने द्राक्ष बागेचे नुकसान झाले आहे, याचे अद्यापही पंचनामे केले नाहीत, अशी शेतकऱ्यांनी सांगताच जलसंपदा मंत्री विजय शिवतारे म्हणाले, ""मी स्वतः जिल्हाधिकारी यांना द्राक्षाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देतो.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com