सोलापुरात उजनी धरण भरले, लघुप्रकल्प कोरडेच

सोलापुरात उजनी धरण भरले, लघुप्रकल्प कोरडेच
सोलापुरात उजनी धरण भरले, लघुप्रकल्प कोरडेच

सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पावसावर उजनी धरणाने पाण्याची पातळी शंभर टक्‍क्‍याच्या पुढे पोचली, पण सोलापूर  जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील ५६ लघू प्रकल्पांपैकी केवळ आठ प्रकल्पांत पाण्याचे प्रमाण जेमतेम आहे, तर उर्वरित ४८ प्रकल्प कोरडेठाक आहेत. त्यामुळे दमदार पावसाची प्रतीक्षा करण्याची वेळ सोलापूरकरांवर आली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात जेमतेम ५० टक्केच पाऊस पडला असून तोही किरकोळ झाला आहे. त्याचा उपयोग हे प्रकल्प भरण्यासाठी किंवा जलसाठे होण्यासाठी अजिबात होऊ शकलेला नाही. जिल्ह्यातील या सर्व ५६ प्रकल्पांचा एकूण साठा क्षमता १३९.२० दशलक्षघनमीटर आहे. पण त्यात ४.८१ दशलक्षघनमीटर एवढाच साठा सध्या आहे. त्यापैकी ३.६४ दशलक्षघनमीटर हा उपयुक्त साठा आहे. यावरून या प्रकल्पाच्या उपलब्ध पाण्याची स्थिती लक्षात येते. त्यामुळे पावसाळा संपायला अवघा महिना उरला असताना, आता हे प्रकल्प भरणार केव्हा, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. हे प्रकल्पच कोरडे असल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.

जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीने पुण्याच्या पावसावर शंभर टक्‍केचा टप्पा पार केला आहे. बुधवारी (ता.२९) दुपारपर्यंत उजनी धरणाची पाणीपातळी १०५.२ टक्‍क्‍यांवर पोचली होती. पुण्याकडून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग १९५८५ क्‍युसेक इतका होता. धरणातून पुढे नदीत १२५० क्‍युसेक इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. त्याशिवाय बोगद्यातून १०५० क्‍युसेक, वीजनिर्मितीसाठी १६०० क्‍युसेक, मुख्य कालव्यातून ३२०० क्‍युसेक इतके पाणी सोडण्यात येत आहे. उजनी धरणामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी या पाण्याच्या माध्यमातून काही प्रकल्प भरून घेता येणे शक्‍य आहे. त्यादृष्टीने पाटबंधारे विभागाने नियोजन केले आहे.

कोरडे असलेले लघू प्रकल्प दक्षिण सोलापूर ः होटगी, रामपूर, हणमगाव. उत्तर सोलापूर : सोरेगाव, बीबी दारफळ. अक्कलकोट ः शिरवळवाडी, चिक्केहळ्ळी, हंजगी, डोंबरजवळगे, भुरीकवठे, काझीकणबस, बोरगाव, घोळसगाव, सातनदुधनी. बार्शी ः गोरमाळे, वालवड, तावडी, ममदापूर, शेळगाव, चारे, कळंबवाडी. करमाळा ः पारेवाडी, वडशिवणे, हिंगणी (के.), म्हसेवाडी, वीट, कोंढेज, राजुरी, कुंभेज, नेर्ले, सांगवी. माढा ः सापटणे, परिते, निमगाव. सांगोला : चिंचोली, अचकदाणी, जवळा, हंगीरगे. मंगळवेढा ः भोसे, पडवळकरवाडी, हुलजंती, तळसंगी (नवा), तळसंगी (जुना), चिखली, लवंगी, मारोळे, डोंगरगाव

उपयुक्त पाणीसाठा असलेले प्रकल्प अक्कलकोट ः गळोरगी. बार्शी ः पाथरी, कोरेगाव, कारी, काटेगाव, वैराग. सांगोला ः जुनोनी, घेरडी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com