उमराणेत लाल कांदा प्रतिक्विंटल ५००१ रुपये
उमराणेत लाल कांदा प्रतिक्विंटल ५००१ रुपये

दसऱ्याच्या मुहूर्तासाठीच्या कांद्याला उमरण्यात ५००१ रुपये दर

उमराणे, जि. नाशिक : विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या मुहूर्तावर उमराणे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन लाल पावसाळी कांदा लिलावाचा प्रारंभ करण्यात आला. तिसगाव येथील शेतकरी नामदेव कृष्णा अहिरे यांच्या मुहूर्ताच्या बैलगाडीतून आणलेल्या कांद्यास सर्वोच्च ५००१ रुपये भाव मिळाला.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षी विजयादशमी (दसरा)च्या मुहूर्तावर नवीन लाल पावसाळी कांदा लिलावाचा प्रारंभ करण्यात येतो. त्या रिवाजाप्रमाणे यावर्षीही दुपारी बारा वाजता नवीन लाल कांदा खरेदी-विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. सर्वप्रथम समितीच्या कार्यालयातील देवदेवताच्या प्रतिमेचे पूजन बाजार समितीचे प्रशासक व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रशासक संजय एस. गिते यांच्या हस्ते बैलगाडीतून विक्रीस आलेल्या नवीन कांद्याचे पूजन करून कांदा लिलावाचा शुभारंभ केला. तसेच कांदा उत्पादक शेतकरी नामदेव अिहरे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर लिलावास सुरवात होऊन गजानन आडतचे संचालक व व्यापारी संजय खंडेराव देवरे यांनी सर्वोच्च बोली लावत ५ हजार १ रुपये भावाने नवीन लाल कांदा खरेदी केला.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रथम व सर्वोच्च दराने कांदा खरेदी करण्याचा बहुमान त्यांनीच राखला. शुभारंभप्रसंगी कांदा व्यापारी प्रवीणलाल बाफणा, संदेश बाफणा, साहेबराव देवरे, रामराव ठाकरे, शैलेश देवरे, महेंद्र मोदी, सुनील देवरे, प्रवीण देवरे, मुन्ना अहेर, पांडुरंग देवरे, रमेश वाघ, अविनाश देवरे, मोहन अहिरे, समितीचे माजी उपसभापती महेंद्र पाटील, मधुकर पाटील, समितीचे सचिव नितीन जाधव, सहसचिव तुषार गायकवाड तसेच बहुसंख्य व्यापारी, शेतकरी उपस्थित होते. दरम्यान चालूवर्षी पावसाने सर्वत्र पाठ फिरविल्याने लाल (पावसाळी) कांदा लागवडीवर याचा विपरीत परिणाम झाला आहे. पाण्याअभावी लागवड झालेले कांदे सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने दरवर्षीपेक्षा यावर्षी बाजारात नवीन लाल कांद्याची कमी आवक आली आहे. बाजार आवारात १० बैलगाडी, २५० पिकअप, व १८५ ट्रॅक्टर आदी वाहनांतून सुमारे तीन ते चार हजार क्विंटल आवक झाल्याचा अंदाज असून बाजारभाव कमीत कमी एक हजार रुपये, जास्तीत जास्त पाच हजार एक रुपये, तर सरासरी भाव १८०० रुपये इतका होता.

उन्हाळ कांद्याचे दर तेजीतच राहणार आगामी काळात लाल कांद्याची किती आवक येते यावरून शेतकऱ्यांनी चाळीत साठवून ठेवलेला परंतु काही अंशीच शिल्लक असलेल्या उन्हाळ (गावठी) कांद्यांचे दर अवलंबून असून सध्यातरी लाल कांद्याची आवक वाढेल, अशी अपेक्षा नसल्याने उन्हाळ कांद्याचे दर तेजीतच राहणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com